तुम्ही एकटेच असता….कोव्हीडच्या विळख्यातल्या भीतीचे दिवस–डॉ.प्रतिभा निलेश निकम (जाधव),

  सर्वांना वाटतं तसं आम्हालाही वाटायचं की, "मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर अशी आपण सर्व काळजी काटेकोर घेतोय आपल्याजवळ कसला फिरकतोय कोरोना?" पण तो कोणता गाफील क्षण होता कुणास ठाऊक? ज्या क्षणी निलूच्या सोबत त्याने घरात प्रवेश केला. सारं रुटीन व्यवस्थित सुरू होतं. निलू येवल्यात रोज ड्युटीवर व मीही कॉलेजला जात होते. शुक्रवार 2 एप्रिल 2021 रोजी निलूला कसलाच वास येईना. ह्या अनपेक्षित गोष्टीने मी घाबरून जाईन म्हणून मला निलूने एकदम सांगितले नाही पण तो आम्हा तिघांच्याही जवळ येईना दूर बसू लागला कारण अजून कोव्हीड टेस्ट केली नव्हती. मला अजूनही लक्षात येत नव्हते हा असा काय वागतोय? सकाळपासून त्याने मनात सारे नियोजन केले होते, आपण positive असलो तर अशा वातावरणात ह्या तिघांनीही बाहेर पडता कामा नये म्हणून अंगात कणकण असतानाही अधिकचा किराणा , भाजीपाला व इतर आवश्यक गोष्टी निलूने बाहेर जाऊन आणल्या. मग अगदी शांतपणे मला वास येत नसल्याचे सांगितले. "बहुदा मी कोव्हीड positive असेल. आज ग्रामीण रुग्णालयात टेस्टिंग  किट शिल्लक नाहीत,उद्या सकाळी टेस्ट करायला बोलावलंय" असे निलूने सांगताच मी खूप घाबरले कारण भयंकर बातम्या रोज चहु बाजुंनी येऊन कानावर आदळत होत्या. अगदी ध्यानीमनी नसलेली नकोशी भीतीदायक बाब घरात प्रविष्ठ होऊ पाहत होती. रात्रभर झोप लागेना. केव्हा एकदा टेस्टचा रिपोर्ट येईल? हीच प्रतीक्षा! 
        झालं , दुसऱ्या दिवशी निमगावच्या सरकारी दवाखान्यात टेस्ट केली निगेटिव्ह आली पण एव्हाना निलूला इतर लक्षणं दिसू लागलेली. कैलास चौधरी आणि संजय गायकवाड या मित्रांशी चर्चा करून आरटीपीसीआर टेस्ट केली 3 दिवसांनी रिपोर्ट आला. संबाधित लॅबने रिपीट टेस्ट करून बघितली आणि निलूची कोव्हीड टेस्ट positive  आली. मग एक वाईट, चिंताजनक-त्रासदायक असा आमच्या कुटुंबाचा प्रवास सुरू झाला.

     रिपोर्ट येण्यापूर्वीच निलूची ट्रीटमेंट व घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत विलगिकरण केले होते. ताप,अंगदुखी, प्रचंड डोकेदुखी, खोकला ,थकवा सारी लक्षणं मोठ्याप्रमाणात निलूला त्रास देऊ लागली. चव होती पण वास येत नव्हता, तिसऱ्या दिवशी वास येऊ लागला पण इतर लक्षणं त्रासदायक होती. त्याचं 3 दिवसात 2 किलो वजन कमी झालं. स्थानिक डॉकटर्सची ट्रीटमेंट सुरू होती. दिवसातून 4-5 वेळा वाफ घेणे सुरू होते. एम.डी. असलेली मुंबईची भाची फोनवर निलूला गाईड करायची. घरीच विलगीकरणात ठेऊन ट्रीटमेंट देऊ, ऍडमिट करण्याची गरज नाही असे डॉकटर म्हणाले. मला तर काही सुचत नव्हते. इतर लक्षणं कमी झाली पण डोकेदुखी व खोकला अजिबात कमी होत नव्हता. कैलास चौधरी ह्या मित्राने दटावल्यावर 9 एप्रिलला निलूने येवल्यात जाऊन एचआरसिटी केली, स्कोर 8 होता. हे सारं आम्हाला  अनपेक्षित होतं. 8 स्कोर माइल्ड असला तरी वाढू शकत होता म्हणून ऍडमिट करण्याची अत्यंत गरज होती कारण आता घरात ठेवून सुधारणा होणार नव्हती.
     दरम्यान माझी ,माझ्या कुटुंबाची काळजी असणाऱ्या, आमच्यावर खूप माया करणाऱ्या आणि आम्हा लिहिणाऱ्या पोरींची आणि कवितेचीही आई असणाऱ्या नाशिकच्या ज्येष्ठ साहित्यिक सुमती पवार यांचा फोन आला,"वातावरण बरे नाही काळजी घे, काही अडचण असल्यास लगेच कळव." मला आठवतंय, मागच्या वर्षी लॉकडाऊनची  चाहूल लागताच पहिला फोन मला करून त्यांनी सांगितलेलं, "लवकर जा, अधिकचा किराणा, भाजीपाला घेऊन ये, नाशिकमध्ये सारी दुकानं, मॉल यामधला माल संपलाय, घाई कर" मी जरी त्यांना 'ताई' म्हणत असले तरी खरं तर त्या मला माझी 'आईच' वाटत आल्यात इतक्या हक्काने,प्रेमाने, निरपेक्ष-नितळ भावनेने आईशिवाय कोण बोलतं नाही आपल्याशी? 

हो तर, ताईंचा फोन आला आणि इतके दिवस मनातच ठेवलेली निलूच्या कोव्हीडची बाब ताईंना सांगितली. ऐकून त्याही चिंताग्रस्त होत म्हणाल्या,”लगेच ऍडमिट करून टाक, तुझ्यामागे लहान मुलं आहेत ,अधिक वाढवा झाला मग काय करशील?” तोवर बेड शिल्लक नाहीत हे माध्यमात ऐकत,पाहत होते पण फार गांभीर्याने ती बाब घेतली नव्हती, वाटलं लासलगावमध्ये एखादा तर बेड भेटेल नं ,नाही असं होणार नाही. पण जेव्हा प्रत्यक्ष बेड मिळवण्याची वेळ आली तेव्हा ‘नाही,नाही’ ऐकून खूप नैराश्य येत गेलं. जिथे बेड मिळत होता तेथे मेडिसिन,इंजेक्शन्स आपण आणून द्यायचे, अद्ययावत आवश्यक सुविधा नाहीत. एव्हाना रेमिडिसिव्हरचा तुटवडा भीषण होता. त्यासाठी फिरफिर कोण करणार? काळाबाजार तर शिगेला पोहचलेला.
‘लासलगावमध्ये सुविधा उपलब्ध नाही असा’ सुमती ताईंना फोन केला त्यांनी त्यांच्या मुलाला डॉ.विशाल यांना सांगून तातडीने निलूसाठी नाशिकमधील मध्यवर्ती ठिकाणी सर्व सुविधायुक्त उत्तम हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी 10 एप्रिलला निलू नाशिकला ऍडमिट होणार होता. एव्हाना माझा घसा खवखवू लागला म्हणून प्राजक्त,निशु व माझी अँटिजेन कोव्हीड टेस्ट केली तर माझी टेस्ट positive आली ,दोन्ही मुलांची neg. होती. आता मात्र मी मन अधिक घट्ट केलं. जरी पर्याय होते तरी अशा परिस्थितीत मुलांना दुसरीकडे कुठे ठेवणार? निलू 10 एप्रिलला नाशिक येथे सुरभी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले व मी घरातच विलगिकरणात होते.अँटिबायोटिक मेडिसिन घेत होते, सर्व काळजी घेत होते. बेडरूम व किचनमध्ये सर्वत्र माझा स्पर्श होणार म्हणून मुलांची व्यवस्था हॉलमध्ये केली. मी निलू राहत होता त्या पहिल्या मजल्यावरील खोलीत राहिले असते तर स्वयंपाक, मुलांकडे लक्ष देणं शक्य नव्हतं. एव्हाना मलाही खूप थकवा जाणवू लागला, कुणाशीही संवाद नको वाटू लागला, पगार देऊन कामवाली मावशी बंद केली, घरातील सर्व कामं मीच करत होते. पहिले दोन दिवस मुलांवर जरा ओरडावं, चिडावं लागलं कारण मम्मीजवळ अजिबात यायचं नाही, मोजकं व दुरून बोलायचं हे त्यांना स्वीकारता येईना. प्राजक्तचे एकावेळी ठीक आहे पण 4 वर्षे 4 महिने वय असणारा निशु पपांशिवाय इतके दिवस राहत होता कारण मम्मी जवळ होती पण आता मम्मीपण दूर राहू लागली ,भेटेना, जवळ घेईना म्हणून लेकरू रडू लागलं. दोन दिवसात त्यालाही सवय झाली,प्राजक्त रोज त्याची अंघोळ घालू लागला, त्याचे कपडे बदलू लागला, त्याला खाऊ घालू लागला, प्रेमाने जवळ घेऊन रात्री झोपवू लागला.
दिवसभर दोघे टीव्ही, लॅपटॉप यात गुंतू लागले आणि मी किचनमधले आवरले की बेडमध्ये पडून असायचे,बाकी काहीच करायची-बोलायची इच्छा नसायची. हात सॅनिटाईझ करून,मास्क लावून किचन व हॉलच्या मधोमध मुलांचा नाश्ता, दूध,जेवण ठेवून द्यायचे. प्राजक्त मास्क लावून ते ताट उचलणार हॉलमध्ये ठेवणार, हात पुन्हा सॅनिटाइझ करणार मग ताटाला हात न लावता दोघे जेवणार. दोघांचे कपडे, पाणी , अंथरूण- पांघरूण सर्व हॉलमध्येच होतं.
बाकी भांडी, कपडे मशीनला लावणे, गच्चीवर टाकणे सर्व मी करत होते . प्राजक्तला हॉल झाडता यायचा, सांगितल्यावर त्याने फिनेल टाकून हॉल छान पुसून घेतला. दुपारी सर्व काम आवरलं की ,मला मेडिसिन व थकवा यामुळे खूप झोप यायची. बाकी इतर कोणतीच लक्षणे नव्हती. वास,चव होती. सर्दी,ताप,खोकला नाही पण थकवा व काहीशी अंगदुखी होती बस्स!आतापर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदाच वाचन- लेखनाशिवाय एवढे दिवस फुका घालवले असतील मी.
या 13 दिवसात फक्त निलूबरोबर बोलणे व्हायचे. निलू घरातच वरच्या खोलीत विलगिकरणात असतानाही आम्ही समोरासमोर नाही तर फोनवर वा व्हाट्सपवरच बोलायचो. नियमित ताप, ऑक्सिजन लेव्हल, वजन चेक करत होतो. निलू नाशिकला ऍडमिट झाला तेव्हाही आम्ही सतत एकमेकांशी बोलायचो, सतत कसलीतरी अनामिक भीती वाटायची, इतर कुणाशीच बोलणे-संपर्क नको वाटू लागला कारण शरीरात बोलण्याचेही त्राण नव्हते. फेसबुक, व्हाट्सप् वर सतत निधनाच्या बातम्या वाचून भयंकर असुरक्षित वाटू लागलं होतं. जीव कासावीस व्हायचा. एकटीच बसून राहायचे बेडमध्ये. मोजक्या लोकांना फक्त कळवलं. सासर-माहेरचे फोन सुरू होते. निलुचे मित्र डॉ.महेश,कैलासभाऊ धीर द्यायचे,बोलत राहायचे.
त्यात 15 दिवस लॉकडाऊन होणार म्हणून 13 तारखेस पुन्हा खरेदीसाठी बाहेर पडले, दवाखाना, भाजी मार्केट, दळण, गाडीत पेट्रोल टाकणे या साऱ्या बाबी आवरून घरी आले आणि एव्हाना मला उभेही राहवत नव्हते, मुलांकडे बघून पुन्हा स्वयंपाकाला लागले.
गेले 15 दिवस सतत सुमती ताई फोन,voice msg वर संपर्कात होत्या , माझे मनोधैर्य वाढवत होत्या, चांगले जेवण कर,आराम कर म्हणून रागवत होत्या, मुलांची काटेकोर काळजी घे,त्यांना दूर ठेव म्हणून सुचना करत होत्या. निलेश अगदी ठणठणीत होऊन परत येईल तू त्याची काळजी करू नको. डॉकटर हुशार आहे, उत्तम उपचार करतील सांगत होत्या. तसेच झालेही दोनच दिवसात निलूला खूप बरे वाटू लागले. आम्ही फोनवर खूप बोलायचो.
आज 14 एप्रिल रोजी सायंकाळी निलूला डिस्चार्ज मिळाला व माझा शूर कोव्हीड योद्धा विजयी होऊन घरी आलाय, खूप बरं वाटतंय. जीव भांड्यात पडला. माझी तब्येतही सुधारते आहे आता!आज आम्ही सर्वजण छान जेवलो अर्थात आपापल्या खोल्यांमध्येच!
सहा दिवस निशु माझ्यापासून दूर आहे, मी त्याला जवळ घेतलंय ना त्याच्याशी फार बोलले आहे , नजर चोरते,टाळते ,तो जवळ येऊ नये म्हणून मनाविरुद्ध त्याला रागावतेदेखील. इवल्या निरागस जीवाला मात्र काही कळत नाही, दोन-तीन दिवस कसाबसा प्राजक्तबरोबर रमला पण आता सारखा रडतो,जवळ यायचं म्हणतो,माझाही जीव तुटतोय पण नाईलाज आहे. आज तर झोपण्यापूर्वी त्याचा संयम संपलाय सारखा म्हणतोय “अंघोळ करा मम्मी म्हणजे कोरोना जाईल ,तो गेला की मी जवळ येतो तुमच्या plz मम्मी” लेकराची स्थिती आज खरोखर पाहावत नाहीये पण माझ्यातल्या आईला जरा कणखर व्हावं लागतंय….मित्रांनो, मैत्रिणींनो तुमच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून काळजी घ्या रे, कुटुंबाशिवाय जगण्यात मजा नाही, एकमेकांना जपा, हसा, बोला! कुटुंबाची मेडिक्लेम पॉलिसी जरूर काढा अशा मोठ्या खर्चिक आपत्तीत ती महत्वपूर्ण आहे,तिला पर्याय नाही. सकस अन्न घ्या, प्रोटीन अधिक खा, हळदीचे गरम पाणी प्या, दिवसातून तीनदा वाफ घ्या. ऑक्सीमिटर, थर्मामीटर घरात असू द्या, त्रास होऊ लागला की जवळच्या व्यक्तींना तात्काळ सांगा, अंगावर कोणतेही दुखणे काढू नका अजून आपली खूप स्वप्न सत्यात यायची बाकी आहेत,त्यासाठी आपल्याला खूप जगायचे आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे लक्षात ठेवा. आज आम्ही हे जवळून पाहतो आहोत म्हणून तळमळीने सांगतोय एवढेच….

मित्रहो! आपण प्रयत्नवादी, विवेक-विज्ञानवादी असले पाहिजे. ‘दैवदेव’ ह्या कपोलकल्पित काल्पनिक गोष्टी आहेत ज्या आपल्याही नकळत आपल्याला लाचार आणि मानसिक गुलाम बनवितात. आज कोट्यवधी रक्कम मंदिरं आणि पुतळे उभे करण्याऐवजी अद्ययावत सुविधायुक्त दवाखाने उभे करण्याची नितांत गरज आहे. लोकशाहीत जनता सुप्रीम आहे,मालक आहे जे विसरू नका, आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो त्यांच्याकडून आपल्या अपेक्षा, मागण्या आणि त्यांचा अजेंडा देखील ‘सुविधायुक्त अदययावत दवाखाने’ हा असला पाहिजे. आज वस्तुस्थिती अशी आहे की, 33 कोटी दगडदेव कडीकुलुपात निपचित पडून आहेत आणि विज्ञान माणसांना मरणाच्या दारातून ओढून आणतेय. तुमचा तथाकथित कोणताच देव तुमच्या मदतीसाठी धावून येणार नाही, मदतीला येतील ती माणसंच. तेव्हा दगडात नाही तर माणसात देव असतो लक्षात घ्या. जग विज्ञानाची कास धरतंय आणि आपण अजूनही ‘देवमंदिरजातधर्म’ ह्या मागास अंधश्रद्धांमध्ये अडकून पडलो आहोत. सर्वसामान्य जनता जागृत झाली पाहिजे लोकप्रतिनिधींना जाब विचारला पाहिजे, ‘निवडून आल्यावर आमच्या आरोग्यासाठी तुम्ही काय केलं म्हणून?’ आणि ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नसेल तर तुमच्याकडे आहे ‘ते तुम्ही मतपेटीतून देऊ शकता, लक्षात घ्या. ही लोकशाही अमूल्य आहे तिचे खुनी ‘ते’ आहेत तेवढेच ‘तुम्ही’देखील आहात. दैवावर विसंबून कोणाचेच भले झाले नाहीये, आपलं शिक्षण आणि आपले वागणे-विचार यात काही संबंध आहे का? प्रत्येकाने तपासला पाहिजे. वर्तमानातल्या वेदना भविष्यात भूतकाळ बनतीलही पण तुम्ही त्या विसरून न जाता ‘अद्ययावत हॉस्पिटल’चा मुद्दा लावून धरा सत्ता कुणाचीही असो जनता नेहमी विरोधी पक्ष असली पाहिजे लक्षात घ्या. आपण सर्वजण करदाते आहोत , लोकप्रतिनिधींच्या सुविधांसाठी आपण कर भरतो की जनतेच्या सुविधांसाठी? बेसिक बाबी तरी गावखेड्यावर पर्याप्त आहेत का? निवडणुकीवेळी हात जोडत तुमच्या घरी येणारा उमेदवार आता कुठे गडप झालाय? कुणी किती मदत केली? जरा हिशेब करा,जाब विचारा. कोरोनाची लाट काही काळाने ओसरेलही पण नव्या काळात अनंत नवीन प्रश्न उभे राहणार आहेत त्याबद्दल काय नियोजन आहे सरकारचे? दिवे-थाळ्या बडवून जगासमोर हसे झाले आहेच. माणसं ऑक्सिजन पातळी खालावून धडाधड तडफडून मरताय आणि देशाचा प्रमुख ‘टीकाउत्सव’ साजरा करायला लावतो यापेक्षा मोठे देशाचे दुर्दैव आणि काय असणार आहे? आपल्या पक्षाची सत्ता नसणाऱ्या राज्यांत सापत्नभावाची वागणूक देणारा ,तिथल्या गोरगरीब हवालदिल जनतेचाही काडीमात्र विचार न करणारा देशाचा प्रमुख असेल तर इथली लोकशाही धोक्यात आहे मित्रांनो!
कोट्यवधी रुपये निष्फळ मंदिरं,पुतळे उभारणीत लावण्यापेक्षा वाड्यापाड्यावर , गावखेड्यावर आरोग्यसुविधा उपलब्ध करून दिल्याच पाहिजेत अर्थात त्यासाठी जनतेने शहाणे व्हावे आता तरी! नाहीतरी धर्मांध सत्तेला जनता लाचारच हवी असते….
हे एवढं सारं लिहिण्याचं कारण म्हणजे अजूनही आपल्यापैकी अनेक लोक अजून निष्काळजी, गाफील,बेजबाबदारपणे वागत आहेत. ‘कोरोना अफवा आहे,टेस्ट करू नका, लस घेऊ नका,कोरोना मेडिकल रॅकेट आहे,राजकारण आहे’ असे चुकीचे,बिनबुडाचे संदेश पसरवणारे आपल्यातलेच महाभाग आहेत. त्यांनी जरा विचार करून अशा पोस्ट व्हायरल कराव्यात. 3 दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये गेले तर खूप विषण्ण करणारं चित्र बघितलं. पहिल्या लाटेत आताच्या 20 टक्केदेखील संसर्गाचे प्रमाण नव्हते. सतत खोकणारे, तापाने फणफणलेले आणि आपल्याला साधा फ्लू आहे असे समजणारे लोक दिसले, डॉक्टरची तपासणी फी देण्यापेक्षा परस्पर मेडिकलमधून सर्दी-तापाच्या गोळ्या घेणे त्यांना सोयीचे वाटते. निफाड लासलगावात कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. एकंदर नाशिकमध्ये रुग्णसंख्या अधिक आहे त्याचे उदा. परवा दिसलेच. मेडिकल, टेस्ट लॅब,दवाखाने यात गावखेड्यावरुन आलेली ह्या आजाराबाबत कमालीचे अज्ञान असणारी अनेक माणसे दिसली. कोव्हीड संसर्गानंतरच्या पुढच्या टेस्ट व उपचाराचा खर्च अधिक आहे. तो इथल्या गरिबांना कसा परवडणार? डिपॉझिट घेतल्याशिवाय खाजगी दवाखाने भरती करून घेत नाहीत. अर्थात ते त्यांच्यापुरते बरोबर आहे. गरिबांचा मोठ्या प्रमाणात या आजारात बळी जाणार आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, सजगता आहे ते जगतील-तगतील हे मात्र खरंय!

नाशिक शहरातील सरकारी दवाखान्याच्या आवारात लोक गलितगात्र होऊन पडलेत बेडविना, स्मशानभूमीत शवांचे दहन करायला जागा नाही एकाच वेळी अनेक मृतदेह जळताय, मृतांचे नातेवाईक दगड होऊन ते दृश्य बघताय, दुसरा पर्याय कुठेय शिल्लक????

काळजी घ्या मित्रांनो! कोरोना भयंकर आहे, कृपया हलक्यात-सहज घेऊ नका, काळजी घ्या आपली व इतरांचीदेखील एवढेच कळकळीने सांगेन बस्स…..!

—–डॉ.प्रतिभा निलेश निकम
(जाधव), लासलगाव
14 एप्रिल 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *