दिलीप वळसे-पाटील… नव्या गृहमंत्र्यांना हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. मुंबई हायकोर्टाने कथित 100 कोटी खंडणीप्रकरणाची चौकशी CBI कडे दिली आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी शरद पवारांना भेटून, त्यांनी राजीनामा दिला. यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेऊन राजीनामा सोपवला. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर ते मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. देशमुख हे नागपूरला जाण्याची शक्यता होती, मात्र ते दिल्लीला रवाना झाले.

‘ ”

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. कोर्टाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुखांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर पवारांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत, असं मलिक यांनी सांगितले. सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगून देशमुख यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.‌देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्रीपदाची सूत्रे मुख्यमंत्र्यांकडे राहणार आहे. नव्या गृहमंत्र्याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितलं.

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अॅड. जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.
सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती. अशा आशयाचे राजीनामा पत्र अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्याप्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं होतं. इतकंच नाही तर परमबीर सिंग यांनी याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करुन आपण केलेल्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्याचवेळी अॅड जयश्री पाटील यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करुन अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी केली होती. हायकोर्टानं अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे-पाटील हे गृहमंत्रीपदाचा कारभार हाती घेणार असल्याची माहिती समोर आली. त्यांच्या निवडीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दिलीप वळसे-पाटील तातडीने या खात्याची सूत्रे हाती घेतील, अशी माहिती कालच मिळाली होती. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचे आरोप लावले होते. या आरोपामुळं राज्यात मोठी खळबळ माजली होती. विरोधकांनी या प्रकरणी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली परंतु ठाकरे सरकारनं माजी न्यायमूर्तींची चौकशी समिती लावून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करू अशी भूमिका घेतली. मात्र या आरोपाच्या आधारे सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

हायकोर्टाच्या आदेशानुसार या आरोपांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले, त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला. अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला तर त्यांच्याजागी दिलीप वळसे पाटील यांना गृहखात्याचा कारभार सोपवला. सोमवारी राजीनाम्यानंतर अनिल देशमुखांनी दिल्ली गाठली. हायकोर्टाच्या आदेशाला अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता आहे. त्यासाठी रात्री त्यांनी काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

अनिल देशमुख सध्या दिल्लीत असले तरी आज सीबीआयचे अधिकारी मुंबईत दाखल होत आहेत. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर जे आरोप लावले आहेत. त्याचा तपास करण्यासाठी सीबीआय मुंबईत येणार आहे. हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे १५ दिवसांत १०० कोटी वसुलीच्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्यात येईल आणि या चौकशीत जर काही तथ्य आढळलं असेल तर सीबीआयला FIR नोंद करण्याच्या सूचनाही हायकोर्टाने दिल्या आहेत.

मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते. असा आरोप करीत राज्याच्या राजकारणात आणि पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्टॉरंट आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा धक्कादायक आरोप त्यांनी केला होता.

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी आज राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी नवनिर्वाचित गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दिलीप-वळसे पाटील यांनी सध्याचा काळ कठीण असून प्रशासकीय कामात कोणताही हस्तक्षेप न करता मला देण्यात आलेली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. यासोबतच त्यांनी राजकीय निष्ठा बाळगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांबाबतच्या प्रश्नावरही सूचक विधान केलं आहे.

पोलीस दलामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असून ते निष्ठा बाळगून काम करत असल्याबाबत दिलीप वळसे-पाटील यांना विचारण्यात आलं. “कुणाची निष्ठा काय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं दिलीप-वळसे पाटील म्हणाले आहेत.

हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार
मुंबई हायकोर्टानं परमबीर सिंग प्रकरणी दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निकालाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची महत्वाची माहिती देखील यावेली दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी दिली. यासोबतच कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार सीबीआय असो किंवा एएनआय असो सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केलं जाईल, असंही ते म्हणाले.

गृहमंत्रिपदी आता नवा वसुली मंत्री कोण? अशी भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेबाबत बोलताना दिलीप वळसे-पाटील यांनी कुणी काय आरोप करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न आहे, असं म्हटलं. येत्या काही दिवसांत सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

माजी विधानसभा अध्यक्ष आणि विद्यमान मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी राज्याच्या गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेत आशीर्वाद घेतले. दरम्यान, गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल देशमुख यांनी नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “आज माझे स्नेही दिलीपराव वळसे पाटीलजी यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!,” असे अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय

दि.७/०४/२०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *