वेदनेतून साकार झालेलं”उजाडल्यानंतरचे स्वप्नं”

उजाडल्यानंतरचे स्वप्न”हे API पंकज विनोद कांबळे (अमरावती) यांचे पुस्तक हातात पडले आणि पाहाताच क्षणी आकर्षक मुखपृष्ठाने मन वेधुन घेतले.मुखपृष्ठ अरविंद शेलार यांचे असुन पुस्तकाला प्रस्तावना प्रा.डाॅ.गणेश चंदनशिवे यांची लाभली आहे.तर गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत.
काळ्याकुट्ट अंधारातून प्रकाशाची वाट शोधत…असंख्य स्वप्नं डोळ्यात सजवतांना ते साकार करण्यासाठी ध्येय वेडाने झपाटतांना काळजातील वेदनेला अलवार गोंजारत आहे त्या परिस्थित हार न मानता जीव तोडून केलेला प्रचंड संघर्ष म्हणजे…”उजाडल्यानंतरचे स्वप्नं”.हे आत्मकथनपर तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर….लेखक पंकज कांबळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगतीच्या मार्गावर स्वप्नांचे पंख लावून स्वकर्तृत्व सिध्द करण्याची संधी नक्कीच आजमावून बघा.


स्वप्नांना साकार करण्यासाठी धडपडणा-या युवकांची यशोगाथा यात साकारण्यात आली आहे.लेखकांने भोगलेल्या वेदनांचा लेखाजोखा अगदि जीवंतपणे मांडला आहे.वाचतांना अगदि डोळे पाणावतात.आई वडिलांच्या कष्टाचे मोल व्हावे,त्यांचे जीवन सुखद क्षणांनी सजलेले असावे हीच प्रांजळ इच्छा…निस्वार्थ भाव मनात साठवून धारधार पण,काळजात घर करुन बसलेल्या त्यांच्या प्रत्येक शब्दांनी अक्षरक्षा गहिवरुन यायला होत,खाकी वर्दीच्या आत दडलेला हळवा नायक उत्कृष्ट लेखक,कवी आणि गझलकार देखिल आहे.असा योग फार क्वचीत येत असतो.आणि तो खाकी वर्दीच्या आत दडलेल्या हळव्या दर्दी लेखकाच्या रुपाने आपल्याला वाचतांना वेळोवेळी प्रत्ययास येतो.
यातील नायक अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीत जीवन जगत असतो,तरी…मनाने मात्र श्रिमंत असलेला,मित्रांच्या दुनियेत यथेच्छ रमणारा.घरच्या हालाखिची जाणीव ठेवत…आपल्याला घराचा उध्दार करायचा हिच एकमेव आकांक्षा,अगदि बालपणापासूनच डोळसपणे पाहिलेले हे स्वप्न साकारण्यासाठी केलेली धडपड खरचं प्रेरणादायी आहे.दहावी पर्यंतचे शिक्षण गावात झाल्यावर.परिक्षा सेंटर ईसापूरची शाळा आल्यामूळे घर सोडतांना मनातील चलबिचल,नंतर निकालाचा प्रसंग देखिल उत्कृष्टरित्या मांडला आहे.आयुष्यातील एक चढाव पार केल्यानंतर बाकीची लढाई जिंकण्याच्या तयारी साठी वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे एल.एस.पी.एम.काॅलेजला अॅडमिशन घेत,काॅलेजच्या सोनेरी दुनियेत रमतांना लेखकाला खरी दुनियारी समजली.अतूल,अनिल चव्हाण,अनिल जाधव,नान्या,धम्मा यांच्यासोबत रुमवर राहातांना अनेक समस्यांचा सामना करत काॅलेज लाईफ जगतांना आभ्यासाला प्राधान्य दिल.जेवणाची गैरसोय,काॅलेजपर्यंत पायपीट करत जाऊन ज्ञानाची भूक भागवतांना पोटाची भूक क्षमवण्यासाठी गव्हाचे पीठ तेलात भाजून(पिठी) त्यात साखर टाकून भूक भागवायची कींवा पारलेजी बिस्कीट पाण्यात बूडवून खायची वेळ यायची तेव्हा सारा त्रास आटापिटा सहन करत,सारे नजरे आड करुन आभ्यास एके एके आभ्यास करत कधीच मन इतर गोष्टिने ढळू दिले नाही. कधीकधी स्वंयपाकाच्या कामाचा कंटाळा,यावरुन मित्रांमध्ये वाद व्हायचे याचा परिणाम आभ्यासावर व्हायचा,राॅकेल संपल तर फक्त नाश्त्यावर भागवायला लागायचे.निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यासाठी जेवणं बनवलं जायचं,लेखकाचे मित्र त्या ठिकाणी पोटभर जेवून यायचे,एकदिवस लेखकही मित्रांसोबत जेवण्यासाठी तिथे गेले त्यावेळी एका माणसाने अनिलचा हात धरला व म्हणाला”तुम्हाला मी चार पाच दिवसापासून बघत आहे.तुम्ही शाळेचे विद्यार्थी आहे हेही मला माहित आहे.असे…दररोज येऊ नका,उद्या आलात तर लक्षात ठेवा.या प्रसंगाने लेखकाला खूप लाज वाटली,याच वेळी उपाशी राहिलो तरी चालेल पण या पूढे कुठल्याच कार्यक्रमाला जेवायला जायचे नाही असे ठरवले.


वयात येतांना तारुण्यसुलभ भावना मनात अंकुरत असतांनाही जाणीवपूर्वक या गोष्टीकड दुर्लक्ष केले,कारण….ध्येयाला गाठण्यासाठी अश्या गोष्टि अडथळा ठरतात याचा अंदाज यातील लेखकाला प्रकर्षाने जाणवत होता.त्यामूळेच साचेबध्द चाकोरीबध्द आयुष्य जगतांना सत्य आणि कष्टाचा मार्ग अवलबंविला. आकरावीची परिक्षा झाल्यावर आई वडिलांच्या कामात मदत करतांना लेखकाला कुठलीही खंत,अथवा लाज कधीच वाटली नव्हती.तसेच तथागत गौतम बुध्द आणि डाॅ.बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रभावीत होउन लेखक आयुष्यातील स्वप्नांना आकार देण्यासाठी अविरत लढत होता.पैशाच आणि वेळेच नियोजन करत जीवन जगण्याची कला अवगत करतांना संकट मात्र कायम पुढ्यात ऊभी असायची.पण,स्वप्नांची ऊर्जा भविष्यातील येणा-या सुखाच्या क्षणांची चाहूल द्यायची.वेदना कितीही भयंकर असल्या तरी त्या सहन करायला शिकलं पाहिजे.हा लेखकाचा मूलमंत्र यशस्वी आयुष्याची गुरुकील्ली ठरला आहे.
यात अनेक प्रसंग असे रेखाटले आहेत की,वाचतांना अंगावर काटा ऊभा राहातो.यातील मुंगसाजीनगर येथे घडलेला प्रकार तर फारच भयानक आहे,कासदरे ताईंनी कौटुंबिक वादातून घराच्या बाहेर खूप दूर अंतरावर अंगावर राॅकेल टाकून स्वता:ला पेटवून घेतले…जास्त जळाल्याने त्यांना वेदना असाह्य झाल्या आणि त्या लेखकाच्या रुमच्या दिशेने विव्हळत,ओरडच आल्या…या प्रसंगाने लेखकाच्या मनात अस्वस्थता दाटली होती,बारावीची परिक्षा केवळ दिड महिन्यावर येऊन ठेपली असतांना या प्रकरणाने मात्र त्यांची झोप उडवली होती.


आई वडिलांच्या वाट्याला आलेल जीन,टीचभर पोटासाठी चाललेली धडपड लेखकाला पाहावत नव्हती.वडिलांना असलेलं दारुच व्यसन…त्यातून घराचं झालेलं नूकसान उघड्या डोळ्यांनी पाहाताना आपण उभ्या आयुष्यात दारुला कधी स्पर्श करायचा नाही हे मनात पक्क ठरवत…

सुरा-मेरय-मज्ज-ममादठ्ठाना वेरमणी
सिकखापदं समादि यामि!
या शिलाच पालन आयुष्यात करण्याचा मानस केला.तो आजपर्यंत निभावत आहेत.
अकरावी नंतर बारावीच्या पुस्तकांसाठी पैसे जमण्यासाठी आई वडिलांसोबत दररोज कामावर जाणे चालू केले.कदाचीत कष्टाशिवाय फळ नाही हे ते जाणून असावेत…उरात असंख्य स्वप्न सजवत,कोणत्याही कामाला न लाजता फक्त ध्येय साकार करायचे एवढच त्याच्या मनात बिंबलेल होत.बांधकामावर पाणी टाकतांना अचानक पाय घसरुन कॅनाॅलच्या मध्ये पडल्यावर एका अनोळखी स्त्रीने जीव वाचवला,अन्यथा काहीही प्रसंग ओढवला असता.हा जीवघेणा थरार वाचतांना अंगावर काटा ऊभा राहातो.
आभ्यासाबरोबर कविता,गाणे,नाटकं,बरोबर चित्रपट पाहाण्याचा छंद लेखकाला होता,तो जोपासत आभ्यासही मन लाऊन केला जायचा,मनात नित्य सकारात्मक व नकारात्मक विचारांच वादळ थैमान घालायच,पण…उराशी बाळगलेलं ध्येय आठवल की,ते वादळ शांत व्हायच.प्रचंड आत्मविश्वास,प्रचंड इच्छाशक्ती,आणि कल्पनाशक्तीची दौलत जोपासतांना लेखक यशाच्या मार्गावर प्रस्थान करण्यास सज्ज होता.मलिक साहेब यांच्या माॅडेलवर कामाला जात असतानांच संध्याकाळी एम.एस.सी.आय.टी.काॅम्प्युटर कोर्स ला जाणे अशी दुहेरी भुमिका निभवतांना दमछाम व्हायची पण…स्वप्नं त्यांना स्वस्थ बसू देत नसत.बघता बघता ५जून२००६निकालाचा दिवस उजाडला,बारावीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामूळे लेखक थोडा खिन्न झाला असला तरी,अपयश व अडचणी माणसाला बरच काहि शिकवतात याचा अनुभव मात्र आला.मास्तरबाबांच मोलाच मार्गदर्शन लाभल.त्यामूळे मनावर साचलेलं सर्व मळभ गळून पडलं.त्यावेळीच लेखकाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली,एम.पी.एस.सी.,यु.पी.एस.सी.बद्दल प्रचंड ओढ वाटायला लागली.विष्णू सर यांच्या मार्गदर्शनाने डी.एड.आणि डाॅ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बी.एस.सी.अॅग्री चा फार्म भरला.याच काळात लोहरा येथे असतांना स्टडी सर्कलचे स्पर्धा परिक्षेविषयीचे जुने मासिके पूर्ण वाचून काढतांना यशवंत विद्यार्थ्याचे मनोगत वाचून लेखकाला प्रेरणा मिळत गेली.याच दरम्यान त्यांची आणि पुस्तकाची चांगलीच मैत्री जमली.उच्चशिक्षणाचा श्रीगणेशा करतांना कुटूंबाची साथ लाभली..हातात आनंद पाटील यांचे भलेमोठे पुस्तक पाहून त्यावेळी लोक हसत,टिंगलटवाळी करत,पण…त्यांच्याकडे दुर्लक्ष करत स्वप्नसाकार करण्याच्या ध्येयाने नवी प्रेरणा मिळत गेली.समाजकल्याण अधिकारी दिलीप राठोड(काका)यांनी एम.पी.एसी.बद्दल असलेले बरेच गैरसमज दूर केले.मनात प्रचंड आत्मविश्वास होता.अश्यातच २००६ला पावसाळा जास्त झाला आणि त्यातच चिकनगुनिया या आजाराची साथ सगळीकडे पसरली.लेखकाच्या घरातील सदस्यांना देखिल या आजाराने ग्रासले.खूप त्रास झाला.अॅडमिशनच्या खर्चासाठी ठेवलेले सर्व पैसे दवाखान्यावर खर्च झाले.या आजारात वडिलांची आजी मात्र दगावली..लेखकावर जीवापाड मायेची सावली देणारी छत्रछाया हरवली या मूळे खूप दु:ख झाल.ज्यावेळी लेखकाने “बुध्द आणि त्यांचा धम्म”हा डाॅ.बाबासाहेब लिखित ग्रंथ वाचावयास घेतला त्यावेळी लेखकाने स्वता:चे केलेले आत्मपरिक्षण,सत्य स्विकारायच धैर्य यातून स्पष्ट होत.लेखकाच्या जीवनात आई,वडिल बहिण,भाऊ यांच्याबरोबरच आत्या(बाई) यांच्यावरही लळा होता.पुढे अमरावतीला आल्यावर लेखक चौबे फ्लॅटवर दाखल झाल्यावर आयुष्यातील सुवर्णकाळ ठरलेला श्री.शिवाजी कृषी महाविद्यालयातील चार वर्ष जीवनाला कलाटणी देऊन गेले.तसेच फस्टईअर ला झालेली रॅगिग,या प्रसंगातून झालेला मानसिक त्रास हे दिवस लेखक कधीच विसरु शकत नाहीत.परिस्थितीचे मनावरचे ओरखडे,कमी वयात भोगलेले दु:खच लेखकाला स्वप्नसाकार करण्यासाठी ऊर्मी देत गेले.आणि यातूनच लेखक अनुकूल-प्रतिकूल परिस्थित स्थिरपणे जगायला शिकले.याच दरम्यान शिवखेरा यांचं यू कॅन यू कॅन वीन(यश तुमच्या हातात आहे)ह्या पुस्तकामूळे विचारात अमुलाग्र बदल घडून आले.याच दरम्यान विशाल,नरेश,स्वप्नील यांच्याशी घट्ट मैत्री झाली.आभ्यासही भरपूर होऊ लागला.लांडे सर,गेडाम सर,डेरे सर,देशमुख सर,पाडेकर सर,गावंडे सर,दुर्गे सर,खंडारे सर,राऊत सर,पुसदकर सर,बल्की सर,मोहोड सर,मोखळे सर,शिंदे सर,निकम सर,कनसे मॅडम,चवरे मॅडम,टाले मॅडम,या सर्व प्राध्यापकांनी लेखकावर
योग्य संस्कार करुन एक प्रकारे आकार नसलेल्या मातीच्या गोळ्याला योग्य आकार देण्याचे काम केले.आणि आज तोच मातीचा गोळा आकार घेऊन नावारुपाला आला आहे.आपल्यासमोर एक कर्तव्यदक्ष अधिकारी बनून.
काॅलेज लाईफ म्हणजे आयुष्याला पडलेलं एक सोनेरी स्वप्न असत…जे आपण कधीच विसरु शकत नाही आणि विसरण्याचा प्रयत्न देखिल करत नाही.शिल्पा,शुभांगीच्या आग्राहाखातर लेखकाने पहिल्यादांच डाॅन्सच्या स्पर्धेत घेतलेला भाग आणि इव्हेंटच्यावेळी भरपूर टाळ्या मिळाल्यांचा आनंद ते शब्दात व्यक्त करु शकत नाहीत.तसेच बक्षिस वितरणाच्या वेळी पाच जणांचे नाव पुकारले तो क्षण, खूपच ऊत्कृष्ठ रित्या रेखाटला आहे.या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून lPS कृष्णप्रकाश सर यांच्या भाषणाने व व्यक्तिमत्वाने लेखक प्रभावित झाले त्यांनाच आदर्श मानून एम.पी.एस.सी.,यु.पी.एस.सी.च्या आभ्यासाला जोमाने लागले.डी.एड.ला नंबर लागून सुध्दा डी.एड.करण्याचा विचार मनातून काढून टाकण्याची प्रगल्भता केवळ आत्मविश्वासामूळे लेखकाच्या मनात रुजली..काॅलेजच्या शेवटच्या वर्षाची परिक्षा संपत असतानाच एकाच वेळी तीन पदाच्या परीक्षा पास होण्याच भाग्य लेखकाला मिळाल.या वरुन लेखकाच्या कष्टमय जीवनाची अनुभूती येते.
आतापर्यंतच्या मेहनती मूळे वेदनेवर अलवार फुंकर घालून सुखद क्षणांनी आयुष्य सजल असल…तरी, नौकरीवर रुजू झाल्यानंतर लेखकाच्या आयुष्यात बरीच उलथापालथ झाली,काही चूकीचे निर्णय अंगलट आले पण यातूनही मार्ग काढत ती वेळ ही निभवली.याच दरम्यान लेखकांच्या वडिलांना तब्येतीचा त्रास वाढला.नाकातून रक्त पडायला लागलं.सर्व पणाला लावून वडिलांनवर योग्य उपचार केले,तेव्हा ते बरे झाले.डोक्यावरच्या कर्जाचा भार खूप झालेला असल्यामूळे लेखक अक्षरक्षा डिप्रेशनमध्ये होते..यावेळी जवळच्या मित्रांचे फोन घेणे देखिल त्यांना जड जावू लागले.वेदनेचा प्रचंड भार त्यांना अस्वस्थ करु लागला.ड्यूटी आणि घर एवढेच मर्यादित आयुष्य जगतांना वाचन आणि लिखाण यावरच लक्ष केंद्रित केलं,याच दरम्यान आयुष्यात भोगलेल्या दु:खाला शब्दबध्द करण्याचा निर्णय घेऊन हे पूस्तक लिखाणास सुरुवात केली.त्यावेळी मोठ्या प्रयंत्नाअंती जगाशी एकरुप होउन सा-या समस्यांतून मार्ग काढला.आपले ध्येय एकदाचे ठरले म्हणजे रस्ते आपोआपच सापडतात…हे लेखकाला पक्के ठाऊक होते.म्हणून यशोशिखर पार करतांना त्याचा खूप फायदा झाला.
१७मे२०१०रोजी पदवीचा शेवटचा पेपर झाल्यावर लेखकाला लगेच सेल्स एक्झिक्युटीव्ह या पदाची नौकरी लागली.जिल्ह्यातील कृषी सेवा केद्रांना भेटी देणे आणि आणि कंपनीच्या प्राॅडक्टबद्दल माहीती देउन आॅर्डर घेणे हे काम लेखकाला मिळाले.जाॅब आणि आभ्यास अशी तारेवरची कसरत करत स्वप्नांना साकार करण्याची धडपड चालली होती.आपणच आपल्या आयुष्याचे शिल्पकार आहोत हे डाॅ.बाबासाहेबांचे विचार आत्मसात करतांना ध्येयपूर्तीचा मार्ग अगदि जवळच असल्याचा भास…लेखकाला व्हायचा,गोड गुलाबी स्वप्नात प्रेयसीला कवटाळून झोपावे तसे हव्या हव्या स्वप्नांना घट्ट मिठीत कवटाळून झोपणे लेखकाला आवडू लागले.या स्वप्नांनीच त्यांना घडवल,प्रसिध्दी,यश आणि सूखी जीवन बहाल केल.
PSIपूर्व परिक्षेचा रिझल्ट लागण्यापूर्वीच मोठ्या आत्मविश्वासाने लेखकाने मुख्य परिक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली.पहिल्याच प्रयत्नांत कुठल्याही माहागाड्या क्लासशिवाय पूर्व परीक्षेचा निकाल आला.त्यावेळी स्वप्नांच्या,विचारांच्या कक्षा रुंदावल्या…आता स्वप्नंच लेखकाचे जगण्याचे श्वास झाले होते.कंपनीचे काम करुन आभ्यास करतांना दमछाक व्हायची.पण आभ्यासाच्या बाबतीत कधीच माघार घेणे त्यांच्या रक्तातच नव्हते.म्हणूनच मनाप्रमाणे मुख्यपरीक्षेचा निकाल देखिल आला.मुख्यपरीक्षेच्या निकालानंतर शारीरीक चाचणीचा दिनांक २५-१२-२१० होता नागपूर येथे शारीरिक चाचणी आणि मुलाखत होणार होती,शारीरिक चाचणीची जीव तोडून तयारी केली पण…लेखकाला परीक्षेसबंधीचे प्रवेशपत्र अद्याप पोहचले नव्हते.त्यामूळे ईसापूर येथील डाकघर येथून प्रवेशपत्र मिळवुन.ते परिक्षेसाठी हजर झाले.शारीरिक चाचणी झाल्यानंतर मुलाखत झाली.मनात प्रचंड आत्मविश्वास होता आपण नक्किच यात पात्र ठरणार म्हणून…आणि अखेर तो दिवस उजाडला.दि.१७फेब्रुवारी २०१०ला लेखकाची PSI या पदासाठी निवड झाल्याचा फोन आला आणि क्षणभर आभाळच कवेत असल्याचा भास झाला.अनेकांसाठी अवघड वाटणारे यश लेखकाने अवघ्या एकवीसाव्या वर्षीच पहील्या प्रयत्नात मिळवले होते.एक वर्षाच्या ट्रेनिंग नंतर गडचिरोलीचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करुन चाॅईस पोस्टींगसाठी अमरावती शहराला प्रथम प्राधान्य दिले.आणि अमरावती येथे रुजू होतांना लेखकाच्या मनात जुन्या आठवणींचा ठेवा पुन्हा नव्याने जश्याचा तसा आठवला…आज लेखक सन्मानाने एक यशस्वी जीवन जगत आहेत संघर्ष करणा-या युवकांचे प्रेरणास्त्रोत बनून. प्रत्येकाने एकदा का होईना हे पुस्तक वाचायला हवे. त्यांना लाभलेले कुटूंबाचे योगदान, त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि सोसलेले हाल याची थोडी जरी जाणीव आपल्या हृदयापर्यंत पोचली तरी त्यांच्या जीद्दीचे,कष्टाचे सार्थक होईल.

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१


पुस्तकाचे नाव-उजाडल्यानंतरचे स्वप्नं

लेखक-APIपंकज कांबळे

मूल्य-३००/-

फोन-७९७२०४८५१३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *