शिक्षकांची पत समाजात कमी होत आहे का?


जगातील जे काही प्राचीन देश आहेत, प्राचीन संस्कृती आहे त्यापैकी एक आपला भारत देश आहे. अदिम कालापासून भारतात शिक्षणाचे कार्य अवरितपणे चालू असल्याचे दिसते. रामायन, महाभारत व बौद्ध या काळात ही भारतात प्रभावी शिक्षण पद्धती चालू होती हे दिसून येते. या काळात शिक्षण देणाऱ्यांना आचार्य संबोधले जायचे. या आचार्यांना राज दरबारात महत्वाचे स्थान असल्याचे दिसून येते. आचार्य राजमहालात आले की स्वतः राजा पुढे होवून त्यांचे स्वागत करत मान सन्मानाने गुरुला त्यांचा जागी बसवत. यथोचित सत्कार करत. आचार्य बसल्या नंतर राजा आसनस्थ होत असे. त्या काळी त्या समाजात गुरुचे स्थान उच्च पातळीवर होते.

काळ बदलत गेलं. काळानुरूप समाज व्यवस्था ही बदलत गेली. आचार्याचे नामकरण होवून पुढे “गुरुजी” झाले. या गुरुजीनाही समाजात मानसन्मान होते. गावत गुरुजी असणे म्हणजे सर्व गावकरी खुष राहायचे . सर्व गावकरी मिळून गुरुजीला मदत करायचे. गावकऱ्याकडून मिळणाऱ्या मदतीवर गुरुजीचा संसार चाले. गुरुजी ही गाववाल्याच्या प्रत्येक सुख दुःखाच्या कार्यक्रमात सहभागी होत. चिठ्ठी चपाटी वाचण्यापासून लिहिण्या पर्यंतचे सर्व काम गुरुजी करत. गुरुजीच्या सल्ल्याशिवाय गावकऱ्याचे पानही हालत नसे. प्रत्येक व्यक्ती सुद्धा गुरुजीप्रती आदरभाव बाळगूण असायचा. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पिंजरा या सेनिमातील गुरुजी होय. गावातील विद्यार्थी, नागरिक यांची निसिम श्रद्धा गुरुजीवर होती. गुरुजी गावातील श्रद्धास्थान होते.

काळ कोणासाठी ही थांबत नाही. सतत बदल होत जाणे व बदलत रहाणे हे काळाचे एक वैशिष्टय आहे. पुन्हा काळानुरूप गुरुजीचं नामकरण झालं. समाजात गुरुजी “मास्तर” म्हणून ओळखले जावू लागले तर विद्यार्थ्यांचे ते “सर” झाले . तरी आपले गुरुजी मास्तर म्हणल्या नंतर रागावले नाहीत कारण “मा” म्हणजे आई व स्तर म्हणजे दर्जा. समाजनं गुरुजीला आईचा दर्जा दिलं नाही का? आई म्हणजे इश्वराचा अवतार.

पण आलीकडे समाजात गुरुजीचं अर्थात मास्तराचं स्थान घसरलयं का? पूर्वीसारखे गुरुजीचे स्थान समाजात टिकुण आहे का? शाळेत शिकवताना व समाजात वावरताना गुरुजीचं काही चुकतंय का? असे अनेक प्रश्न मनात थैमान घालतात. उठसूठ कोणीही गुरुजीवर टिका करत सुटलय. कुठल्यातरी एका नामांकित दैनिकाच्या संपादकाने तर गुरुजीला रसातळाला नेणारी भाषा वापरली. गुरुजीसाठी जेवढी शिवराळ भाषा वापरता येते तेवढी शिवराळ भाषा त्यांनी वापरली. हे लिहिताना त्या आदरणीय संपादक साहेबांनी किती गुरुजीच्या अचरणाचा आभ्यास केला होता? किमान त्यांना शिकविलेल्या गुरुजीचं तरी त्यांनी विचार करायाला पाहिजे होतं. त्यांचे गुरुजी त्यांना आठवले नसावे किंवा गुरुजीनी त्यांना संस्कारीत केले नसावे. बरं हे एकच उदाहरण नाही. पेपर मध्ये गुरुजी विषयी नको त्या बातम्या पेरल्या जातात का खरचं घडतात हे आपण सांगू शकत नाही. नको नको ते अप्रिय आरोप लावले जातात. खरंच ते सर्व सत्य असतात का? जर सत्य असतील तर त्या बातमीचे पुढे काय झाले किंवा काय निकाल लागला हे कोणी ही कधी का सांगत नाहीत? हे कधीही कोणी प्रकाशीत का करत नाहीत? त्या गुरुजीला कोणती शिक्षा झाली हे कधीही समाजाला कळत नाही. हे असं का व्हावं? हे का घडावं?

समाजात खरंच गुरुजीची पत कमी झालेली आहे का? याचं उत्तर आजही नाही, पत कमी झालेली नाही असेच बहुसंख्य लोकांना उत्तर द्यावे लागेल. कोणत्याही क्षेत्रात काम करणारे जे व्यक्ती आहेत ते सर्वजण शंभर टक्के योगदान देतातच असे नाही. प्रत्येकाची कुवत, क्षमता व कसब ही वेगवेगळी असतात. त्यानुसार ते सर्वजण काम करत असतात. मी असं म्हणत नाही की शंभर टक्के शिक्षक कामसू आहेत. ते सर्वच काम करतात असे ही नाही; पण आजघडीला ऐंशी टक्के गुरुजी जीव तोडून जीव लावून काम करणारे आहेत. ते वेळ काळ याचं भान ठेवत नाहीत. उरले वीस टक्के गुरुजी त्यापैकी दहा टक्के गुरुजी लाजून काजून का होईना सोबत्यांचं पाहून काम करताना दिसतात. आता उरले दहा टक्के त्या पैकी पाच टक्के गुरुजी शाळेत जातात पण ते शाळेत मन लावून काम करतीलच याची खात्री कोणीही देवू शकत नाही. आता उरलेले पाच टक्के गुरुजी मात्र “होवू द्या रे होवू द्या” या वृतीचे असतात. त्यांना “कितीही निंदा कितीही वंदा ते सोडणार नाहीत त्यांचा धंदा.”

म्हणून या मुठभर काम न करणाऱ्यासाठी सर्व शिक्षक वर्गाची इज्जत वेशीवर टांगायची का? याचा विचार अधुनिक पिढीने केला पाहिले याचा विचार झाला पाहिजे. समाजात आज घडीला शिक्षकाची पत कमी का होत आहे? त्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत या विषयी समाजात काय चार्चा चालते? याचाही विचार करावा लागेल. पिढी बदलली विचार बदलले. जुनी पिढी मागे पहाते नवि पिढी पुढे ओढते. येथे दोन पिढीत विचार संघर्ष संभवतो.

१) जुन्या काळातील गुरुजी नोकरीच्या गावातच राहात. त्यामुळे गावातील सर्व लहान थोर व विद्यार्थ्यांशी त्यांचे स्नेहबंध जुळलेले असायचे. गुरुजी समोर सर्वजण नतमस्तक व्हायचे. जुने व नवे यांची तुलना केली जाते. आज गुरुजी समोर बहुसंख्य नागरिक साधा नमस्कार सुद्धा करताना दिसत नाही. फार बोटावर मोजण्या इतके गुरुजी नोकरीच्या गावी राहात असतील. त्यामुळे आजचे गुरुजी व गावल्याचे परस्पर संबध कधी जूळतच नाहीत.

२ ) जुन्या काळी गावातील कोणताही कार्यक्रम असो तेथे गुरुजी हजर राहायचे. गुरुजीच्या सल्ल्याने सर्व काही चालायचे. पत्र लिहिणे पत्र वाचणे हे काम गुरुजीच करायचे. पण आज प्रत्येक घरा घरात शिकलेले आहेत. गुरुजीचं काम काही पडत नाही. गुरुजी शिवाय त्याचं सर्व काम भागते. त्यामुळे गुरुजीला गावात कोणीही विचारत नाही असे दिसून येते.

३) जुन्या काळातील गुरुजी गावातच राहात असल्यामुळे ते नेहमीच विद्यार्थांत असत. त्यांना जादा शिकवणी घेत. संस्काराचे वर्ग घेत. वैयक्तीक लक्ष देत. मुलाच्या प्रगती विषयी पालकां सोबत चर्चा करत. आज असं फारसं काही घडताना दिसत नाही. शाळेला वेळेवर जाणे व वेळेवर परत येणे असं सध्याला घडताना दिसून येते.

४) पूर्वीच्या काळी गुरुजी गावातच राहत असल्यामुळे गावातील लोक गुरुजीच्या फारशा तक्रारी करत नसत. गावात एकी असायची. गावातील देशमुख, देशपांडे, पाटील यांचं लोक ऐकूण राहायचे. पण आज एक गाव बारा भानगडी आहेत. त्यामुळे आमचे गुरुजी गावातील त्यांचे आदराचे स्थान गमावून बसले आहेत.

५ ) पूर्वी राव बोले गाव हाले अशी अवस्था होती. गावातील लोकांना बाहेर काय घडते याचीही कल्पना राहयाची नाही. ते आपआपल्या कामात दंग असत. पण आजकाल गावात बेकारी खूप वाढली आहे. जो तो रिकाम टेकडं दुसऱ्याचे दोष काढत आहेत. यात गुरुजीनाही कोणी सोडत नाही. चहा पाण्याचा खर्च निघतो का असं काहीजण विचार करत असतात. जे गुरुजी चहापाणी करत नाही त्या गुरुजीची बदनामी गावात करतात.

६) गावात राजकारण शिरलं अन शिक्षणाचं बट्याबोळ झालं. एका गावत राज्यात/देशात जेवढे पक्ष आहेत त्या सर्व पक्ष्याचे येथे घराघरात कार्यकर्ते हजर आहेत. प्रत्येकाला वाटते गुरुजी माझ्या विचारानेच चालवा एकाला खुष करा तर दुसरा नाराज यामुळे ही गुरुजीची पत कमी झाली आहे.

७) पूर्वीचे शिक्षक किंवा कोणतेही कमर्चारी हे सरकाराशी बांधील होते पक्षांशी नव्हे, कोणत्याही पक्षाचे सरकार असो यांना त्याचं देणंघेणं नव्हतं. पण अलीकडे या दहा पाच वर्षात आपले गुरुजी ही वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांशी बांधील झाल्याचे दिसून येतात. ज्या पक्षाशी ते बांधील त्या पक्ष्याचे कार्यकर्तेच त्यांना मान देतात दुसरे विरोधात म्हणून ही गुरुजीचे समाजातील महत्व कमी होताना दिसते.

८) बहुधा प्रत्येक गावात तलाठी व ग्राम सेवक सोडले तर इतर कोणतेच पगारी कर्मचारी गावत जात नाही. तलाठी व ग्राम सेवक यांच्याकडे नागरिकाचे काम पडते म्हणून त्यांना फारसे कुणी दुखवताना दिसत नाही. व ते दररोज गावात जात ही नाहीत; पण गुरुजी मात्र दररोज गावात जातो. तास दोन तास शिकवून पाच दहा मिनटं तो विश्रांती घेतो तेवढ्यात कुणीतरी गावातील उचापतखोर त्याना बसलेला पहातो व लगेच गावात चर्चा होते. मास्तर लोकं फुकट पगार घेतात दिवसभर बसतात. मुलांना शिकवत नाही.

९) खरं तर गुरुजी समोर वर्षभरासाठी विशिष्ट उदिष्ट ठेवून दिले पाहिजे. येवढं झालचं पाहिजे असे सांगितले पाहिजे. उदिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांना स्वातंत्र दिले पाहिजे व जो पर्यंत शिक्षकांना टार्गेट दिलं जात नाही. त्याची पुर्तता झाली का नाही हे तपासले जात नाही तो पर्यंत शिक्षकांचं काम आपणास दिसणारच नाही.

१०) शिक्षकांना मुख्य कार्य सोडून इतर कार्यालाच जुंपल्याचे दिसत आहे. राज्यशासनाची वा केंद्र शासनाची कोणतीही योजना असो गावपातळीवर शिक्षकांलाच ते काम लावले जाते काही शिक्षक महिने महिने वर्ष वर्ष शाळा व विद्यार्थ्यांचे तोंडच पाहत नाहीत. मग आशा शिक्षकांची पत समाजात कमी होणार नाही का? हा शिक्षकांचा दोष आहे का?

११) नशापाणी करण्यावरून ही शिक्षकांबद्दल समाजात चर्चा होताना दिसते. पण असे किती टक्के शिक्षक आहेत जे दारू पिऊन नशापाणी करून रस्त्यावर पडतात? याचं विचार कोणी करत नाही. या मुळे ही शिक्षकपदाची प्रतिष्ठा निश्चितच रसातळाला जात आहे.

१२) शिक्षण विभागात वेगवेगळ्या पत्रकांचं पेव पुटलेलं आहे. सकाळी एक पत्रक निघाले की संध्याकाळी ते रद्द होते व त्या जागी दुसरेच परिपत्रक येते. आज सकाळी एक शिक्षण पद्धत रित सांगितली जाते व ते अमलात येई पर्यंत दुसरीच पद्धत येते. या मुळे शिक्षकांची ही तारांबळ उडते. एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार घडतो आहे. एखाद्या शिक्षण पद्धतीचं प्रशिक्षण घेवून येईपर्यंत दुसरचं काहीतरी घडत असते. त्यामुळे शिक्षक नेहमीच शिक्षणाच्या चौकाताच थांबून असतो. मार्ग शोधत असतो. तो बुचकळलेला असतो. कोणत्या रस्त्याने जावे हे त्यांना कळतच नाही.

मला वाटते मुठभर शिक्षकांनी केलेल्या चुका सर्व शिक्षक वर्गाच्या चुका समजून त्यांना गुन्हेगाऱ्यांच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य वाटत नाही. आजही शिक्षक शिक्षकी पेशा नसुन ते एक जीवीत कार्य (sublime mission ) म्हणून करत आहेत. मला वाटते मागच्या पिढीतील शिक्षक कष्टाळू होते. शहाणे होते. अभ्यासू होते. आजचे शिक्षक ही पूर्वीच्या शिक्षकांपेक्षा काकणभर जादा हुशार आहेत. हुशारीला शहणपणाची जोड मिळाली तर सुंदरच होईल.

ज्या समाजात देशात गुरुला शिक्षकाला मानाचे स्थान नाही तेथील समाज निश्चितच प्रगती पथावर जावू शकत नाही. शिक्षण व्यवस्थाच देशाला प्रगती पथावर नेवू शकते. गुरुजी देश घडविण्याचे कार्य केलेले आहेत, करत आहेत व करत राहणार. हे शिक्षणाचे त्यांना करू द्या. त्यासाठी त्यांचे अपमान न करता मान द्या. सन्मान द्या. देशाची संस्कृती रुजविण्याचे घडविण्याचे कार्य त्यांना करू द्या. गुरुजन वर्गालाही विनंती आहे. कुठल्यातरी विशिष्ठ गोष्टीत गुंतून घेवू नका. राजकारण करू नका. तुम्हाला समाज आदर्श मानो अथवा न मानो परंतू तुमच्या समोर बसलेले विस पंचविस विद्यार्थ्यांचे तुम्हीच आदर्श आहात. त्यांच्या साठी तुम्ही परमेश्वर आहात. हे कधीच विसरू नका.

राठोड मोतीराम रुपसिंग,

गटशिक्षण शिक्षण अधिकारी (सेनि)

कंधार

” गोमती सावली ” काळेश्वरनगर , विष्णुपूरी, नांदेड – ६
९९२२६५२४०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *