आजची कुटूंब पद्धती

काळ बदलत जातय. ते कोणासाठीच थांबत नाही. काळाच्या ओघात प्रवाहात काही गोष्टी तगधरून असतात काही काळाच्या एका फटक्या बरोबर कायमच्या नाहीशा होतात. तर काही तग धरत धरत हळूहळू कालानुरूप स्वता:मध्ये बदल घडवून कायमच्या टिकूण असतात. पुरातन काळी समाज म्हणजे एकाच वंशाचे एकाच रक्ताचे दहा विस स्री पुरुष असतील. त्याचा प्रमुख हाच त्यांचा कुटुंब प्रमुख. ते सांगेल तिच पूर्व दिशा. त्या कबिला प्रमुखाच्या आज्ञेबाहेर कोणीही जात नसत. सगळे कसे गुण्यागोविंदयाने एकत्र नांदत. सर्वजण आम्ही एक आहोत ही एकच प्रबळ भावना त्यांना एकत्र ठेवत होती. व त्यामुळे त्यांच्यात तंटेवाडी फारच कमी असायची. सर्वजण सुखदुःखाचे वाटेकरी असत. एकमेकांचे संरक्षण ही होई .

हळूहळू समाजातील लोकसंख्या वाढत गेली. समाज विस्तारत गेला. अनेक कबिले तयार झाले. व त्यातून पुढे आजचा समाज निर्माण झाला. समाज म्हणजे काय? सामाजिक सबंधाच्या जाळ्यांना समाज असे म्हणतात. जसं धागा विनलेला असतो तसेच सामाजिक सबंधातून समाजाची निर्मिती झालेली असते. यातला कच्चा धागा फारच नाजूक असतो. तो धागा तुटणार नाही म्हणून सर्वजण काळजी घ्यावी लागते व पूर्वीच्या काळी काळजी घेत असत. समाजातील एक धागा म्हणजे कुटूंब. कुटुंबातील व्यक्तीचे संबंध हे दाट धाग्याने विनलेले असायचे. आजही विभक्त कुटूम्ब पद्धतीत राजाराणीचे सबंधाचे धागे घट्ट विनलेले आहेत ? भौतिक सुखापायी राजाराणीचं काडीमोडचं प्रमाण ही प्रचंड वाढलेलं आहे . यामळे त्यांच्या मुलाबाळाची फरफट सुरु होते . तसेच कुटुंबातील वडीलधारी मंडळी त्या धाग्यातून दूर झालेली आहे.

पूर्वी कोणतेही दिवस साजरे करत नसत. कुठले तरी सणवार तेवढे साजरे व्हायचे. तेच दिवस लोकांना माहित असत. आजकाल प्रत्येक दिवस काहीतरी नावाने साजरा करण्यात येतो. कधी मदर्स-डे तर कधी फादर्स-डे साजरा करणाऱ्याचे आईवडील मात्र वृद्धाश्रमात असतात. कधी पर्यावरण दिवस. हा दिवस साजरा करणाऱ्या विषयी न बोलले बरे. यांना झाडं कुठं लावतात हेही माहित नसते. झाडं लावले तरी दरवर्षी खड्डा एकच झाड लावणारी माणसं मात्र बदलली जातात. तर कधी जागतिक कुटुंब दिवस. पूर्वी असे दिवस साजरे होताना खेडेगावातील, वाडी-तांड्यातील लोकांनी कधी पाहिले ही नव्हते व कधी त्याबदल फारशे ऐकलेलेही नव्हते. व अशा प्रकारचं दिन ते कधी साजराही केला नाही. पाश्चात्य संस्कृतीचे वारे वाहायला लागले व समाजात बदल होत गेलं यात भारतीय संस्कृतीतील बऱ्याच चांगल्या बाबी लयास गेल्या बाहेर पडल्या व पाश्चिमात्याचा शिरकाव झालं.

काल परवाच जागतिक कुटुंब दिवस पाळण्यात आला. आता ते कोणी कोणी पाळले? किती लोकांनी पाळले? हा संशोधनाचा विषय होवू शकतो. पूर्वी कधीच हा दिवस पाळलं गेल्याचं आठवत नाही. मग आताच हे दिवसं साजरा का करत असावेत? पूर्वी एकत्र कुटूंब पद्धती होती. एकाच घरात पाच ते सात आठ भावचं कुटुंब एकत्र नांदायचे. त्यात आजोबा आजी पणजोबा पणजीचा ही समावेश असायचा. प्राचीन काळी एकत्र कुटुंब पद्धीचे उदाहरण म्हणजे महाभारतातील कौरव व पांडव तर रामायनातील दशरथ राजाचे कुटुंब .त्यात किती माणसं नांदत होती. चाळीस पन्नास वर्षापूर्वी कधीकधी एका एका घरात तीन चार पिढ्यांही एकत्र नांदायचे. या एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे होते. या कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील सर्वजण बाह्य आक्रमणापासून सुरक्षित राहायचे. वडीलधारी स्त्री पुरुषांना त्यांचा वयानुसार मान मिळायाचा. उतार वयात त्यांची काळजी घेतली जायची. सुख दु:खात अख्या कुटुंब एकजीव राहायचे. एकावरचं संकट म्हणजे सर्व कुटुंबातील व्यक्तीवर संकट म्हणून सर्व एक दिलानं तोंड दयायचे. लहानसहान मुलांचे सामाजिक शिक्षण व्हायचे .

जशी वयस्क मंडळीची काळजी घेतली जायची तशीच कुटुंबातील छोट्या सदस्याची काळजी घ्यायची. कुटुंबातील प्रत्येक सदस्य लहान मुलामुलीची काळजी घ्यायचे. घरातील आजी आजोबा तर कुटुंबातील चालते बोलते लहान मुलांवर संस्कार घडविणारे विद्यापीठ होते. ते मुलांना सुंदर सुंदर छान छान गोष्टी सांगायचे. बडबड गित म्हणायचे. स्वतः वेगवेगळे प्राणी होवून नातू नातीला पाठीवर बसवून आंगणभर सहल घडवायचे. यात मुलांचं सामाजिक विकास व्हायचं मुलांना येथे सामाजिक, संस्कृतिक व भावनिक शिक्षण मिळायचे. वडीलधारी मंडळी म्हणजे अनौपचारिक शिक्षण देणारी शाळा. येथेच काका काकूचं प्रेम, बहिन भावांचं प्रेम, भावाभावां मधील प्रेम वृद्धीगत व्हायचं. आत्या मामांची ओळख ही येथेच व्हायची .पुढे चालून ते आणखी घट्ट होत जायचे. या एकत्र कुटुंब पद्धतीत दुबळ्याला ही सांभाळून घ्यायचे. त्याची योग्य देखभाल घेतली जायची. येथे उघड्यावर कोणीच राहत नसत. उघड्यावर पडत नसत . सर्व सदस्य प्रेमरुपी चादरी खाली झाकलेले असायचे. येथे एकच कुटूंब प्रमुख असे व त्याचा अधिकार सर्वांवर चालत असे. मी तू उचनिच असा भेदभाव नव्हता.

कालांतराने लोकसंख्या वाढली. समाजात प्रगतीचे वारे वाहू लागले. नवनविन विचार समाजात रूढ होऊ लागले. हळूहळू प्रगितीच्या नावाखाली समाजात संकुचित वृतीचा विकास झपाट्याने झालं. या तथाकथीत विकासामुळे चंगळवादी संस्कृती सुरु झाली. खावो पिओ और मजा करो ही वैयक्तिक वृती फोफावली. तसेच कुटुंबातील सदस्य संख्या वाढली पण त्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली नाही. कुटुंब पोषण्यासाठी स्वतःच्या उदर निर्वाहसाठी साधन सामुग्री कमी पडू लागली. म्हणून कुटूंबातील काही सदस्य कामानिमित्याने बाहेर पडली. बाहेर पडलेल्या व्यक्तीच्या लक्षात एक गोष्ट आली की एकत्र कुटुंब पद्धतीपेक्षा हे जिवन चांगले आहे. राजाराणी सारखे जीवन जगता येते. चांगलं चमचमीत खाता येते. मौजमजा करता येते. तेथे खाण्यापिण्याची वाटणी होती येथे तसे काहीच नव्हते. कुटुम्बातिल सर्वांची धुनीभांडी खटखटे काढण्यापेक्षा हे जीवन किती चांगले हे त्यांचा लक्षात आले व त्यातूनच एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हासास सुरवात झाली. येथेच माझं घर माझं कुटुंब ही भावना लोप पावत गेली.

इंग्रजीत घराला “house” किंवा “home” म्हणतात. व सामान्यपणे आपण दोन्ही शब्द आपल्या घरासाठी वापरतो. पण home व house या मध्ये फरक आहे. ज्या ठिकाणी कुटुंबातील माणसे प्रेमाने विश्वासाने एकत्र राहतात नांदतात. येथे घर म्हणजे केवळ चार भिंती व त्यावर छत येवढेच नसते तर येथे माया, प्रेम व जिव्हाळ्याचा सतत झरा वाहत असतो. जेथे एकाच चुलीवर स्वयंपाक करतात. जेथे एकत्र जेवतात व एकत्र झोपतात व प्रत्येकांच्या सुखदुःखात सहभागी होतात त्यास आपण home म्हणतो. बघा आपण म्हणतो का आज आपण Rest home मध्ये थांबणार आहोत. नाही म्हणत ना आपण म्हणतो Rest house मध्ये थांबू या. येथे माया प्रेम जिव्हाळा काहीही नसते. आजकालची विभक्त कुटुंब हे house मध्येच थांबतात. Home मध्ये थांबणारे फारच कमी दिसतात. House मध्ये प्रत्येकांची शारीरिक उपस्थिती असते. House हे हौस पूर्ण करण्यासाठीच असते. तेथे पक्त कोरडी उपस्थिती असते. एकत्र कुटुंब पद्धती ही सामाजिकीकरणाची, संस्कारांची एक शाळा होती पण विभक्त कुटूम्ब पद्धतीमुळे ती मोडीत निघाली. लयाला गेली.

विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकत्र कुटुंब पद्धती ऱ्हास पावली. या पद्धतीत हम दो हमारे दो ही पद्धती अस्तीत्वात आली. त्यामुळे वयस्क वडीलधारी मंडळीचे जगणेच अवघड होवून बसले आहे. तसेच लहान बालकांची ही परवड होत असते .आता बहुसंख्य मुलाला आईवडील व सूनबाईनां सासु सासरे नकोच आहेत. या विभक्त कुटुंब पद्धतीचा सर्वात मोठा तोटा म्हणजे त्या कुटुंबातील मुलांमुलीवर चांगले संस्कार घडू शकत नाहीत व घडवूही शकत नाही. कारण त्या कुटूंबातील जोडपे हे कामा निमित्याने सतत बाहेर राहतात. मुलाचे संगोपणा पेक्षा दोघांना ही कमाई करण्याची इच्छा प्रबळ झालेली आहे. भौतिक सुविधा मिळविण्यासाठी ते दोघे दिवसभर घराच्या बाहेरच राहतात. त्या मुलांना सांभळणारी बाई दामापुरतचं काम करते त्यामुळे मुलाची मानसिक, शारीरिक, भावनिक वाढ व विकास खुंटत चालले आहे. आठवा आपली आई. आपलाल्या तिच्या फाटक्या पदराखाली झाकून पाजवत होती. आठवा ते प्रेम. आठवा ते दिवस . स्तनपानामुळे आई व मुलांचे नाते घट्ट होत जाते पण आज आईचं पदरचं शिल्लक नाही .आई फक्त मुलाला जन्म देते. मुलाला समजेपर्यंत बॉटल हीच त्या मुलांची आई असते. एकत्र कुटुम्ब पद्धतीत किमान आजी आजोबा नातवांची काळजी घेत , वेळेवर भरवत पण आताच्या जोडप्याला आईवडील नकोसे वाटतात. मला वाटते त्या अक्षाताच्या तांदळाच्या दाण्यात येवढी क्षमता ऐवढी शक्ती आहे की अक्षता नवरदेवाच्या डोक्यावर आदळल्या बरोबर नवरदेवाचा मेंदू कामातून जात आहे. त्यांचां मेंदू कामच करेणासं झालं आहे. तर सूनबाइचं मेंदू तल्लख बनत आहे. मालकीन सांगेल ती पूर्व दिशा. समाजातील सर्व वडीलधारी मंडळीची असी धारणा झालेली आहे. काही कुटुंबात आजही प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ठिकूण आहे. पण वारं पूर्वीच्या प्रवाहाच्या विरोधात वाहत आहे हे निश्चित.

आजकाल असं ही घडत आहे की नवरी मुलगी कुटुंबात प्रवेश करण्यापूर्वीच नवऱ्या मुलांना सांगते आहे” मी तुमच्या आईवडील भाऊ बहीणी बरोबर घरात राहणार नाही. कोणतंचं काम करणार नाही. आपण दोघचं राहू राजाराणी सारखं. हं जमलं तर माझ्या आईवडील भाऊ बहीण यांच्या जवळ राहू पण तेथे तुमचे नातलग नको मला. या वृतीमुळे मुलाकडील वयस्क मंडळीचे बेहाल होत आहे. आज ही अवस्था समाजात सगळी कडे दिसून येते .

लग्न झालं दुसऱ्या दिवशी बाहेर. याचं ही आई वडीलांना वाईट वाटत नाही. आपला मुलगा सून कुठेही राहो पण सुखी आनंदी राहो हीच प्रत्येकांची आपेक्षा असते. पुढे नात नातू जन्माला आले तर आजी आजोबाला नातावालं जवळ घ्यावसं वाटतं पहावावसं वाटतं. छान छान गोष्टीही सांगावयासे वाटतात. पण चुकूण कधी नातू नात जवळ आलेच तर सुन मुलगा लगेच त्यांना डाफरतात. चल बाजूला हो हात धुवून घे. अरे संस्कार चांगले शिका. स्वच्छ रहा. वयानुसार आजी आजोबा कदाचीत स्वच्छ दिसत नसतील त्यांनी ज्या सुनेला पंचविस वर्षाचं होईपर्यंत पालन पोषण करून स्वतःच्या मुलाला तिच्या हवाली केलं त्या मुलांवर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले नसतील का? ज्या मुलावर संस्कार झाले नाही त्या मुलाशी तिने लग्न तरी कसं केली असेल? पण नातू नात जर आजी आजोबा म्हणून जवळ आले तर त्यांचे संस्कार चांगले राहाणार नाहीत? आजी आजोबा संस्कार हीन असातात का ? एकत्र कुटुंब पद्धतीत वयस्क मंडळीना मान सन्मान होतं. बहुसंख्य विभक्त कुटुंब पद्धतीत वडीलधाऱ्यांना अपमाना शिवाय काहीच मिळत नाही. मी सांगतोय हे सर्वच कुटुंबात घडते असे नाही. काही बोटांवर मोजण्या इतके विभक्त कुटुंब आजही चांगले आहेत. त्या ठिकाणी आजही आई वडीलाना सुखात ठेवलेले आहे त्यांचा मान सन्मान राखले जाते ;तर काही ठिकाणी फक्त नमुण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धती पहावयास मिळते. तेथे आजी आजोबांना कामांना जुपलेलं मी पाहिलेलं आहे.

m.r.rathod

आजच्या नव्या जमाण्याचं एकच नारा सून म्हणते मुलाला “तुमच्या कडील नातलागास नका प्रवेश देऊ माझ्या घरात पण माझ्या नातलगानां घराचं दार सदा सताड ठेवूया उघडं” तमाम सूनबाईनां माझी विनंती आहे जरूर तुम्ही तुमच्या आईवडीलांची काळजी घ्या पण ते करतांना सासू सासऱ्यांना नाही दुर लोटू नका. कारण तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या सासु सासऱ्यांनी ही रक्ताचं पाणी केलेले आहे. आणि हेही विसरू नका तुमच्या माहेरीही कोणीतरी सून म्हणून येणार आहे. तिच्या पुढे तुमचं आदर्श निर्माण करा. किमान नात नातूना तरी त्यांच्या आजी आजोबां पासून दुर लोटू नका. कारण नातूचा आजोबा (आजी) संसार उभा करणासाठी अपार कष्ट झेलेले आहेत. हेही लक्षात ठेवा आजोबा नात नातूचा त्याच्या जीवनातील पहिला मित्र आहे . तर नात नातू हे आजोबाच्या जीवनातील शेवटचे मित्र. म्हणून त्यानांही अधार द्या. रमू द्या त्यांना नातवात. घेवू द्या त्यांना आनंद. जगू द्या त्यांना सुखाने. मरु द्या त्यांना सुखाने नातू नातवा सोबत खेळत खेळत .

राठोड मोतीराम रुपसिंग
“गोमती सावली” काळेश्वरनगर, विष्णुपूरी, नांदेड-६
९९२२६५२४०७.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *