डॉ. बाबासाहेब झाले नसते तर …….?


भारत हा देश माझा. हा देश विविधतेने बहरलेला नटलेला. या देशात अनेक जाती, धर्म, पंथ आहेत. वरवर का होईना आपण मोठ्या अभिमानेने म्हणतो, येथे सर्व आम्ही एक आहोत. या देशात अनेक महान थोर संत, समाजसेवक, समाज सुधारक व पुढारी होवून गेले. आजही भाषाणात आपले पुढारी सांगतात हा देश गौतम बुद्धाचा आहे. हा देश महाविराचा आहे. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा देश फुले, शाहू, आबेडकरांचा आहे. हे सगळं खरं आहे, यात दुमत आसण्याचं कारण ही नाही; पण हजारो वर्षापासून खितपत पडलेल्या, अंधारातच चाचपडत फिरणाऱ्या, शिक्षणापासुन वंचीत असलेल्या, गावकुशीच्या बाहेर डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या विकासापासून कोसो दूर असणाऱ्या समाजाचा विचार पूर्वी कोणी केला का? त्यांना फक्त गुलाम म्हणुन वागवण्यात आलं.
सकाळ संध्याकाळ हमरस्त्यावरून फिरण्यास बंदी का तर केवळ त्याच्या सावलीनेही ते तथाकथित उच्चभ्रू बाटले जायचचे. रस्ता बाटू नये म्हणून तोंडाला छोटसं मडकं बांधून फिरणारे, पायाला झांडू बांधून फिरणाऱ्या मागासवर्गीयाना छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवन जगण्याचं बळ दिलं. आठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. तिथे जातीभेद नव्हतं. थोडंस मोकळं श्वास महाराष्ट्रातील दलित, गरीब, पीडत लोकांना घेता आले. येथूनच समतेची सुरवात झाली असे म्हणता येईल. या पूर्वीही समतेविषयी थोर पुरुषांनी, संतानी, समाज सुधारकांनी खूप लिहून ठेवलंय पण ते फक्त सिद्धांतच राहीले. प्रत्यक्षात कधीच त्याची अमलबजावणी झालीच नाही.


छत्रपती शिवरायांनंतर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांनीही जातीयता मिटवण्यासाठी, समता निर्माण करण्यासाठी प्राणांची बाजी लावली. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीभेदाची दरी मिटवण्यासाठी खरी क्रांती केली. दीनदलितांचे खरे कैवारी ते झाले. बाबासाहेबांनी वरील सर्व थोर लोकांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून हजारो वर्षापासून खितपत पडलेल्या जातींना डॉ. आंबेडकर साहेबानी स्वतःचा हात देवून त्या भयान दरीतून बाहेर खेचून काढले. त्यांना जीवन म्हणजे काय असते? बाहेरचं जग कसे आहे? जातीच्या बुरसटलेल्या जाळ्यातून सर्व आठरापगड जातींना खाईतून बाहेर काढण्याचे दिव्य कार्य त्यांनी केले. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केलं, जीवन जगण्याचं बळ निर्माण केलं.
डॉ बाबासाहेब यांचे नाव उच्चारताच आपल्याला पटकन आठवते ते म्हणजे “भारताचे संविधान” मोठ्या अभिमाने आपण सहज म्हणून जातो घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
बाबासाहेब झाले नसते तर राज्यघटना लिहीली गेली नसती का? जरूर कोणी तरी लिहिलीच असती पण आज दीनदलीत, गोरगरीब आठरापगड जातीचं भारतात स्थान काय राहीलं असतं? ते कुठे व कसे जीवन जगले असते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा इतिहास पाहिलं तर बालपणापासून जीवनच्या शेवटच्या टप्यापर्यत त्यांना जातीचे चटके सहन करावे लागले. अनेकवेळा अपमान सहन करावं लागलं. जातीचे चटके सोसावे लागले. येवढं सर्व सहन करून ही त्यांनी भारतातील तमाम मागसलेल्या लोकांसाठी ऐतिहासीक कार्य केले. या कार्याला जगात तोड नाही व जोड नाही.
निवळ कल्पना करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर झाले नसते तर…..? जातीयतेच्या गर्ततेत आडकलेल्यांचं काय झालं असतं. आज जे भारतातील सर्व मागास प्रवर्ग काही अंशी का होईना सुखी आहे. तो सुखी राहीला असता का? राज्यघटनेत त्यांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय व धार्मिक अधिकार बहाल झाले असते का?

       समाजातील जातीयतेची दरी कमी करण्या करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ साली "चवदारतळे" सत्याग्रह केला; तर २५ डिसेंबर १९२७ रोजी भारतीय समाजात भेदनिती जातीयता निर्माण करणाऱ्या स्त्रीयांना दीन हीन दर्जा देणाऱ्या 'मनुस्मृतीचं' जाहीर होळी केली. तसेच विविध जाती धर्मातील स्त्रीयांना जाचक रूढी परम्परांपासून सुटका मिळावी यासाठी हिंदू कोडबिल या कायदाचा समूदा सभागृहात २४ फेब्रुवारी १९४९ रोजी मांडला होता. १९३० ला नाशकात "काळाराम मंदिर" प्रवेश करून सर्व जाती धर्माच्या लोकांना मंदिर खुले करण्यासाठी सत्याग्रह केले. त्यावेळी त्या सत्याग्रहात किमान पंधरा हजार लोक सहभागी झालेले होते ही उलेखनिय बाब आहे.
       आजघडीला वरील बाबींचा काय फायदा झाला? आज सर्वांसाठी मंदिरं खुली आहेत. शुद्रांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळाला. या मुळे थोडं का होईना समाजातील उच-निच हा भेदभाव कमी झालं. जातीची उतरंड थोडं का होईना हादरली, डगमगायला लागली. जिथे स्पर्श करणे किंवा होणे हा गुन्हा होता आज तेच सर्व आठरापगड जातीचे लोक सर्वणच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. भारताच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलत आहेत. 
        उच्च वर्णीय नेहमीच बाबासाहेबांना "तुम्ही शुद्रांचे नेते शुद्रांसाठी केलात'' आमच्यासाठी काय? यांचे उत्तर बाबासाहेबांनी लिहीलेल्या ग्रंथात व राज्यघटनेत दिलेले आहे. बाबासाहेब केवळ शुद्रांचे नेते नव्हते ते तर अखील मानव जातीचे तारणहार नेते होते. ते म्हणायचे मला तुम्ही शुद्रांचे असे संबोधता; पण माझ्यासाठी देश प्रथम व महत्वाचा आहे. देशापेक्षा कोणीही मोठा नाही. प्रथम देश 

नंतर मी. मला जर जातीच्या राजकारणावर भारताचे तुकडे करायचे असतील तर त्याला फारसा वेळ लागणार नाही तसं मी केलो नाही व करणार नाही तरी पण मी शुद्रचाच नेता कसा?
बाबासाहेब संकुचित विचाराचे, मंडूक प्रवृतीचे नव्हते. १९१९ ला इंग्रजांनी भारतीयांसाठी एक कायदा लागू करताना साऊथबरो समिती मध्ये त्यांनी मागासवर्गीयांसाठी स्वंतत्र मतदार संघाची मागणी केली होती. पण देशाच्या एकतेसाठी डॉ. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदार संघ निर्माण करायचा विचार सोडून दिला. यातून ते जातीच्या हितापेक्षा देश हिताला महत्व दिलेले दिसून येते. त्यांनी पुणे करारालाविरोध केलेला दिसून येतो. मग कोणी म्हणतील १९३४ च्या पुणे कराराला विरोध का केला? याचे उत्तर शोधताना त्यांनी १९२० ते १९३४ मध्ये केलेले जातीय, सामाजिक, राजकीय, धार्मिक व आर्थिक पाहाणीतून व कार्यातून देशातील सवर्णांनी पिढ्यांपिढ्या दलितांना छळल्यांची प्रखर जाणीव होणे हे आहे.
डॉ. आंबेडकर यांची आणखी एक देण म्हणजे “आरक्षण” या आरक्षण शब्दावरूनच “सरकारचे जावई” हा शब्द मागासवर्गीयांसाठी रुढ झाला. संविधानामध्ये आरक्षण दहा वर्षासाठीच होते. पण कोणते आरक्षण? हे कोणीही विचारात घेताना दिसत नाही. राजकारणी लोक ते आरक्षण मतासाठी वाढवत आहे हे वाक्य खेडेगावातील एखादा गंगाराम ही बोलून जातो. वाचन कमी पण ऐकणे जास्त यातून हा प्रकार घडत आहे. संविधानात आरक्षण दोन प्रकारचे आहेत. एक सामाजिक आरक्षण व दुसरे राजकीय आरक्षण.
सामाजिक आरक्षणात समता प्रस्थापीत करणे हा उदेश आहे. त्यासाठी हजारो वर्षापासुन दलित पिडीत राहीलेल्यानां न्याय मिळवून देणे हा उदेश आहे. बहुतेक सामन्य भारतीयांना “समता व समानता” यातील भेद आणखी ही समजलेला नाही असं माझं ठाम मत आहे. तर राजकारणी याचा अर्थ परिस्थिती नुसार व स्वतःच्या स्वार्थासाठी मतलबासाठी घेत आहेत.
समानता म्हणजे काय? याचं उत्तर मी असं सांगेण: समजा चार भाऊ आहेत. प्रत्येकांच्या वयात तीन वर्षांचा फरक आहे. मोठा पंधरा वर्षाचा आहे तर सगळ्यात छोटा सहा वर्षाचा. आईने चार भाकरी केल्या व त्या चार भाकरी त्या मुलांची गरज न लक्षात घेता समान वाटून दिल्या. ही झाली समानता. कोणी जेवलं का व कोणी उपाशी राहीलं का याचं देणं घेणं नाही. मोठ्याला एक भाकर पुरणार नाही व सगळ्यांत लहानला एक भाकरीची गरज भासणार नाही; पण हेच राजकारण सध्या तरी चालू आहे. समता म्हणजे: आईने केलेल्या त्या चार भाकरी मुलांच्या गरजेनुसार वाटून देणे होय. मग ही गरज कोणाची दोन भाकरीची असू शकते कोणाची चतकोर भाकरीची. सामाजिक आरक्षण म्हणजे समतेच्या तत्वावर भेदभाव नकरता समान हक्क, अधिकार विविध शैक्षणिक क्षेत्रात, नोकरीत तसेच वेगवेगळ्या संस्थेत प्रवेश, आर्थिक सवलत वगैरे मिळवून देणे. याला कुठलीही काल मर्यादा नाही. घटनेत मिळणाऱ्या सवलीतीची काल मर्यादांचा उल्लेख नाही.
राजकीय आरक्षणचा उल्लेख करताना मात्र ते दहा वर्षासाठी असावेत असे लिखीत आहे. दहा वर्षात उच्चवर्णीय सुधारतील व ते सर्व आठरापगड जातीनां सामाऊन घेतील हा त्यामागचा उदेश असू शकतो. राखीव मतदार संघ घेताना मागासवर्गीय निवडून गेलेला हा नेता फक्त मतदारसंघातील लोकांचांच विचार करेल व त्यांचं राजकीय मागसले पण दूर होईल असा विचार करेल. समाजाची प्रगती होईल पण मागासवर्गीय स्वार्थी नेते हे पक्षाकडू निवडणूक लढवून राखीव मतदार संघाचा उदेशच विफल करून टाकाला. निवडून गेलेला मागासवर्गीय उमेदवार समाजाची बाजू मांडेल, न्याय मिळवून देईल त्यामुळे त्या राखीव मतदार संघाची प्रगती होईल हा त्या मागचा विचार पण आपले मागसवर्गीय नेते वेगवेगळ्या पक्ष्यांच्या दावनीला बांधले गेले व त्यांचा पक्षांची व स्वतःची भरभराट करून घेतलेली आहे. त्यामुळे राखीव मतदार संघ नावापुरतेच राहीलेले आहेत. लोक हितापेक्षा पक्ष हितंच पाहिले जातेय व जपलं जातेय. तसेच दहा वर्षात दीन दलितही राजकीय प्रगती करतील असे घटनाकारांना वाटलं असेल; पण आजपर्यंत तरी असं घडलेलं नाही. याचे कारण मागासवर्गीय नेत्याचं विश्वास घातकी राजकारण. सत्तेसाठी आयाराम गयारामचं राजकारण हे नेते करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपण कधीच पूर्ण समजून घेतलेलं नाही. व समजून घेण्याचा प्रयत्नही केलेला दिसत नाही. आपल्याला फक्त संविधानकार डॉ. बाबासाहेबच माहित आहेत. त्यांच्यातील अष्टपैलू गुण आपण कधीच उलगडून पाहिलो नाहीत. ते वाचलो नाहीत. आपल्याला त्याची गरजही भासत नाही. जयंतीत फक्त खाऊन पिऊन डिजेवर ठेका धरणे येवढंच माहित आहे. डॉ बाबासाहेब जसे सामाजिक व राजकीय बाबतीत पारंगत होते, आग्रेसर होते. तसेच ते आर्थशास्त्राज्ञही होते. त्यांचे आर्थिक विचार ही मोलाचे आहेत. भारताच्या विकासासाठी औदयोगिकरण व कृषी क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणूकीची गरज आहे हा विचार त्यांनी सर्वांसमोर मांडला. भारतीय रिझर्व बॅन्कही डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या विचाराचीच देण आहे. The problem of rupee: It’s origin and solution या ग्रंथात त्यांचे अर्थिक विचार त्यांनी मांडलेले आहेत.
१९५१ मध्ये स्थापन झालेल्या “भारताचा वित्तीय आयोग” स्थापन करण्यात ही यांचा मोलाचा वाटा आहे. कामगारासाठीचे कायदेही त्यांनी हिरहिरीने मांडले. ते कामगाराचेही कैवारी होते. आज पाण्यासाठी आपण दाहीदिशा फिरत आहोत; पण डॉ आंबेडकर यांनी त्याकाळी लघु, मध्यम व मोठे पाटबंधारे प्रकल्प बांधण्यात मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे. त्याचे मोलाचे विचार लाभलेले आहे.
मनात विचार येतात जर डॉ बाबासाहेब आंबेडकर झाले नसते तर? भारतातील आजची आठरापगड जाती या राजकीय, आर्थिक, सामजिक बाबतीत आणखी शेकडो वर्ष पिछाडलेल्याच राहिल्या असता नाही का? जातीची उतरंड शाबुत राहीली असती. असे कित्येक गोष्टी……
मानव जातीच्या तारणहारास शतश: कोटीकोटी विनम्र अभिवादन!!!

M.R.RATHOD


राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली” काळेश्वरनगर, विष्णुपूरी, नांदेड – ६
९९ २२ ६५२४०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *