कोरोना काळातील आशेचा किरण : कंधारचे योगगुरू नीळकंठ मोरे

सतत गतिशीलपणे परिवर्तन करणाऱ्या सध्याच्या काळामध्ये स्पर्धेच्या कचाट्यात सापडलेल्या आणि त्यातल्या त्यात कोरोना सारख्या संसर्गाच्या दहशतीने अस्थिर झालेल्या मनाला आणि संसर्ग संक्रमणाच्या टांगत्या तलवारीखाली लॉकडाऊन झालेल्या शरीराला नवस्फूर्ती व नवचेतना देण्यासाठी निःस्वार्थ भावनेने योगसाधनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आशेचा किरण दाखवणारे योगी व्यक्तिमत्व म्हणजे कंधार येथिल आदरणीय योगगुरू नीळकंठ मोरे सर…!


खरं तर 3 हा आकडा आपण अशुभच मानत असतो पण 3 एप्रिल 2021 हा दिवस माझ्या आयुष्यात निरोगी निरामय जीवनाचं सुख घेऊन येणारा ठरला. होय याच दिवशी स्वतः पुरता विचार करून जीवन जगणाऱ्या आजच्या चंगळवादी संस्कृतीपासून कोसो दूर असणाऱ्या, अनेक व्यक्तिगत अडचणींना सामोरे जात असताना सुद्धा कोरोनाच्या या भयानक अंधारमय वातावरणात…


“जे जे आपणांशी ठावे
ते ते इतरांशी सांगावे
शहाणे करून सोडावे
सकळजन “


या संत वचनाला अनुसरून योगवर्गाच्या माध्यमातून असंख्य लोकांच्या मनात उमेद जागवणाऱ्या योगगुरु नीळकंठ मोरे सरांची Online योगवर्गात झालेली भेट म्हणजे माझ्या आयुष्यातील अमूल्य ठेवाच आहे.


3 एप्रिल 2021 पासून मी मोरे सरांच्या Online योग वर्गाला जोडलो गेलो. रोज सकाळी 5:30 ची वेळ ही आम्हा सर्व योग साधकांमध्ये चैतन्य निर्माण करणारी आल्हादायक पहाटचं आहे. रम्य सकाळी 5:30 वाजता पासून सर्वांना हरी 🕉️ करत करत 5:35 ला सर्वांना आपल्याशी एकरूप करून या निरामय योगसाधनेला सुरुवात होते. सूक्ष्म प्राणायामापासून सुरुवात होऊन टप्याटप्याने ही योगसाधना हळुवारपणे पुढे पुढे जात असते व 7:00 वाजता याला पूर्णत्व मिळून ही योगसाधना विसावते.


मोरे सरांच्या या Online योग वर्गात फक्त शारीरिक प्राणायामच केले जातात असे नाही तर व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेला मानसिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास साधण्याचा प्रयत्न या योगवर्गाच्या माध्यमातून केला जातो. योगसाधना चालू असतानाच मोरे सर मध्येच योगाचे महत्व, योग साधना कशी करावी, प्रत्येक असनाचे होणारे फायदे, आहाराचे नियोजन, कोरोना महामारीत कोणती आसने उपयुक्त आहेत, सोबतच संतांची व महापुरुषांची अमृतवचणे हे सगळं अगदी सहज व सुलभपणे सर आपल्या ओघवत्या शैलीत अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने मांडतात… हेच आमच्या Online योग वर्गाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.


मला वैयक्तिक या योगसाधनेचा खुप फायदा झाला. खूप शांतता माझ्या अंगी आली… कोणत्याही संकटाला अगदी सहजतेने सामोरे जाण्याचे आत्मबळ मला या योगवर्गामुळे आले आहे… अवघ्या 20 दिवसात माझ्या जीवनात शारीरिक व मानसिक दृष्टीने खूप सक्षमता आली आहे.

या Online योग वर्गाचा एक मोठा फायदा म्हणजे खुप सकारात्मकता माझ्या जीवनात आली. शरीर तर हलके झालेच पण मन प्रफुल्लित झाले
ही किमया फक्त योगगुरू नीळकंठ मोरे सरांची व त्यांच्या कठोर योगसाधनेचीच…!

या योग वर्गामुळे मला आलेली अनुभूती चार ओळीत….

       *माझ्या मधल्या अंधाराचे*
       *पतन व्हायला हवे*
       *या देहाच्या कणाकणाचे*
       *नयन व्हायला हवे,*

        *जसा काजवा स्वयंप्रकाशित*
        *मी ही तसे बनावे*
        *या हृदयाचा सागर आथवा*
         *गगन व्हायला हवे.*

    योगगुरू नीळकंठ मोरे मागील 20-25 वर्षांपासून नित्यनियमाने कंधार व आसपासच्या परिसरात योगवर्ग घेत असतात पण आज Online योग शिबिराच्या माध्यमातून सरांच्या योग शिबिराला विश्वव्यापी स्वरूप आले आहे.

नांदेड, महाराष्ट्र, भारत नव्हे तर जगाच्या कानकोपऱ्यातून लोक या वर्गाच्या माध्यमातून सरांशी जोडले गेले आहेत… ही किमया आहे सरांच्या खडतर योगसाधनेची व त्यांच्या प्रामाणिक व निःस्वार्थ तळमळीची…!
Online म्हंटल की काही तरी शुल्क असेल असं बऱ्याच जणांना हे वाचत असताना वाटलं असेल पण मोरे सरांचा हा योग वर्ग अगदी नि:शुल्क तर आहेच…! हे सगळं करत असताना कोणताही अविर्भाव सरात दिसून येत नाही…. कोणाची मदत त्यांना नको असतेच…. कोणी स्तुती केलेलं आवडत नाही… कदाचित इतकी सहजता व निरामयता त्यांना या योगासाधनेने प्राप्त झाली असावी…!
सतत योग योग करत लोकांच्या कल्याणासाठी अखंड योग साधना करणाऱ्या मोरे सरांकडे बघून एवढेच म्हणवे वाटते…..
जगाच्या कल्याणा
संतांचीये विभूती
तेथे कर माझे
दोन्ही जुळती”

मी देव पहिला नाही पण माणसातला देव मी नीळकंठ सरांच्या स्वरूपात पहिला असं म्हणायला मला तरी काही वावगे वाटत नाही कारण त्यांच्या नावातच नीळकंठ आहे.


ज्याप्रमाणे द्वापार युगात भगवान महादेवानी सृष्टीवर आलेले संकट नाहीसे करण्यासाठी विष प्राशन करून नीळकंठ नाव धारण केले अगदी त्याचप्रमाणे आजच्या या घोर कलियुगात कोरोनारूपी संकट आपल्या योगसाधनेच्या ताकदीने गिळणंकृत करून आपल्या सर्वांना दिलासा देणारे नीळकंठ सर माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत. म्हणून या योग महर्षी नीळकंठ सरांना व त्यांच्या योगसाधनेला अगदी सन्मानाने साष्टांग प्रणाम करतो.
“लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे “ या उक्तीप्रमाणे नीळकंठ सरांना व त्यांचा योगसाधनेला निरोगी निरामय अमरत्व लाभो हीच या विद्यात्याकडे प्रार्थना करतो…!
जाता जाता सरांना बद्दल एवढचं म्हणावंसं वाटतं…..

 *जिवन मे कुछ लोग*
 *काम ऐसे कर जाते है की*
  *रहती दुनिया जबतक*
  *नाम उनके रह जाते है,*

  *सच है मानव चरित्र कुछ ही*
  *उंचा कर पाते है*
  *उनकी उंचाई के आगे*
  *सबके शीर झुक जाते है.*

करा योग
रहा निरोग

       || हरी 🕉️||

✍🏻 प्रा. गुरुनाथ संभाजीराव उमाटे
संचालक
जिनिअस इंग्लिश स्कूल पाळा,
ता. मुखेड जि. नांदेड

  ☎️9096635777

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *