फुलवळ ; विशेष प्रतिनिधी ( धोंडीबा बोरगावे )
संगणकाच्या युगात दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रगती होत असून याच आधुनिक तंत्रज्ञानाच्या विविध उत्पादित शेती अवजारे बाजारात उपलब्ध झाली असून सध्या त्याचाच वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतीशी निगडित पारंपारिक पद्धतीने अवजारे बनविणारे व्यावसायिक, कारागीर (गावकामगार), सुतार, लोहार, चांभार, कुंभार व घिसाडी यांच्यासह बारा बलुत्तेदारांच्या पारंपरिक व्यवसायाला खीळ बसली असून त्यातच लॉकडाऊन असल्यामुळे हा बारा बलुतेदार आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.
बळीराजा सोबत सावलीप्रमाणे राहून शेती मशागतीसाठी लागणारी अवजारे बनवून देत सहकार्य करणार सुतार हा लाकडी नांगर, बैलगाडी, तिफन, कोळपे तयार करतो, तर लोहार-घिसाडी हे नांगराची लोखंडी पहार, कोळप्यासाठी व वखारासाठी लागणारी फास, बैलगाडीच्या लाकडी चाकासाठी लागणारी लोखंडी कडी, कुऱ्हाड, विळा, कत्ती ही अवजारे तयार करतात. बैलगाडी व नांगर कोळपे, जुंपून ओढण्यासाठी ढोर -चांभार हे चामडी दोरखंड बनवून देत असतात. हे सर्व गावकामगार शेतकऱ्यांना बलुतेदार पद्धतीने पारंपारिक व्यवसाय म्हणून काम करून देत असत.
परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे विविध उत्पादित अवजारांमुळे या पारंपरिक व्यवसायाला खीळ बसली असून हा व्यवसाय चक्क नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर कुंभार, पाथरवड, झाडूवाले, पळस पानापासून द्रोण- पत्रावळी बनवणारे, चप्पल-बुट बनविणारे यांचा व्यवसाय हा अनेक बड्या कंपन्यांनी हिसकावून घेतला आहे. तर लग्नकार्यातील पारंपारिक पद्धतीने वाजंत्री वादक यांची जागा डीजेने घेतली आहे. त्यामुळे पोटावर हात घेऊन जगणारा हा कामगार आधुनिक तंत्रज्ञानातील आजारांमुळे अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.
अशा गंभीर परिस्थितीत संसाराचा गाडा कसा हकावा , मुलाबाळांची शिक्षण असे करावे आणि छोट्या मोठ्या सावकारांचे देणे कसे फेडावे याच चिंतेत दैनंदिन जीवनातील रहाटगाडा हाकत आलेला दिवस पुढे ढकलत जीवन जगत आहेत.
ह्या गाव कामगारांची कोणत्याच कार्यालयात नोंद नाही. कुठले अनुदान नाही, धंदा बंद..! त्यातच कोविड १९ मुळे घातलेले निर्बंध, या सर्व बाबींमुळे या कामगारांच्या हाताला कुठलेच काम नाही. त्यामुळे हा कामगार आर्थिक संकटात सापडला असून दैनंदिन संसाराचा गाडा चालविणे अवघड होऊन बसले आहे. त्यासाठी अशा कामगारांचा शासनाने सर्वे करून अनुदान देणे गरजेचे आहे, असे बारा बलुतेदारांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.