कंधार ; प्रतिनिधी
खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, कृषी विभाग जिल्हा परिषद ,कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, यांचे शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांच्याद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे याबाबत नियोजन करण्यात आले आहे अशी माहीती तालुका कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी दिली.
कृषी तंत्रज्ञानातील छोटी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. कृषी विभागामार्फत यापूर्वी दरवर्षी एक जुलै पासून प्रचार व प्रसिद्धी सत्राची सुरुवात करण्यात येत असे परंतु तोपर्यंत खरीप पिकांचा पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरू होऊन गेलेला असतो ही बाब लक्षात घेऊन यावर्षी प्रचार प्रसिद्धी मोहीम १ जुलै अगोदर करण्याच्या बाबतीत निर्णय झाला असून २०२१ मध्ये २१ जून २०२१ ते १ जुलै २०२१ या कालावधीत कृषी संजीवनी साजरी करणे बाबत नियोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत राज्यात एकाच दिवशी एकाच मोहिमेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. त्यामध्ये दिनांक २१ जून २०२१ रोजी रुंद वरंबा-सरी तंत्रज्ञान , २२ जून रोजी बीजप्रक्रिया,२४ जून रोजी जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर ,२४ जून रोजी कापूस एक गाव एक वाण, २५ जून विकेल ते पिकेल,२८ जून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, २९ जून तालुक्यातील दोन पिकाची उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकर्यांचा सहभाग,३० जून तालुक्यातील महत्त्वाच्या पिकांवरील कीड रोग नियंत्रणाच्या उपाय योजना, १ जुलै रोजी कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम अशा पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
कंधार तालुक्यातील बारुळ, पेठवडज, कंधार या तिन्ही मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्राअंतर्गत कृषी संजीवनी सप्ताहाची सुरुवात दिनांक २१ जून रोजी करण्यात येत असून तालुक्यातील गावात क्षेत्रीय अधिकारी,कर्मचारी यांच्यामार्फत हा जनजागृतीचा प्रसार प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे.