नांदेड दि. 10 :- सेतू समितीच्यावतीने होणाऱ्या विविध पदाच्या कंत्राटी पदभरतीच्या नावाखाली अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची जिल्हा प्रशासनाने तात्काळ गंभीर दखल घेतली असून पोलिस विभागातर्फे यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे. उमेदवारांशी कोणी जर संपर्क साधून जर काही मागणी करत असेल तर याची तात्काळ माहिती पोलिस विभागाला कळवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
नांदेड जिल्हा कार्यालयांतर्गत सेतू समितीच्यावतीने होणाऱ्या विविध पदाच्या कंत्राटी पदभरती संदर्भातील पदभरतीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयास काही विद्यार्थ्यांनी अर्ज केली आहेत. तशी त्यांची नियमानुसार प्रतिक्षा निवड यादी तयार झाली आहे. परंतू या निवड यादीतील विद्यार्थ्यांना अज्ञात व्यक्तींकडून पैशाची मागणी वारंवार होत आहे.
गुरुवार 10 जून रोजी काही पात्र विद्यार्थ्यांना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्या खात्यात पैसे भरण्याच्या संदर्भात फोन करुन पैशाची मागणी झाली आहे. यापुढे तसे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त तक्रारीचे अर्ज योग्य त्या कार्यवाहीसाठी सायबर सेल व पोलीस विभागाकडे पाठविण्यात आली आहेत.