होळी: आयी रे


हिरानगर हा माळावर वसलेला तांडा. घनदाट जंगल. आजूबाजूला पावसाळ्यात खळखळ वाहणाऱ्या लहान लहान आठ दहा लवणं. आनंदाने वाहात राहायच्या व उन्हाळ्यात सताड कोरड्या पडायच्या. पावसाळ्यात हिरव्यागार वनराईत वसलेलं हिरानगर उन्हाळ्यात ओसाड दिसायचं. चैत्र महिन्यात पुन्हा जंगल नव्याने उभारी घ्यायचं. निसर्गात नवचैतन्य निर्माण व्हायचं. पन्नास वर्षापूर्वी नऊ घरांचा आसलेला तांडा आज शंभरएक घरावर पोहचलेला. उंच माळावर वसलेला तांडा येथून रात्रीला किमान दाहा वीस गावांचे दिवे सहज दिसतात. काळाच्या ओघात काही मोजक्या आठवणी मनात कायमचं घर करून रहातात. त्यातील एक आठवण म्हणजे “हिरानगर तांड्यावरील होळी”. तांड्यात अनेक सण साजारा करतात; पण होळी सण साजरा करण्याचा आनंद काही औरच असतो. हा सण साजरा करण्यात असतो जोम, जोश, उत्साह व बेफामपणा .
कोणीतरी आरोळी ठोकायचा “आवो चालो भा डावेसांळे, नायक -नायकळं, कारभारी -कारभारळं, बुडेठाडे, बाईमनक्या, छोरी-छोरा आपळं से भळंण होळी रमा”(चला या सर्व लहान थोर गावाचे प्रमुख कारभारी बाईपोरी पुरुष पोरी पोरं सर्व मिळून होळी खेळू या) मी लहानपणा पासुनच तांडा सोडून किमान पंचविस तीस किमी दूर होतो. होळी जवळ आली की माझं मन हुरहूर व्हायचं. तांड्यातील होळीचे नाचणे गाणे हे सारखं मनात रुंजी घालायचे. तांड्याकडची ओढ लागायची. तांड्याकडे जाण्यासाठी तिकिटाला पैसे नसायचे तरी मला होळीची आठवण स्वस्थ बसू देत नसत. माझ्या तांड्यातील दोस्तांची आठवण यायची. ती आठवण मला स्वस्थ बसू देत नसत. मग माझे पाय तांड्याचा ओढीने तांड्याकडे मला ओढून न्यायचे.
आजचा होळीचा सण व मागील पन्नास वर्षापूर्वीचा सण यात लईच बदल झालेला आहे जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे. आजचा होळीचा सण साजरा करताना पूर्वीचा उत्साह, जोम,जोश ,पद्धती, रितीरीवाज हे काहीच काहीच शिल्लक राहिलेलं नाही. मात्र उगीच माझे मन मागे भूतकाळात रमत जाते. मेंदूच्या कप्यात कुठेतरी धूळखात पडलेल्या आठवणी उगीच होळीच्या निमित्ताने जाग्या होतात. ताज्यातवाने होवून मनचक्षूसमोर उभ्या राहतात. थयथय नाचायला लागतात.


मी जेमतेम दहा एक वर्षाचा असेन तेव्हा तांड्यावर होळी अतिशय आनंदाने साजरा करायचे. घरात खायाला काहीही नसायचे. उपाशीपोटी राहायचे; पण होळी सणाची नशाच न्यारी होती. तांड्यातील तरुण स्री-पुरुष, म्हातारे-म्हातारी सर्व कसे आनंदी वाटायचे. सर्वांचे चेहरे टवटवीत , तरतरीत दिसायचे. “होळी आयी रे होळी आयी” (होळी आली रे होळी आली) असे छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सर्वच आरोळी ठोकायचे. किमान एक महिना आगोदरपासून होळी सण साजरा व्हायचं. त्याला होळीचाच महिना म्हणायचे. तरुण मुलां -मुलीचा गट वेगवेगळा असायचा. लेंगी गाताना कोणालाही वेळेचं भान नसे. रात्रीचे किती वाजले याचेही भान नसे. वयस्क स्त्री-पुरुष सर्वजण आनंदाने लेंगी गितात सहभागी होत. लेंगीत धार्मिक तसेच थोडसं चावट, आंबट , थोडीसी थट्टामस्करी चाले. सर्वजण फेर धरून नाचत. लेंगी गात. सुरवात बहुधा धार्मिक लेंगीने करत.


कत रच लोगो हिरा रुपेर सुंदर डेरामा.
कत डेरा दिनो रे सेवालाल एक वेळा आजो रे.
सेवाभाया सादू (साधू) छ ; उ तो हैदराबादेमा उतरो छ
सेवालाल एक वेळा आजो रे; गोरून भेट दे जो रे . (सेवालाल महाराज तुम्ही कोठे थांबलेले आहात. हैदराबादमध्ये आहात एक वेळ आम्हाला भेट द्या. दर्शन द्या.)
सेवाभायांचे गुणगाण करणाऱ्या लेंगी बरोबरच इतर साधूसंताच्या , देवदेवीच्याही गुण गाणाऱ्या लेंगी गात. या शिवाय मग थट्टामस्करीच्या लेंगी गायीले जायचे. तांड्यात कधी कधी शिमग्याला पाहुणी, मेव्हणी यायच्या. त्यावेळी तिचीही लेंगीतून थट्टामस्करी करायचे. तिला भंडावून सोडायचे.
कना आयी ये पामळीं नकराळी;
छमक छमेली घुंगरावाळी.
कना आयी ये पामळीं नकराळी.
रंगतारो गोरो छ; चोळी तारी तंग छ;
कना आयी ये पामळी नकराळी.
कलीयुगीरो बदलो जमानो;
तोनं देखदेख गोरीया हेगे दिवाने.
छेनी ओळख सगी भेणेर;
साळी कना आयी ये पामळीं नकराळी.
अशा प्रकारे तांड्यात आलेल्या पाहुणीचे गेरीया (पुरुष) आणि गेरळीं ( स्त्रीया)गंमतीने लेंगी गितातून तिला चिडवायचे. तू आल्यामुळे तुझ्या नखऱ्याला पाहून, तुझ्या पायातील चाळीच्या आवाजाने व तुझ्या रंगरुपाने सर्व अचंबीत झालेत. मला तर तुझ्या बहिणीचीही आठवण राहीली नाही. आज तुझ्या बहिणीची मी ओळखच विसरुन गेलोय. खरेच ते दिवस भारलेले होते. ते दिवस मंतरलेले होते. येथे कोणी श्रीमंत नव्हते. कोणी गरीब नव्हते. कोणी रागावत नसत . कोणी चिडत नसत. सर्व कसे लेंगी मध्ये रत व्हायचे. लेंगीत न्हाहून निघायचे. लेंगी म्हणत सर्व मग्न व्हायचे. लाकडांच्या टिपऱ्या स्वतःच तयार करायचे. त्या टिपऱ्‍यांच्या नादावर सर्व लहान थोर बुडेठाडे सर्वच ताल धरून नाचायचे बेभान होवून, दुःख दारिद्रय विसरून.
जसजसी होळी जवळ यायची तसतशी लेंगीची नशा वाढत जायची. लेंगीमध्ये सगळेच झिंगाट व्हायचे. सैराटपणे नाचायचे. होळी दहाएक दिवस पुढे येवून ठेपल्यावर सर्व तरुण, मध्यम वयाचे पुरुष मंडळी सकाळी सकाळी जवळच्या खेड्यापाड्यात जायचे. तेथील श्रीमंत, प्रतिष्ठीत माणसाच्या घरी जायचे. तेथे त्यांच्या घरासमोर, अंगण असेल तर अंगणात फेर धरून नाचत लेंगी गायाचे. लेंगीतून त्यांचीही टर उडवायाचे. थट्टामस्करी करायचे. दोन चार लेंगी गीत एका घरासमोर म्हटल्यानंतर त्या घरचा कर्ता, कारभारी बापडा माणूस म्हणायचा, “आरे काय देवू रे तुम्हाला? मग लेंगी टोळीचा मोहरक्या म्हणायचा,” ए कायबी दे की पाटील. तूर तर गावतला लईच मोठा माणूस हाईस की . हे बग पाटील तूला सोबेल ते दे बग. उगचं मागायला लावू नकोस पुन्हा पुन्हा बरं. तुला सांगूलालाव बग”. मग तो पाटील म्हणायचा,” हे घ्या दहा रुपय देवूलालाव घ्या गुमानं व जावा” हे ऐकूण मग सगळेच एका सुरात म्हणायचे , हुड भोसी गंदावळों पटल्या कांई गंमतेती बोलरोचं भडा” (काय पाटील वासघाण बोलायले) काहीजण बंजारा भाषेतून शिव्याही द्यायचे व म्हणायचे, “आरं पाटील गावातला एवढा मोठा पाटील हाईस. तुला सोबते का धा रुपये द्यायला हं. येरी याडीरी…. आरं पाटील हामीच हाव की दहा बारा माणूस. माणसी दोन दोन रुपय तरी देकी रं.” पुन्हा कोणीतरी बंजारा भाषेत पाटलाला शिव्या हसडायचा. मग तो पाटील म्हणायचा, “साले हे लमाणी नाही.”नमानी” आहेत असे जाणार नाहीत. हे घ्या रं पंधरा रुपय आणि जावा येथून.” पाटलाच्या या म्हणण्यावर बराच खल व्हायचं.” पाटील आरं तू लई मोठं माणूस हाईस रं इतके कमी पैसे द्यायलास ते आमाला नको.” असे सगळेच म्हणायचे; पण लगेच मोहरक्या म्हणायचा. “आरं लेलो लेलो पटल्या आपळोंच छ.(घेवून टाका पाटील आपलाच माणूस आहे.)


