मराठा आरक्षणाच्या भळभळत्या जखमेवर भगवी मलमपट्टी

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन (6 जून 1674) संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरात आज म्हणजे 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना 1 जून रोजीच तशा प्रकारचा सरकारी आदेश जारी करण्यात आला होता. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये आणि काही ठिकाणी शाळेतही ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यासंबंधीचे महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी करण्यात आले होते. यासंदर्भातील सूचना ग्रामविकास विभागाने 1 जानेवारी 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या आहेत.

त्याच आदेशात शिवस्वराज्य दिन साजरा करण्याची नियमावलीही जारी करण्यात आली होती. भगवा स्वराज्यध्वज संहिता ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी. हा ध्वज 3 फुट रुंद आणि 6 फुट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा, वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.
शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता, शिवशक राजदंडाचे प्रतीक म्हणुन कमीतकमी 15 फुट उंचीचा वासा किंवा बांबु असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान 5 ते 6 फुटाचा आधार द्यावा. यासाठी आवश्यक साहित्य म्हणून जे नमूद करण्यात आले आहे ते असे: सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद कुंकु, ध्वनीक्षेपक. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी कशी उभारावी याबाबत मार्गदर्शन केले आहे. ६ जून सकाळी ९ वाजता शिवशक राजदंडावर भगवा स्वराजध्वज बांधुन घ्यावा.
शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या झोळीमधे रिता करुन स्वतंची झोळी सुख, समृध्दी, समता व स्वातंत्र्याने भरली म्हणुन शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा “सुवर्ण कलश” बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्यगुढी हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी सरळ उभी करावी. तदनंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणुन सांगता करावी. सुर्यास्ताला शिवशक राजदंड स्वराज्यगुढी खाली घ्यावी. भगवा स्वराज्यध्वज व्यवस्थित घडी करून ठेवून द्यावा.

जिल्हा मुख्यालय येथे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकारी, अधिकारी/कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधाबाबत शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे पालन करुन हा दिन साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे व राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करुन कार्यक्रम संपन्न करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यंदा कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्ये हा दिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली होती.

भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते असं मत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलं आहे. 6 जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशा प्रकारचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर अॅड. सदावर्ते यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे.

अॅड. सदावर्ते आणि अॅड. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक लेखी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत असं म्हटलं आहे की, भारतीय संविधान आणि राष्ट्रध्वज संहिता 2002-2006 नुसार सरकारी कार्यालयावर फक्त राष्ट्रध्वज फडकवण्याची मुभा आहे. त्यामुळे भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते. उद्या कुणीही येईल निजामचा ध्वज लावा, मोगलांचा झेंडा लावा, पेशव्यांचा झेंडा लावा म्हणू शकतो, किंवा सम्राट अशोकाचा ध्वज फडकावा असेही म्हणेल. संविधानाच्या 362 कलमानुसार संपुष्टात आलेली राजेशाही पुन्हा प्रस्थापित करणारा हा निर्णय आहे. त्यामुळे असा निर्णय घेणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी अन्यथा सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही सदावर्ते यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

शिवराज्यभिषेक दिनाचे धार्मिक अवडंबर करु नये. शिवराज्याभिषेक केवळ राजदंड व भगवा झेंडा उभारुन साजरा करण्याचं आवाहन मराठा सेवा संघाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

शिवस्वराज्य दिन रोखण्याची कुणाची ताकद आहे? हसन मुश्रीफ यांनी अॅड. सदावर्ते यांना प्रत्युत्तर दिलं आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनी भगवा फडकवण्याला विरोध केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शिवस्वराज्य दिन साजरा होणारच असं सांगत सदावर्ते यांना भाजपची फूस असल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला राज्यकारभार! शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासही नख न लावणे म्हणजे शेतकऱ्यांना काडीचाही त्रास होणार नाही अशी आज्ञा देणारा इतिहासातील पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सतराव्या शतकात या महाराष्ट्रात भूमीपुत्रांचे हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केले. परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधिशांशी, वतनदारांशी अनेक लढाया, युध्दे लढून या महाराष्ट्र भूमीत स्वराज्याची निर्मिती केली. जुलमी राजवटी संपुष्टात आणण्यासाठी सर्व जातीधर्माच्या अठरापगड बारा बलुतेदार, जिवाभावाचे मावळे एकत्र करुन हा लढा दिला. अनेक किल्ले सर केले. जनतेसाठी कसे राज्य करावे याचा आदर्श निर्माण केला. आपल्या राज्यातील जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक वटहुकुम काढले. या महाराष्ट्रातील तमाम जातीधर्माचे लोक या स्वराज्याच्या कार्यात सामील झाले.

महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांबरोबरच शिवराज्याभिषेक दिवस राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमध्ये साजरा करण्याचे
सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा सरकारी जीआर खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे सुपुर्द केला. ही कुठलीही राजकीय भेट नव्हती, त्यांना या निर्णयाची माहिती दिली, असे उदय सामंत यांनी सांगितले. यावर शिवस्वराज्य दिनाबद्दल उदय सामंतांनी जो जीआर काढलाय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. शिवराज्याभिषेक हा राष्ट्रीय सण होण्याचा हा पहिला टप्पा आहे. शाळांमध्ये देखील अशाच प्रकारे शिवस्वराज्य दिन साजरा व्हावा, असे खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

यावर्षी शासन पातळीवर राज्यभर ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. तर पुढील वर्षीपासून शिवज्योत रॅलीही काढण्यात येणार आहे. ६ जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालयात तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करायचा आहे. दर वर्षी हा दिवस महाराष्ट्रात रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो परंतु या वर्षी 6 जून 2021 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात “शिवस्वराज्य दिन” म्हणून साजरा करायचा आहे, असा अध्यादेश जारी करण्यात आला.

सरकारच्या या आदेशाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध दर्शवला आहे. शासकीय कार्यालयांमध्ये तिरंग्याच्या व्यतिरिक्त कोणताही ध्वज लावण्यास परवानगी नसते. हा प्रकार देशाच्या एकसंधतेचा अवमान करण्याचा आणि संविधानाची पायमल्ली करणारा असल्याचं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हा आदेश रद्द करावा आणि तो काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तशीच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सदावर्तेंनी केली आहे. हा प्रकार म्हणजे देशद्रोह असून जर हा आदेश मागं घेतला नाही, तर सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेईल असे स्टेटमेंट गुणरत्न सदावर्ते यांनी केले .

गुणरत्न सदावर्ते यांनी शिवस्वराज्य दिनाला विरोध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलण्याचा धाडस या राज्यात कोण करू शकतो. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे का, याचा तपास केला पाहिजे, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले. ते शनिवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी सातत्याने मराठाविरोधी काम करत आहेत. त्यांचे आणि भाजपचे काही संबंध आहेत का, हे तपासण्याची गरज आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले.

हा प्रकार म्हणजे देशद्रोही कृत्य असल्याची टीका सदावर्ते यांनी केली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता. तसंच या मुद्द्यावरून मराठा नेत्यांवर टीका केली होती. या प्रकरणीदेखिल मराठा समाजाला खूश करण्यासाठी सरकार हे करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळं यावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

समाजमाध्यमांवर शासनाच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. मराठा आरक्षणावर ६ जून पर्यंत निर्णय घेण्याचे राज्य सरकारला खा. संभाजी राजे भोसले यांनी दिले होते. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते की, अजून नऊ दिवस आहेत. एवढ्या दिवसांत खूप काही होऊ शकतं. आणि ते झालेलं आपण पाहतो आहोत. सहा जूनला रायगडावरून आंदोलनाचा यल्गार पुकारला जाणार होता.

शिवस्वराज्य दिन म्हणजे भगवा ध्वज उभारुन आरक्षण नावाच्या भळभळत्या जखमेवर प्रश्नावर भगवी मलमपट्टी असल्याचे बोलले जात आहे.

आज दिवसभर अनेक ठिकाणी शिवस्वराज्य दिन साजरा झाल्याच्या बातम्या आणि फोटो सोशल मीडियावर झळकत होत्या. लोकांनीही आपली मते व्यक्त केली आहेत

🎤’शासकीय कार्यालयावर फक्त तिरंगा असला पाहिजे…
भले सरकार कोणाचेही असू दे…तो झेंडा भगवा असू, हिरवा असू, निळा असू, भाजपचा असू, काँग्रेसचा असू किंवा कोणत्याही पक्षाचा, धर्माचा असू तरी कोणालाही Permission नाही…बाकीचे झेंडे फक्त स्वतःच्या धार्मिक स्थळावर, पक्ष कार्यालयावर, घरावर लावावे…सरकारी कार्यालयात नाही…’

🎤’देशाचा राष्ट्रीय ध्वज कसा असावा हा कुठल्या तरी एका समाजाचा निर्णय नाही त्यावर सखोल अभ्यास चर्चा करून सर्वानुमते तत्कालीन नेते मंडळी यांनी तिरंगा ध्वज मंजूर केला आहे. मग भगवा जरी स्वराज्याच प्रतीक असले तरी सुद्धा शिवशाहीतूनच लोकशाही उदयास आली. आणि ती टिकविणे लोकांची जबाबदारी आहे.’

🎤’कोणत्याही धर्माच्या धार्मिक प्रचारकांनी आमच्या धर्माचा धर्मग्रंथ श्रेष्ठ,असं तुणतुणं कितीही वेळा वाजवलं तरी भारतीय संविधान हेच सर्वश्रेष्ठ आहे, हे भारताच्या सूजान नागरिकांने लक्षात ठेवायला हवं,आणि भारतातील लोकशाहीच्या मंदिराचा पाया हा संविधानावर ऊभा आहे हेही ध्यानात ठेवायला हवे.’

🎤 ‘अशोक चक्रांकीत तिरंग्याशिवाय कोणताही ध्वज आम्हा ‘भारतीयांना’ प्रिय नाही. सरकारी कार्यालयावर भगवा.
शिवसेनेपूढे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस लाचार.सत्तेसाठी घटनाबाह्य कृतीचे समर्थन.’

🎤’शासकिय कार्यालयात भगवा, स्वराज्य गुडी म्हणुन उभारला जाणे, भावनिक बरे वाटत असेल. पण, असे करण्याने छत्रपतींवरील श्रद्धा सिद्ध होऊ शकते, ना लोककल्याणकारी कार्य! अशा प्रतिकांआडून सरकार लोकभावनेला हुल देत आहे. असा प्रकार,राष्ट्राला नविन संकट व समस्यांकडे नेहणारा हा सेतु ठरेल! या बाबत स्पष्ट बोलणे, गरजेचे आहे.

🎤’संविधानामुळे देश चालतो तुमच्या धर्माच्या अस्मितामुळे नाही. धर्माचा उन्माद माजवू नका.नाहीतर राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येईल.’

मराठा आरक्षणाचा आपणा लढा देत आहोत. काही लोकं नाराज झाले तरी चालतील, पण समाजाला वेठीस धरणार नाही, कुणाचाही दिशाभूल करणार नाही. पण, आपल्याला समाजाला दिशा देण्याचे काम करायचे आहे. आता कितीही नाराज झाले तरी चालतील, शिवाजीराजे यांनी जे समाजासाठी कार्य केले होते, तेच आपल्याला पुढे न्यायचे आहे. पण आता कोरोनाचं संकट असल्यामुळे आपल्याला काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं संभाजीराजे थेट रायगडावरून म्हणाले आहेत.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. नेते आणि मंत्री एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही  खेळ सुरू केला आहे, मी खेळ होऊ देणार नाही. आमचा संयम तुम्ही पाहिला, पण आता काही झाले तरी मागे हटणार नाही. मी मेलो तरी चालेल पण, मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. त्यामुळे कोल्हापूरमधून 16 जून रोजी पहिले आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही संभाजीराजेंनी केली आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *