नांदेड – भारत हा देश कधीही राष्ट्र म्हणून गणल्या गेला नाही. तो संस्थानिक आणि राजा महाराजांच्या सत्तांमध्ये विखुरलेला होता. भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्षता, विज्ञानवाद आणि समाजवाद यांवर आधारलेल्या समताधिष्ठित तत्वज्ञानातूनच भारतीय संविधानाची निर्मिती झाली. ज्या संस्कृतीने जन्मतःच माणसांची वर्ण, अवर्ण, अस्पृश्य, आदिवासी, गुन्हेगारी जमात अशी वर्गवारी केली; अशा संस्कृतीला मूठमाती देऊनच भारतीय संविधान प्रणालीतूनच नवसमाजाची निर्मिती होऊ शकते असे प्रतिपादन उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केले. ते आॅनलाईन व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ता.१० रोजी उद्घाटकीय व्याख्यानप्रसंगी बोलत होते. यावेळी संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, डॉ. प्रकाश राठोड, अशोक बुरबुरे, संजय मोखडे, भैय्यासाहेब गोडबोले, सज्जन बरडे, प्रशांत गवळे आदींची उपस्थिती होती.
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० जयंतीनिमित्त सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पहिलेच उद्घाटकीय पुष्प गुंफताना आणि ‘बाबासाहेबांचे संविधान राष्ट्र कोणासाठी? या विषयावर बोलताना श्री. माने पुढे म्हणाले की, या देशातील वर्णवादी धर्मव्यवस्था ग्रंथप्रामाण्यवादी आहे. या व्यवस्थेच्या शिक्षणपद्धतीमुळे शिकलेल्यांचे ब्राह्मणीकरण झाले. शुद्रातिशुद्रांसह स्रियांनाही व्यक्तिस्वातंत्र्याचा दर्जा, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद, निर्णयक्षमता ही बाबासाहेबांची देण आहे. समताधिष्ठित समाज हे बाबासाहेबांच्ं स्वप्नं होतं. संविधानद्रोही लोकांच्या हातात आज सत्ता आहे. त्यामुळे संविधानाची तोडमोड सुरू आहे. इथले पिढ्यानपिढ्यांचे हक्कवंचित राज्यकर्ते बनले तरच भारत हे संविधानराष्ट्र बनू शकतं. बाबासाहेबांचे संविधान राष्ट्र त्यांच्यासाठीच आहे, असेही ते म्हणाले.
महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर या कार्यक्रमासाठी पिराजी भालेराव, सुनील खांडेकर, श्रीमंत बनसोडे, शिलवंत डोंगरे, महेंद्र मुन्नेश्वर, आवेश वासनिक, चंद्रकांत बोकेफोडे, शैलेश बागुल, विशाल वाळके, उषा नगराळे, सत्यजीत साळवे,आदींनी सहभाग नोंदवला. तसेच महामंडळाचे पदाधिकारी अरविंद निकोसे, डॉ. सिमा मेश्राम, छाया खोब्रागडे, अमृत बनसोड, सुरेश खोब्रागडे, संजय डोंगरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.