नांदेड – दिवसेंदिवस तापमापन वाढत चालले आहे. या वाढत्या उन्हाचा तडाखा माणसाबरोबरच चिमण्या पाखरांनाही बसतो आहे. कोरोनाच्या कहरात सर्वत्र रुग्ण आॅक्सिजनसाठी तडफडत आहेत. माणसं भांबावलेली आहेत. सर्वच कुटुंबांना बाहेरचे जग असुरक्षित वाटत आहे. अशाही परिस्थितीत पाण्यावाचून विव्हळणाऱ्या चिमण्या पाखरांनाही येथील सप्तगिरी काॅलनीतील काही चिमुकल्यांनी आपल्या परसातील झाडांवर छोट्या छोट्या द्रोणांमध्ये पाण्याची खास सोय केली आहे. यामुळे मुलांची प्राणीमात्रांबद्दलची मैत्री भावना वाढीस लागल्याचे लक्षात येत असून अनेकांनी चिमुकल्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
उन्हाळयात पाण्याअभावी पक्षी तडफडू लागतात. तर कधी पक्ष्यांना उष्माघाताला तोंड द्यावे लागते. आता उन्हाचे चटके मुक्या पशुपक्ष्यांना सोसावे लागत आहे. सर्व नाले, नद्या, पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे मुके पशु, पक्षी पाण्याअभावी मृत्यूमुखी पडतात. पाणी पिण्यास तात्काळ न मिळाल्यास पक्षी आकाशातून कोठेही रस्त्यावर अचानक पडतात. अशावेळी सुती कापड थंड पाण्यात बुडवून त्या पक्षाला आच्छादन देतात. पाखरांना पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी काॅलनीतील युवराज ढवळे, तन्मय कांबळे, अभिजित जाधव, अनिकेत खिल्लारे, तनिश सूर्यवंशी, असित गायकवाड, अनुष्का जोशी, पायल भावे, जयंती ढवळे या चिमुकल्यांनी पक्ष्यांसाठी पाणपोई व दाण्याची व्यवस्था करून पाण्यासोबतच पक्ष्यांच्या अन्नसुरक्षेचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाकाळात मनुष्य मनुष्याला दुरावत चालला आहे. अशा स्थितीत मनुष्य एकाकी जीवन जगत आहे. पशू, पक्षी मात्र सोबत आनंदाने जगताना दिसत आहेत. परंतु उन्हाळ्यात त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. नैसर्गिक समतोल राखण्यासाठी पशु, पक्षांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. ही नैतिक जबाबदारी सुद्धा आहे. ही जाणीव बाळगून या चिमुकल्यांनी मातीच्या कुंड्या, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, ज्यात पाणी ठेवता येईल अशा पण टाकाऊ वस्तूंपासून पाणवाट्या तयार करून त्या झाडांना बांधून त्यात दररोज पाणी टाकून पक्षी पाणपोई उपक्रम सुरू केला आहे. या वाटेवरून येता, जाता पक्ष्यांना पाणी पिताना पाहून वाटसरूंना समाधान प्राप्त होत आहे.
*..... आणि जांभळ्या सूर्यपक्षाने बांधले घरटे!*
_गेल्या महिनाभरापासून युवराज ढवळे या इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलाने घरासमोरील कण्हेरीच्या झाडावर तसेच पेरु आणि लिंबोणीच्या झाडावर चिमण्यांसाठी दाणापाण्याची सोय केली आहे. सुरुवातीला तो सरंक्षक भिंतीवर पाणी आणि दाणे ठेवत असे. मग त्यानेच तयार केलेल्या पाणवाट्यांमध्ये दररोज नियमितपणे पाणी टाकून ते झाडांच्या फांद्यांना बांधले आणि ज्वारी, गहू किंवा तांदळाचे दाणे घराच्या संरक्षक भिंतीवर ठेवले जायचे. एके दिवशी जांभळ्या सूर्यपक्षाने अंडी घालण्यासाठी कण्हेरीच्या झाडाची निवड केली. झाडाच्या एका फांदीवर आपले बस्तान बसवून घरटे बांधण्यास सुरुवात केली. आता त्या घरट्यात दोन लहानशी पिल्ले चिवचिवत असून बच्चे कंपनीला प्रचंड आनंद होत आहे._