कंधार ; प्रतिनिधी
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना विविध योजनेतील शासनाचे अनुदान वाटप चालू आहे.बँकेतील कर्मचारी संख्या कमी व अनुदान वितरणाची यादी मोठी त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी अनुदान उचलताना येत आहेत.ही बाब लक्षात घेवुन आता नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जिल्यातील सुमारे चार लाख खातेदारांना एटीएम कार्ड सुविधा देणार असून जिल्हात १६ ठिकाणी एटीएम मशीन बसविण्यात येणार असून विशेष म्हणजे कोणत्याही बँकेचे एटीएम चालणार असल्याची माहीती नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकचे उपाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी दिली.
कंधार येथिल त्यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, एक महिन्याच्या आत जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या मुख्यालयी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे स्वतः चे एटीएम बसवले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम एटीएम मार्फत मिळेल व कुठल्याही बँकेचे व्यवहार त्यांना एटीएम कार्डाच्या माध्यमातून करता येतील. त्यांची रक्कम त्यांना एटीएम मधून उचलता येईल. गेली पंधरा ते वीस वर्षापासून लोहा व कंधार तालुक्यातील कलंबर कारखाना बंद पडला आहे. नांदेड जिल्हा सहकारी बँकेने या कारखान्याला आर्थिक मदत केली.
या कारखान्याकडे जवळपास ५२ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ते कर्ज वसूल करण्याच्या दृष्टीने बँकेचा झालेला एनपीए कमी करण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळ व पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत बैठक घेऊन बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, बँकेचे एम.डी. कदम व आपण जिल्हा कार्यालयात ही सभा घेऊन बँकेच्या बाबतीत चर्चा केली. ज्यांनी टेंडर भरले त्यांना हा कारखाना हस्तांतरित करावा.
बँकेला मिळणारी २० कोटीची रक्कम व त्यावेळेस कर्मचारी यांना ९ कोटी रक्कम कारखान्यास दिली आहे. असे एकूण २९ कोटी रुपये ज्यांनी टेंडर भरले आहे. त्यांनी ती रक्कम अदा करावी, असा प्रस्ताव सहकार मंत्र्यांकडे पाठवून त्याला मान्यता घेण्यात आली आहे.
कारखान्याने शासनाला जी रक्कम देणे आहे ती सर्व रक्कम शासनाने माफ करावी अशी ही विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यांनी ती मागणी मान्य केली. त्यामुळे कलंबर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी पुन्हा चालू होईल आणि बँकेचे थकीत कर्ज वसूल होऊन बँकेचा एनपीए कमी होईल व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी नाबार्ड आणि राज्य सहकारी बँकेकडून सहकार्य घेऊन बँक ‘ब’ वर्गात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भोसीकरांनी सांगितले. पुर्वी प्रमाणे कर्मचाऱ्यांचा जो व्यवहार होतो, ते शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या पगारी पुर्ववत बँकेतून व्हाव्यात. त्यामुळे बँकेचा एनपीए १५ टक्के करण्याचा प्रयत्नही नवनिर्वाचित संचालक मंडळ करणार असल्याचे यावेळी सांगितले. कलंबर कारखाना पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्नही करणार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर पेठकर, कृषी उ.बा.स.चे संचालक अॅड. अंगद केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष महंमद तन्वीर उपस्थित होते.