पाल्यांना सर्वांगाने विकसित करा -प्राचार्य डॉ. हरिदास राठोड


मुखेड – सध्या कोरोना महामारी संपलेली नाही. म्हणून आपण आभासी माध्यमातून शैक्षणिक प्रक्रिया पार पाडत आहोत. त्यामुळे हा पालक मेळावा ही याच पद्धतीने घ्यावा लागला. सध्या पाल्य जास्तीचा वेळ आपल्या संपर्कात आहे. त्यामुळे पाल्य पालक ताणतणाव वाढताना दिसतो आहे. तो वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

आपण पाल्याला ऑनलाइन शिक्षणासाठीची सगळी साधने पुरवीली पाहिजेत. तो त्याचा वापर योग्य कामासाठी करतोय का नाही ते ही पाहीले पाहीजे. ऑनलाईन मध्ये हँडसेट, रिचार्ज, विजेची उपलब्धता असे प्रश्न येतात पण त्यावर मात करून आपण आपल्या पाल्यांना घडविणे काळाची गरज आहे.तो कोणाचा शिकार होणार नाही तर तो शिकार करणारा बनेल असे त्याला बनवा. विद्यार्थ्यांनीही या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

पाल्यांना सर्वांगाने विकसित करण्याचा प्रयत्न पालकांनी करावा असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.हरिदास राठोड यांनी ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान )महाविद्यालय, वसंतनगर ता. मुखेड येथील विद्यार्थी समन्वय समितीने आयोजित केलेल्या विद्यार्थी पालक मेळावा प्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना केले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना माजी प्राचार्य डॉ रामकृष्ण बदने म्हणाले की मागील काही महिन्यांपासून आपण विचारांची शेती करतो आहोत पण जे पेरल जातय ते उगवल व वाढल पाहिजे ते बेरता कामा नये. शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी, शिक्षक, पालक व चालक के चार घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. सर्वांमध्ये एक वाक्यता आली तर शिक्षणाचे संगीत आपणास ऐकायला मिळेल. विद्यार्थी या शब्दाचा अर्थच आहे वि म्हणजे जाणीव व अर्थी म्हणजे प्राप्त करणारा.जाणीव प्राप्त करून जगतो तो विद्यार्थी. त्याला स्वतःबद्दल, परिवाराबद्दल,परिस्थिती व वेळेबद्दलची जाणीव असली पाहिजे. तर पालक या शब्दाचा अर्थ आहे.पा म्हणजे पालन पोषण करणे,ल म्हणजे लक्ष ठेवणे व क म्हणजे कर्तव्य पार पाडणे. पालकांनी आपल्या स्वआचरणातुन पाल्यावर योग्य प्रकारचे संस्कार केले पाहिजेत. पाल्याच्या विकासात सर्वाधिक महत्वाची भूमिका पालकांची आहे. आजच्या आभासी काळात त्याला हवी ती साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रस्तुत समितीचे प्रमुख तथा तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा. डॉ. सखाराम गोरे यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठीमागची भूमिका विशद केली. सूत्रसंचलन व पाहुण्यांचा परिचय प्रस्तुत समितीचे सदस्य तथा रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. शंकरय्या कळ्ळीमठ यांनी केले तर आभार आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. बळीराम राठोड यांनी मानले.


सदरील कार्यक्रमास तंत्र सहाय्यक म्हणुन प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. महेश पेंटेवार यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.एस.बाबाराव, रसायनशास्त्र विभागाचे प्रा. देविदास पवार, श्री जनार्दन पाटील यांनी प्रयत्न केले.
सदरील कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, माजी प्राचार्य डॉ.देविदास केंद्रे, स्टाफ सेक्रेटरी प्रा. डॉ.व्यंकट चव्हाण,सह स्टाफ सेक्रेटरी प्रा.सौ.शिल्पा शेंडगे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बाहेरच्या महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.विठ्ठल घुले व काही प्राध्यापक तसेच प्रस्तुत महाविद्यालयातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *