जाधवाचा तांडा बारुळाच्या गायरानात ठाण झाल्याचा सांगावा मारत्यानं आनला व्हता. मया बाचा पालबी याच तांड्यात कहेक दिवसापासनं नांदत व्हता. मया नवऱ्याचा पाल दोन कोसावरल्या हळद्याला पडलेला व्हता. दोन कोस म्हणजी कुंची कोरवा जातीच्या मानसासाठी कायबी नव्हं. तवा नवऱ्याला गुंगारा देऊन माहेरचा रस्ता धरायचं म्या गर्दावलेल्या मनातल्या दाटनीत घुसविलं. त्याला कारणबी तसंच व्हतं. मेनमळल्या कपाळीचा चकोट संसार कोण फुकाफुकी सोडतंय काय. कोणबी नाहीच म्हणंल, पर त्याचं असं झालं
मव्हं लगीन व्हवून आज दोन वर्ष व्हत आलेत, दोन वर्षाखाली जात पंचायतीनं म्हवं लगीन पवार तांड्ड्यातल्या यल्लपाशी ठरवून दिलं व्हतं. ठरल्या प्रमाणं बानं समदं चखोट पार पाडलं. लग्नाला झाडून समदा गोतावळा जमला व्हता. बाची छाती तर वारा भरल्या चेंडूगत फुगून आलती. त्यानं कुठं काई कमी पडू दिलं नव्हतं. लगीन दोन दिवस चाललं व्हतं. पहिल्या दिवशी पंचाच्या म्होरं अक्षदा पडल्या. गोडधोड झालं. दुसऱ्या दिवशी थोरलं, कंबराएवढं बकरं कापलं व्हतं. दारू मायंदळ वाटली. पंचासनीबी बानं एकशे एक रुपया दिला. भांडण नाही, तंटा नाही. रुसवाफुगवाबी कोणी केला नाही. समदं कसं जोरकस झालं व्हतं. आजबी तसंच्या तसं ध्यानात हाय.
लगीन व्हवून म्या मया नवऱ्याच्या पालात आले. चार दिवस भारी गोजऱ्या सुखाचे गेले. मंग काय झालं कोणास ठावूक. येवड्यास्या तेवढ्याश्या वरून सासू टाकून पाडून बोलायची. तुझ्या बानं काय देलंय म्हणायची. मव्हं काई चुकलं माकलं, मया हातानं काई सांडलंसवरलं की, मह्या बावर ठपका ठेवायची. घडीघडी मला टोचू टोचू बोलून पानउतारा करायची. तरी म्या हे नंदीबैल गुबगुबु केल्यागत समदं सहन केलं असतं. पर या दोन वर्षात कितीक देवधरम नवसंसायास करूनबी मव्हं पोटपाणी काई पिकलं नाही. सकोन बघून गंडादोरीबी घातली व्हती. पर गुण काय गावला नाही. तवा समदी मह्यावर खवळली. नको नको ते बोलू लागली. जिथं तिथं मव्हं उणं पाखडू लागली. मह्या संसारी कृष्णेच्या डोहात कालिया शिरला व्हता. नवरा दारू डोसून केरसुनीनं अंगाची सालपाडं वरबाडीत व्हता. काळजाची लचकं तोडाया
मह्यावर खेकाळून येत व्हता. त्यापायी मह्या मनाची काहिली व्हत व्हती. जीव नकोसा वाटत व्हता. अन् तशातच एक दिवस बाचा तांडा बारुळात ठाण झाल्याचा सांगावा आला व्हता. झालं, गुंगारा देण्याचं म्या पक्कं केलं.
• एक दिवस झुंझरक्याच उठले. आजूक कोंबड्यानं बाग दिला नव्हता. पहाटच्या ग्वाड थंडीत समदी पोटशी पाय दुमडून निजलेली व्हती. म्या लुगड्याचा बोळा करून काखत हाणला. यल्लपाला दोन्ही हात जोडून बेलाग पांदणीची वाट धरली. पांदण वाट सरुन बाबूळ वनातल्या आराटीबोराटीच्या गर्दाव्यातली नागमोडी वाट लागली. झाऊळ झाऊळ अंधारांची कोंडी दाटली व्हती. बाबळ काट्यावर पाय पडून डोळ्यात टचकन पाणी तरळत व्हतं. तरीबी चाल सोडून भागायचं नव्हतं. उरी दाटल्या माहेरीच्या ओढीनं काटे भरले पाय एकलगीन वाटतोड करीतच व्हते. अंधारातून भांगा काढीत बारुळात पवचले, तबा उगवतीला तांबडं फुटलं व्हतं. बारुळात पाय पडलं, तसं चौवाटा येरगाठलं. मन कोंडी फुटल्यागत मोकळं झालं. विजेच्या एकाच लपकीने आभाळाचा घुमट लख्खरून उजळून यावा तसं.
शिवाजी शाळेच्या म्होरल्या मोकळ्या गायरानात तांडा ठाण झालेला दिसला. बाच्या पालात पाय टाकलं तसं, लिमा तात्याची शाली आलीया म्हणून तांड्या हाळी उठली. अनं खोपटाखोपटाला भाबड्या मायेचं उतू आलं. पालापालातली बाया माणसं बाच्या पालात धावली. “बरी हासं नव्हं ? कवाशीक आलीस? दादला कसा हाय ? एक ना अनेक मायेनं विचारू लागली. म्या जखडबंद जबानीनं हूं हूं करीत राहिले, मयी दातखिळी बसल्याली बघून नवऱ्याला सांगून सवरून आलीस नव्हं, म्हणून गंग्या मह्यावर डाफरला. म्या खोटंच व्हयं म्हणलं.
यल्लीनं चहा आणून दिला. बाच्या पालात कोणीबी नव्हतं. माय तर मह्या बारक्यापणीच सर्गाला गेलती. बानं समदा परतपाळ केला व्हता. म्या चवकशी केली, तवा नेकदील यल्ली म्हणली. “लिमा तात्यासनी तू येणारेस हे काय ठावं व्हतं व्हयं? त्यो आज शुक्राची चांदणी दिसाले झुंझुरक्याच झाडीत शिंदीच्या फोका आनाय पाई गेलायं. अधनंमधनं तांड्यातल्या बायकासनी तो शिंदीच्या फोका आनून देतया. मंग बायका कणग्या, पाट्या, खुराडे कुरकुली, दुरड्या, झापा करून गावकीत इकत्यात.” यली बराच येळ बोलत बसली असती..
पुढील भाग ..
क्रमशः
सु.द.घाटे
छोटी गल्ली ,हिराई भवन,
कंधार ता.कंधार जि.नांदेड
(९४०५९१४६१७)
रुमणपेच (कथासंग्रह)
प्रकाशक ; गणगोत प्रकाशन
(९६६५६८२५२८)
मुल्य ; २१०/- रु