पाटलांने दिलेले पैसे घ्यायचे व पाटलाच्या नावाने शिवी द्यायची. ती शिवी जबरदस्त राहायची,” होळी रं होळी, पुरणेर पोळी अन पटल्यार गांडेमा बंदूकेर गोळी” अशी शिवी दिल्यानंतर सर्वच जण आरोळी ठोकून द्यायचे.व होऽबोऽबोऽ असा आवज करत जोरात बोंबलायचे . गावात कोणी का भेटेना त्या सर्व माणसाला पाटीलच म्हणायचे .त्यानंतर सगळेचं हसायचे. पाटीलही मनमोकळेपणाने हसायचा. पाटलाला शिवी समजायची की नाही; पण पाटील राग करायचा नाही. तोही या सर्वांबरोबर हसण्यात हरवून जायचा. तो सगळं हासण्यावर न्यायचा.


जसजशी होळी जवळ येई तसतसे लेंगी म्हणण्याचा काळ वाढायचा. दुधाळ अशा चांदण्या रात्रीत बंजारा स्त्री पुरुष देहभान विसरून बेफामपणे नाचत राहायाचे. लेंगी गात राहायाचे. लेंगी गितातून स्त्रीया पुरुषाची टर उडवायचे तर पुरुष स्त्रीयाची टर उडावायचे. टर उडवताना, थट्टामस्करी करताना स्त्री पुरुष दोघांनाही त्यात काही अश्लीलता वाटत नसे, दिसत नसे. देवर भोजाई (दिर व भावजय) लेंगीतून एकमेकाला डिवचत असत. चिडवत असत.


देवर भोजायीला लेंगी गितातून लाडीकपणे म्हणायचा,” मारी भोजाई मारे लार हाटेन आयेची काई?” असा प्रश्न दिराने टाकला की भोजाई ही लाडाने विचारायची,” मारो देवरीया तारो भाई भांडीयेतो कांई करियां. हाटेनं लेजायेची कांईकांई दरायची” (मी तुझ्या सोबत बाजाराला येते; पण तुझा भाऊ शिव्या दिल्यातर काय करणार. मी तुझ्या सोबत बाजाराला येते पण मला काय काय घेवून देणार आहेस.) अशाप्रकारे भोजाई देवरची जुगलबंदी चालायची. या चिडवण्याचा, टर उडविल्याचा राग कोणीही करत नसत. ही थट्टामस्करी नेहमी चार हातांचा अंतर ठेवूनच केली जायची. या सगळ्या गोष्टी हासण्यावर घ्यायचे. कोणीही आपली मर्यादा ओलांडत नसत. सर्व कसे एकीने एकदिलाने एकमताने आनंदाने एकत्र नांदत असत. सण साजरा करत असत.


होळी म्हणजे आनंदाचा सण; पण आज कोठे गेले ते दिवस? कुठं गेली ती माणसं? आजचा होळी सण पाहिलं तर मन विषन्न होऊन जाते. उगीचं वाटतं माझ्या तांड्याची थोडी फार प्रगती झाली; पण प्रगतीच्या नावाखाली प्रेम, आपुलकी, माणुसकी, जिव्हाळा हे सगळं वाहून गेलय. जीवनात फक्त राहीलेय उन्हाळा. आजही मला आठवतात ते माझे सर्व चुलत भाऊ. त्याचं प्रेम आठवते. त्यांचे चालणं, त्यांचे बोलणं, त्यांचं रंगरुप हे सर्व मनचक्षूसमोर उभं राहते. त्यांचा समजूतदारपणा आठवतो. पण आज त्यांचीच औलाद असलेली त्यांची मुलं मात्र आज नातं जपायला तयार नाहीत. ते ओळख द्यायलाही तयार नाहीत. तांड्यात एकी ठेवायलाही तयार नाहीत. पिढी बदलली. तो त्यांचा दोष नाही पिढीचा आहे. आज पैसा मोठा झालय. त्यामुळे नातं गेलं चुलीत. काय करणार पापाचा बापच पैसा आहे ना!!


पन्नास वर्षापूर्वीची होळी अन् आजची होळी यात जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे. त्यावेळी फक्त प्रौढ , वयोवृद्धच नशापाणी करायचे. आजतर तांड्यातील दहा बारा वर्षाची शेंबडी पोरंही नशापाणी करत आहेत. नशापाणी केल्यानंतर नातंगोतं विसरून तांडाभर फिरून शिवराळ भाषेतून शिव्या देत आहेत. नशेच्या बाबतीत बापसे बेटा सवई आहे. बाप व मुलगा एकच प्यालाचा प्रयोग करत आहेत. याला काय म्हणावं “काळाचा महिमा” दुसरं काय.
आज तांड्यावरची होळी पूर्वीसारखी राहीलेली नाही. आज कोणालाही एकत्र येऊन होळी साजरी करण्यासाठी वेळ नाही. कोणीकोणाला विचारत नाही, कोणीकोणीला बोलत नाही. आता तांड्यातील प्रत्येक गल्लीतच होळी पेटवली जाते. नशापाणी करून कोणीकोणी घरातच होळी पेटवत आहेत. काहीजण नशा करून तांड्यात हेंडगा लावत आहेत. लेंगीगीत तर नावालाच उरलेलं आहे.


आता आपल्या हातात काय आहे? फक्त जुन्या आठवणींना चघळत बसणे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!!

M.R.RATHOD


राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली” काळेश्वरनग, विष्णुपूरी नांदेड – ६
९९२२६५२४०७

2 thoughts on “होळी: आयी रे

  1. खरंच लेख हा लेख नसून रिअल कंडिशन आहे. मी पण अशी होळी वयाच्या 16 वर्षापर्यंत अगदी जवळून बघितली आहे.

    ती होळी आणि आताची होळी यात जमीन असमानच फरक आहे. आम्ही याला रंगपंचमी म्हणायचो.
    पाळसाच्या फुलांचा कुटून रंग बनवायचो तेंव्हा.

    मज्जाच वेगळी होती…………..🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *