टाईम मँनेजमेंन्ट व मार्केटिंग

शिवास्त्र : 
टाईम मँनेजमेंन्ट व मार्केटिंग

केवळ लोभाने चिकटलेल्या लाळघोट्या लाचार गोचीडांपेक्षा सुसंस्कारित प्रेमाने जवळ आलेल्या इमानदारांची कदर केली तर पश्चाताप करायची पाळी येत नाही. लाईफ इज टू शॉर्ट टु लव्ह, आय हँव नो टाईम टु हेट. जीवनातील योगायोगाने आपल्याला जोडून दिलेल्या अनमोल, निस्वार्थी, प्रामाणिक माणसांसोबतच अजून एका गोष्टीचे मोल जाणायलाच हवे, वेळ.! टाईम इज मनी. हमाल असो की सुप्रिमकोर्ट जज्ज, रंक असो की राजा, सगळ्यांकडेच एक बाब समान आहे – टाईम, समय, वेळ.! एका तासाचे साठ मिनिटं आणि एका दिवसाचे चोवीस तास. या प्रत्येक मिनिटांचं आणि तासाचं आपण काय करतो, कसं करतो, यावर आपण कुठं पोहोचणार आणि काय होणार हे ठरतं. कौशल्य, पैसा, मार्केट हे सगळं एकदा गेलं तरी पुन्हा अनेकदा मिळवता येईलही, पण एकदा गेलेली वेळ कोणालाही आणि कधीही परत मिळवता आलेली नाही, येणारही नाही, हेच जीवनाचे त्रिकालाबाधित वास्तव आहे. मुळातच माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा या पृथ्वीवरचा नेमका किती काळ त्याच्यासाठी उपलब्ध आहे हे कुणालाही ठाऊक नसतंच मुळी.!


सध्या आपण लॉकडाऊनच्या चौथ्या महिन्यात पोहोचलोय. मँब एव्हिएशन कंपनीचे मंदारजी भारदे व बंधुतुल्य मित्र तथा विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉ. विश्वाधारजी देशमुख यांच्या संपर्कातून वाचलेल्या एका रिपोर्टनुसार फेसबुक, युट्यूब, व्हाट्सएप, इत्यादी सगळ्या सोशल मिडिया साईटचा सगळ्यात जास्त वापर भारतात होतो. आपण सगळेच भारतीय या सर्व सोशल मिडिया साईटस् चे युजर्स आहोत. हा रिपोर्ट वाचल्यावर एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावा की, ‘लॉक डाऊनच्या तीन-साडेतीन महिन्यात आपण नक्की काय केलं.? लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी आपल्या करिअरला पुरक ठरणाऱ्या कुठल्याही क्षेत्रात (शिक्षण, कौशल्यविकास, भाषाज्ञान, विषयवाचन, चिंतन, मनन, लेखन, संभाषण, छंद, इत्यादी) एखाद्या विषयाच्या आकलनाची आपली इयत्ता जर पहिली असेल तर लॉकडाऊनच्या या मोठ्या कालावधीत पुर्णवेळ रिकामा असताना किमान चौथ्या-पाचव्या इयत्तेत तरी आपण येऊन पोहोचलो का.?’ दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतांश जणांच्या मनाचं उत्तर येईल ‘नाही.’ आपण टिकटाॅकवर निव्वळ टाईमपास केला असेल, दिवसरात्र फेसबुकवर करमणूक केली असेल, युट्युबवर बिनकामाचे व्हिडिओ पाहिले असतील, व्हाट्सएपवर चाटिंग केलं असेल. भविष्यात जेव्हा हा अप्रिय पण अनिवार्य लॉकडाऊन उठेल, तेव्हाही आपण जर त्याच इयत्तेत असू, जिथे आपण लॉकडाऊनच्या सुरुवातीला होतो तर वेळेचा सदुपयोग न करणारे म्हणून आपल्यासारखे कपाळकरंटे आपणच ना.? 


आपण आजच्या जगाशी तुलना केली तर काय लक्षात येते.? भारतीय तरुणातील बहुतेकांना वेस्टर्न कंन्ट्रिजचं फार आकर्षण असतं. खासकरून युरोपियन आणि अमेरिका या राष्ट्रांचं – जिथे वयाच्या सोळा-सतराव्या वर्षी मुलंमुली स्वतःचे पैसे स्वतः कमवतात. छोटी-मोठी नोकरी करतात किंवा काही ना काही विकायच्या मागे लागतात. पण स्वतःचे पैसे कमवायला लागतात आणि मग साधारणतः बारावीनंतरचं त्यांचे जे शिक्षण असतं, ते सारं शिक्षण तिथले मुलंमुली स्वतःच्या पैशाने करतात. जर पुरेसे पैसे नसतील तर एखादा वर्ष शिक्षण थांबवतात, पैसे कमावतात आणि पुन्हा शिक्षण सुरू करतात. गरीब घरातल्या मुलांच्याच बाबतीत नाही, तर उच्चमध्यमवर्गीय श्रीमंत आई-बापांच्या मुलाच्याही बाबतीत तिकडे हेच घडतं. नामांकित सर्जन बापाचा मुलगा गल्लीवरच्या कुठल्यातरी सुपरमार्केट मध्ये काहीतरी छोटंमोठं काम करतोय अशी उदाहरणे तिकडे ढिगाने सापडतात. यात ना बापाला कमीपणा वाटतो ना, मुलांना, ना तिथल्या समाजाला. आशियाई देशातील मुलांच्या तुलनेत पाच-सात वर्ष आधी तिथली मुलं पैसे कमवायला शिकतात. पैसा कमवायची ही कमी वयातील सवय, इच्छा त्यांना आपल्या मुलामुलींपेक्षा कितीतरी पुढं घेऊन जाते. आपले पंधरा-सोळा वर्षाची मुलं तर सोडाच पण वीस-बाविशीची मुलं-मुलीसुध्दा पैसे कमवायचा विचार सोडून सगळंच करतात. अर्थात ह्याला केवळ मुलंमुली जबाबदार नाहीत तर आपल्याकडील पालक, समाज हे सर्व घटक कारणीभुत आहेत. विचार करा, जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या असलेला आपला देश जर रोज दोन-तीन तास संपत्ती निर्माण करायला लागला तर देशाच्या अर्थकारणात केवढं मोठं योगदान असेल.? बुट पॉलिश ते तेल मॉलिश – चार पैसे मिळवून देणारे कुठलेही काम करण्याची लाज का बाळगावी.? व्हाईट कॉलर्ड लबाड चोरांपेक्षा कष्ट करणाऱ्या प्रामाणिकांना समाजमान्यता मिळायला हवी. पण दुर्दैवाने लबाड व चोरांचा उदोउदो सगळीकडे होतो, कशी श्रमाला प्रतिष्ठा मिळणार.? आज अर्थाशिवाय कशालाही अर्थ नाही, पृथ्वी फक्त भौगोलिक दृष्ट्या सूर्याभोवती फिरते पण व्यावहारिक दृष्ट्या ती फक्त आणि फक्त पैशाच्या भोवती फिरत आहे. काळंच असा आलाय की पैशाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तरीही आर्थिक साक्षरता कमी वयातच यायला हवी, पैशाचे मोल आणि महत्त्व बालवयात शिकवण्यापलिकडे अर्थकारण समजून घेण्यात आमची पिढी अपयशी ठरली हे आपण सगळे मान्यच करुया.! 


‘आत्मनिर्भर भारत’ या एका निश्चयाने कदाचित नवनवीन उद्योग व्यवसायाच्या हजारो संधी येणाऱ्या काही दिवसात उपलब्ध होतील असा जाणकारांचा अंदाज आहे. फोनवर टाईमपास करणं, उगाच ट्रिपल सीट सकाळ-संध्याकाळ मोटारसायकलवर गावभर हिंडणं, कोणत्यातरी राजकीय विषयावर (ज्याच्याशी आपला काही संबंध नाही) तासन् तास एकमेकांशी वाद घालणं; जीवनात कधीतरी येऊन गेलेल्या पैसे कमवायचा जुन्या त्याच त्या हुकलेल्या संधी वारंवार उगाळत बसुन नकारात्मक विचार करणं; राजकीय, धार्मिक, सामाजिक उत्सवात विनाकारण अतीसहभाग घेणं – याऐवजी फक्त पैसे कमवायचा विचार करायला इथून पुढे आपल्या सर्वांना शिकावेच लागेल. श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून संपत्ती निर्माण करण्यात स्वतःला झोकून द्यावं लागेल. ज्या राष्ट्रांच्या तरुणांमध्ये संपत्ती निर्माण करण्याविषयी उदासीनता आहे ते राष्ट्र श्रीमंत होऊ शकेल का.? एकंदरीतच काय तर आपला देश जो आज फेसबुकचा, व्हाॅट्सअपचा, टिकटॉकचा आहे तो अर्थकारण्यांचा व्हावा लागेल. आमच्याकडे वेळ नाही, बिझनेस स्किल नाही, आम्हाला अभ्यास असतो, घरची काम असतात, मला कॉम्प्युटर जमत नाही, तंत्रज्ञानातलं काही कळत नाही, मला इंग्रजी येत नाही, मला हे कुणी शिकवलंच नाही, माझ्या नशिबातच नाही, इत्यादी अंधश्रध्देतून माझ्यासकट आपल्या सर्वांनाच बाहेर यावं लागेल. जो गावाला आपलं मानतो तो गावाचा होतो आणि जो जगाला आपलं मानतो तो जगाचा होतो. तुम्ही काय मानता ते महत्त्वाचं आहे. ग्लोबलायजेशन ही मानसिक अवस्था आहे. कोरोनामुळे सगळ्या जगाची अर्थव्यवस्था उलटीपालटी होऊ शकते. जुन्या अर्थसत्ता कदाचित रस्त्यावर येतील आणि नव्यांना वेगानं वाढण्याची संधी मिळू शकेल. गेल्या तीन दशकात चीननं वाटेल त्या वस्तू बनवल्या आणि अख्ख्या जगाने त्या विकत घेतल्या. आपल्या शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे जास्त महत्वाचं ठरतंय. स्वतःला घडवलं, विज्ञानवादी राहिलं, सकारात्मक असलं, सतत नवनवीन शिकण्याचा ध्यास बाळगला, जुनं नकारात्मक सोडून दिलं तर आपणही जगाच्या बाजारात विकणारं पिकवू शकू नक्कीच..!!  

इंजि. शिवाजीराजे सुनिता भिमराव पाटील  मास्टर कोच – जवाहरलाल नेहरू लिडरशिप इंन्स्टिट्युट, नवी दिल्ली   राष्ट्रीय अध्यक्ष – वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद   [email protected]Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *