पुरोगामी सामाजिक विचारांची सम्राज्ञी– राजमाता अहिल्याबाई होळकर

राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने माहीती

भारतीय समाजाचा विकास आणि नेतृत्व या बाबतीत महिलांच्या योगदानाचा जर विचार केला तर महिलांचे नेतृत्व उल्लेखनीय आणि महत्वपूर्ण ठरले आहे. त्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ, ताराबाई, अहिल्याबाई, सावित्रीबाई, रमाई यांच्या प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येतात. कारण त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी, नेत्रदीपक आणि अलौकीक आहे. आज यापैकीच एक खंबीर नेत्रदीपक कामगिरी पार पाडलेली स्त्री सम्राज्ञी लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म.या दिनानिमित्त त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकणार आहोत.

अहिल्याबाई होळकर हे राजघराण्यातील एक नामवंत नाव. त्यांचा जन्म 31 मे 1725 ला अहमदनगर जिल्हा जामखेड तालुक्यातील चोंढी गावात माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे यांच्यापोटी झाला. माणकोजी शिंदे हे गावचे पाटील होते. गावातील इतर जबाबदारी सांभाळत असतानाच त्यांनी अहिल्याबाईना उत्तम शिक्षण आणि संस्कार दिले. त्यामुळेच मल्हारराव व बाजीराव पेशवे यांची लहानपणी भेट झाली असताना केवळ त्यांना पाणी देऊन त्या थांबल्या नाहीत तर दोन घास जेऊन जाण्याचा आग्रह या बालिका अहिल्यांनी त्यांना केला. पुढे हेच संस्कार हेरून मल्हाररावांनी तिला आपल्या मुलांसासाठी मागणी घातली. आणि हिच अहिल्या होळकर घराण्यांच्या सुनबाई बनली.
 वयाच्या 12 वर्षी अहिल्याचा विवाह 14 वर्षाच्या खंडेरावांशी 20 मे 1737 पार पडला. मल्हाररावांनी आपल्या सुनबाई साठी सैनिकी शिक्षणाची व्यवस्था केली. घोडदौड, नेमबाजी,भालाफेक या सारख्या कौशल्यात त्यांनी प्राविण्य मिळवीले. पती आणि सासरे मोहिमेवर असताना अहिल्याबाई राजव्यवस्थेचा सर्व कारभार सांभाळत होत्या. तर कधी कधी मोहिमेवर सुद्धा त्या जात असत. पण या आनंदी कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. कुंभेंरी जिंकण्यासाठी गेलेल्या मोहिमेत खंडेरावाच्या मानेला तोफ गोळी लागून त्यांचा 17 मार्च 1754 रोजी मृत्यू झाला. तर 18 मे 1766 रोजी अचानकपणे मल्हाररावांचाही मृत्यू झाला. आणि होळकर घराणे दुःखाच्या सागरात बुडाले. पण तरीही अहिल्याबाई डगमगल्या नाहीत.


  खंडेराव आणि सासरे मल्हारराव यांच्या मृत्यूनंतर होळकर घराण्याची संपूर्ण जबाबदारी अहिल्याबाईवर आली. त्या धाडसी होत्या. दुःखाने खचून न जाता त्यांनी स्वतः धीर दिला. आणि राज्य कारभारात पुन्हा मन घातले. अहिल्याबाईंचा नेतृत्वाचा खरा कस यावेळी लागला. खरतर शासन आणि प्रशासन यांचा अनुभव अगोदरच त्यांना होता. तसेच अनेक मोहिमेत सहभागी झाल्यामुळे युद्धाचा अनुभव देखील त्यांना होता. आणि संस्थांनाचा कारभार तर त्या अगोदरपासूनच सांभाळत होत्या. पण अशाही परिस्थितीत राज्यात जे काही कटकारस्थान चालू होते, त्याचा बिमोड कसा करायचा हा मोठा प्रश्न अहिल्याबाई समोर हॊता. कारण संस्थांचे दिवाण गंगाधरपंत चंद्रचूड आणि राघोबा उर्फ रघुनाथराव पेशवे यांनी निर्माण झालेल्या हतबल परिस्थितीचा फायदा घेऊन होळकर घराण्याची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी होळकर घराण्यावर स्वारी करण्याची सूचना ही गंगोबाने राघोबाला केली होती. अशा परिस्थितीत अहिल्याबाईंना हरकुबाई व त्यांच्या कन्या उदकबाई वाघमारे, तसेच सहकारी गोविंद रघुनाथ गानू यांनी अहिल्याबाईंना मोलाची साथ दिली. आणि न भिता राघोबाशी दोन हात करावेत असा सल्ला दिला. त्याचवेळी तुकोजी होळकर यांना सुद्धा जवळ बोलावून घेतले. आणि जी राघोबाची जप्ती करण्यासाठी आलेली फौज होती त्या फौजेस अहिल्याबाईंनी यमसदनी पाठवले. या वेळी अहिल्याबाईंनी अलौकिक शौर्य, धाडस आणि मुत्सद्दीपणा दाखवला. आणि राघोबाचा डाव पार धुळीस मिळवला. यावेळी राघोबाला पाठवलेल्या पत्रात अहिल्याबाईंनी खडसावून सांगितले की “माझे राज्य हिरावून घेण्याचे तुम्ही जे कपट रचत आलात, फितुरांना तुम्ही गाठलास, मला दुबळी समजलात की खुळी? आता आपली गाठ रणांगणात पडेल. माझ्यासोबत युद्धात पारंगत स्त्रिया ही असतील. मी हरले तर कीर्ती करून जाईल, परंतु तुम्ही हरलात तर तुम्हाला तोंड दाखवायला ही जागा उरणार नाही. मी दुबळी आहे असे समजू नका. मी भाला घेऊन उभी राहिली तर तुम्हाला भारी पडेल. हे स्वराज्य माझ्या पूर्वजांनी कमावलेलं आहे त्यासाठी रक्त सांडले तरी चालेल, पण तुम्हाला भीक घालणार नाही. प्रजेचे आणि राज्याचे रक्षण करणे हा माझा धर्म आहे. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत नाही केले तर होळकररांच्या सुनेचे नाव सांगणार नाही” अशा कडक शब्दात अहिल्याबाईंनी सुनावले यातून आपल्याला अहिल्याबाईंचा मुत्सद्दीपणा, धाडसीपणा तसेच शत्रूला चोख भाषेत उत्तर कसे द्यावे हे त्यांचे कौशल्य दिसून येते.

             अहिल्याबाईंनी राज्यकारभार करत असताना अनेक सुधारणा केल्या. त्यांनी आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी विदेशी फ्रान्स चे युद्धतज्ञ ड्रेकेन आणि अमेरिकन सेनापती जे.पी. बॉयड यांची मदत सुद्धा घेतली होती. तसेच आधुनिक शस्त्रे सुद्धा गोळा केली होती. यावरून अहिल्याबाई काळाच्या एक पाऊल पुढे चालणाऱ्या एकमेव सम्राज्ञी होत्या. हे आपल्या सहज लक्षात येते.
 त्यांचा कारभार लोककल्याणकारी होता. मुलकी कारभार असो, न्यायनिवाडा असो किंवा सातबारा उतारा असो. तसेच वाटसरूसाठी बांधलेल्या धर्मशाळा, पायविहिरी, आणि उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिले. तर साहित्यिक, कलाकारांना सन्मान दिला. असे अनेक लोकोपयोगी कार्य अहिल्याबाईंनी केले. राज्यकारभार करण्यामागील आपली भूमिका त्यांनी महेश्वर येथे राजवाड्यावर लिहिली आहे. ती अशी “माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी जे जे काही करत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या मला सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडायच्या आहेत.” यावरून त्यांची प्रजेविषयी असलेली तळमळीची जाणीव होईल.

 अहिल्याबाईंनी अनिष्ट रुढी परंपरा यांना कडाडून विरोध केला.पतीच्या निधनानंतर त्या स्वतः सती तर गेल्याच नाहीत, परंतु आपल्या मुलांच्या मृत्यूनंतर सुनांना देखील सती जाण्यास त्यांनी विरोध केला. या वेळी त्यांच्या व्याह्या सोबत त्यांचा जो संवाद झाला यावरून त्यांनी अनिष्ट रूढी कशा अयोग्य आहेत, हे स्पष्ट केले. तसेच त्यांनी धर्म चिकित्सा सुद्धा केली. या वेळी त्यांनी आपल्या व्याह्यांना सांगितले की, ‘सती जाणे हा धर्म नाही, पुरुषी स्वार्थासाठी स्त्रियांवर लादलेली ही एक कुप्रथा आहे .सती जाणाऱ्या स्त्रीला स्वर्गाचे गाजर दाखवले जाते. कुठे आहे हा स्वर्ग ? कुणी पाहिल्याचा पुरावा आहे काय? एखादी स्त्री मरण पावल्या नंतर एखादा पुरुष तिच्या चितेवर सता का जात नाही? असे परखड मत व्यक्त करून अनिष्ट आणि धार्मिक परंपरेवर त्यांनी आघात केला.
     यावरून अहिल्याबाई ह्या क्रांतिकारी विचारच्या होत्या, हे लक्षात येईल.  एवढेच नाही तर हुंडा विरोध व हुंडा बंदीचा कायदा केला. अहिल्याबाईंनी ज्या रूढी अंधाराकडून प्रकाशाकडे नेतात. त्याच आम्हाला मान्य आहेत, असे परखडपणे सांगितले. त्यामुळे साहजिकच हुंड्याला त्यांनी विरोध केला. आपल्या मुलीला तर हुंडा दिलाच नाही, पण हुंडा घेणारा, देणारा आणि मध्यस्थ यांना कायद्याने दंड ठोठावण्याची तरतूद केली. असा कायदा करणाऱ्या त्या मध्ययुगातील पहिल्या महिला शासक होत्या.
 त्यांनी सर्वधर्म समभावाची भूमिका मांडली. अहिल्याबाई ह्या हिंदू होत्याच, परंतु त्यांनी इतर धर्माचा कधीच अपमान केला नाही. सर्वांना आदराने वागविले.त्यांच्या खजराना महालात ‘पिरनारसय्यद’ यांची मशीद होती. आणि तारशा नावाचा एक फकीर त्याच्या मुजावरीचे काम करत असे यावरून लक्षात येते. त्याकाळात अहिल्याबाईंनी सर्वधर्म समभावाची शिकवणूक दिली. त्या फकिरांना सांगत की, आम्ही आपल्या दर्ग्यांना वर्षासन देतो. कोणताही धर्म वैर करायला सांगत नाही. ईश्वर अल्ला एकच आहेत.

 अहिल्याबाईं ह्या ग्रंथप्रेमी होत्या. त्यांना वाचनाची आवड होती. बालपणापासून मिळालेले उत्तम संस्कार तसेच कर्तृत्वान मातापिता, सासू सासरे यांचा आदर्श डोळ्यासमोर असलेल्या अहिल्याबाईंनी धर्म, संस्कृती, कला, साहित्य, राजकारण,अर्थकारण यांच्यावरील पुस्तकांचे वाचन सखोलपणे केले होते. याची साक्ष त्यांचे स्वतःचे ग्रंथागार महेश्वर देते. तसेच त्यांनी अनेक ठिकाणी माणसे पाठवून दुर्मिळ असे ग्रंथ मागवून घेतले. या ग्रंथाची यादी खूप मोठी आहे. त्यांची नावे जर पाहिली तर त्यांचा व्यासंग कोणत्या पातळीवरचा होता, हे आपल्या ध्यानात येईल.


 श्रीधर अध्याय 18, गीतगोविंद सतिक पत्रे, चित्रषष्टीमीमांसा, मुहूर्त चिंतामणी असे अनेक ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केलेला आपल्याला दिसून येईल. त्यावेळी अहिल्याबाईंच्या ग्रंथगाराचा लाभ घेण्यासाठी परदेशातून अनेक जण महेश्वर येथे येत असत. राजमाता अहिल्याबाई यांच्या जीवनावर दृष्टीक्षेप टाकला तर प्रजा हीत,दक्षता, न्याय बुद्धी, मुत्सद्देगिरी, दानशूर पणा,धाडस,धैर्य आणि चातुर्य या गुणांचा संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो.त्यांचे हे बहुमोल विचार आम्ही मनामनात रुजविले पाहिजे. या थोर आदर्श स्त्री सम्राज्ञी राज्यकर्ती अहिल्याबाईस सत्तर वर्षाचे आयुष्य लाभले. आणि 3 आँगष्ट 1795 त्यांचे निधन झाले.आज या मंगल दिन अहिल्यामाईंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना आणि कार्यना कोटीकोटी प्रणाम.

     – बाबुराव पाईकराव*             

                 डोंगरकडा.     

             mo. 9665711514

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *