नांदेड, (प्रतिनिधी)-मुंबईहून गुजरातकडे जाणार्या अहमदाबाद बुलट ट्रेनला आमचा विरोध कायम आहे. परंतु अधिक वेगाने प्रवास करण्यासाठी जर ही बुलट ट्रेन महाराष्ट्राच्या इतर भागातून जात असेल तर ती मराठवाड्यातून सुध्दा गेली पाहिजे. ही बुलट ट्रेन मराठवाड्यात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.
येथील कै. रामगोपाल गुप्ता को-ऑपरेटीव्ह इंडस्ट्रीयल इस्टेटच्या नवीन इमारत भूमीपूजन प्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, आ.मोहनअण्णा हंबर्डे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, महापौर मोहिनीताई येवनकर, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, उपमहापौर मसूद खान, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सतिश सामते, उपाध्यक्ष नवल गुप्ता,ठेकेदार माधवराव एकलारे आदींची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या काही भागातून बुलट ट्रेनचे जाळे विणल्या जावे यासाठीचे प्रस्ताव पुढे येत आहेत. मुंबईहून सोलापूरमार्गे हैद्राबाद व मुंबईहून- नागपूर या बुलट ट्रेनसाठी चाचपणी सुरु असताना बुलट ट्रेन मुंबईहून,औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे हैद्राबाद व्हावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, केंद्र सरकारमधील संबंधित यंत्रणेलाही भेटणार आहे. परंतु हे काम एकट्या-दुकट्याचे नाही. तर त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. समाजात काम करणार्या वेगवेगळया सामाजिक संस्था, प्रसार माध्यमे व नागरिकांनी यासाठी जर लोकचळवळ निर्माण केली तर बुलट ट्रेन हे मराठवाड्यासाठी स्वप्न नव्हे तर वास्तव होऊ शकते असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठवाड्यातील रेल्वेचा विस्तार करण्यासाठी, ब्रॉडगेजसाठी व रेल्वेच्या विभागीय कार्यालयासाठी आपण संघर्ष केला. त्यामुळे यातील अनेक बाबी साध्य झाल्या. त्याच प्रध्दतीने बुलट ट्रेन सारखे सुध्दा प्रयत्न करावेत. बुलट ट्रेनच्या निर्मितीसाठी वेगळया भूसंपादनाची गरज नसून समृध्दी महामार्गाने अधिगृहीत केलेल्या जमिनीवरुनच या बुलट ट्रेनचा मार्ग टाकल्या जाऊ शकतो असे मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे. सुरुवात तर मी केली आहे आता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
औद्योगिक वसाहतीतील विविध समस्या सोडविण्यासाठी आपण पूर्वीपासूनच कामाला लागलो असून या वसाहतीच्या सभोवतालचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात येतील असेही ते म्हणाले. यावेळी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, संस्थेचे अध्यक्ष सतिश सामते यांची समयोचित भाषणे झाली. उपस्थितांचे आभार नारायण क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले. या कार्यक्रमास काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, प्रवक्ते संतोष पांडागळे, किशोर स्वामी, नागनाथ गड्डम, मंगेश कदम, किशोर भवरे, अॅड.निलेश पावडे, राजेश पावडे, रवि कडगे, नितीन आगळे, जयदत्त तक्तापुरे ऊपास्थित होते.