प्लॉटच्या कारणावरून मारहाण व धमकी दिल्याचे प्रकरण
कंधार,( प्रतिनिधी ) दि.६ प्लॉटच्या कारणावरून एकास मारहाण करून त्याचे दगडाने डोके फोडल्याची घटना काटकळंबा येथे घडली आहे. या प्रकरणी भाजपा युवा मोर्चाचे कंधार तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगीर यांच्या सह चार जणा विरोधात उस्मान नगर पोलिसात विविध कालमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील शेतकरी संतोष शंकरराव हंमपल्ले (वय ३६ वर्ष) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत काटकळंबा येथे असलेले वडिलोपार्जित प्लॉटच्या कारणावरून फिर्यादी व त्यांचे चुलते सूर्यकांत नागनाथ हंमपल्ले व त्यांच्या मुला सोबत यापूर्वी भांडण तंटा झाला होता. त्यासंदर्भात उस्मान नगर पोलिसात फिर्यादी यांनी तक्रार ही दिली होती.
दि.२० मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास संतोष हंमपल्ले शेतास जाण्यासाठी घराबाहेर पाडले असता त्याच्या शेजारीच राहात आलेले त्याचे चुलते सुर्यकांत नागनाथ हंमपल्ले, गजानन सुर्यकांत हंमपल्ले, साईनाथ सुर्यकांत हंमपल्ले व साईनाथ विश्वनाथ कोलगिर या चौघांनी संतोषच्या जवळ येवून तुला प्लॉट पाहिजे काय, असे म्हणून शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. संतोष ची पत्नी सोडवण्यास आली असता तिला ढकलून दिले. व संतोषचा चुलत भाऊ साईनाथ हंमपल्ले याने दगडाने संतोषच्या डोक्याच्या मागील बाजूस मारल्याने त्याचे डोके फुटले त्यामुळे त्यास जबर दुखापत झाली. त्यावेळी गावातील लोकांनी मध्यस्ती केली. तु जर पुन्हा प्लॉटचा विषय काढलास तर तुला व तुझ्या परिवारास जिवंत सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी ही या चौघांनी त्यावेळी संतोषला दिली.
जखमी झालेल्या संतोष हंमपल्ले यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. दि.३ जून रोजी संतोषने रुग्णालयातूनच दिलेल्या फिर्यादी वरून रविवार दि.५ जून रोजी उस्मान नगर पोलिसात भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष साईनाथ कोळगीर, सुर्यकांत हंमपल्ले, गजानन हंमपल्ले, साईनाथ हंमपल्ले यांच्या विरोधात विविध कालमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.