महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर या महान संताशी एकादशीचा अतूट संबंध जोडला गेलेला आहे. एकादशीच्या आधी सुमारे वीस दिवस आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी बरोबर चालत पंढरपूरला नेतात. या दिंडीत सहभागी होणा-यांना वारकरी म्हटले जाते. विठ्ठलाचे भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर तुकोबा, ज्ञानेश्वरांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून पंढरपूर पर्यंत चालत नेतात. गळयात तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात. एकादशीचे दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्रभर या दिवशी उपवास केला जातो. देवाला फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. गावोगावच्या मंदिरात भजन-कीर्तने होतात. महाराष्ट्रातील संत संप्रदायाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा सण होय. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील हा तळागाळातील लोकांपर्यंत पोचलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा सण होय.
महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला – म्हणजेच आषाढ शुध्द एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात. या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखीही सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना होते.
वारकरी महाराष्ट्रातील तळागाळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोचलेला हा सांस्कृतिक वारसा आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमीला देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तर ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपुरासाठी प्रस्थान ठेवण्यात येते. पालखीमध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या चांदीच्या पादुका पूजा करून ठेवल्या जातात. ज्ञानेश्वरांचा उल्लेख ‘माऊली’ असा केला जातो. पालख्यांच्याबरोबर मानाचे अश्वही या दिंडीत सामील होतात. पालख्यांच्या या सोहळयात रंगलेल्या भक्तांना ‘वारकरी’ या नावाने संबोधले जाते. वारकरी हा भक्तीत गुंग, सदाचारी, निर्व्यसनी असतो अशी श्रध्दा आहे. विशेषत: गळयात तुळशी माळा घालून कपाळी गंधाचा टिळा लावून, मद्य किंवा मांसाहार करणे अत्यंत निशिध्द मानले गेल्यामुळे ‘माळकरी’ वारकरी सात्विक आहे हा पक्का समज असतो.
वारकरी पूर्वी जातीय व्यवस्थेवर आधारित असे भक्तांचे समूह केले जात आणि त्यांना विशिष्ट क्रमांक दिले जात. त्या समूहांना ‘दिंडी’ असे म्हणतात. या सोहळयात सहभागी होणारे भक्तजन आपापल्या दिंडीत एकत्र राहून पंढरपूरपर्यंत पायीपायी चालत जातात. आता मात्र नव्या दिंडया जातीय व्यवस्थेवर आधारित नाहीत. प्रत्येक दिंडीचा प्रमुख एक ‘वीणेकरी’ असतो. वीणेकरी म्हणजे ज्याच्या गळयात वीणा असते तो. एका दिंडीला एकच वीणेकरी असतो. वीणेक-यानंतर टाळकरींचा मान असतो. प्रत्येक दिंडीचे ५ ते १० पर्यंत ध्वज असतात. ते ध्वज कावेने रंगविलेले असतात. दिंडीमध्ये प्रामुख्याने बहुजन समाज, शेतकरी वर्ग आणि आजकाल सुखवस्तू पांढरपेषा लोकही थोडयाबहुत संख्येने सामील होतात. स्त्री-पुरुष , काहीवेळा अख्खे कुटुंबच्या कुटुंबही दिंडीत सहभागी होते. साधारणत: धोतर किंवा पायजमा, सदरा,गांधी टोपी असा पुरुषांचा तर नऊवारी साडया असा स्त्रीयांचा पोषाख असतो. ज्या स्त्रिया काही नवस बोललेल्या असतात त्या नवस फेडण्यासाठी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालत जातात.
कपाळी बुक्का किंवा चंदनाचा टिळा, हातात झांजा किंवा एकतारी, गळयात तुळशीच्या माळा, मुखी विठ्ठलाचे नाम, ज्ञानेश्वरांच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग, भक्तीरसात न्हालेले मन आणि ऊन-पाऊस-वादळ-वारा यांना न जुमानता विठुरायाच्या ओढीने पायी अंतर पार करण्यासाठी आसुसलेली पावले असे हे जनताजनार्दनाचे रुपडे असते.
‘चाले हे शरीर कोणाचिये सत्ते,
कोण बोलविते हरीविण,
देखवी दाखवी एक नारायण,
तयाचे भजन चुको नका’
या समर्पक ओवीच्या आविर्भावात चेह-यावर प्रवासाचा शीण जराही उमटू न देता वारकरी दिंडीबरोबर चालत रहातात.
वारी आळंदीच्या मंदिराचा कळस हलला की आळंदीहून पालखी निघायची असा संकेत आहे. देवळाचा कळस खरोखर हलतो अशी भाविकांची श्रध्दा आहे. षोडषोपचार पूजा होऊन पालखी निघते ति प्रथम ज्ञानेश्वर महाराजांच्या मामांच्या गावी – आपेगाव येथे जाते व नंतर गांधीवाडा येथे (आळंदीजवळच) जाते. पुढे काही दिंडया, मध्यभागी पालखी व मागे काही दिंडया अशी ही रचना असते. देहूहूनही अशाच पध्दतीने पालखी निघते. ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालख्यांचा पंढरपूरला पायी चालत जाण्याचा मार्ग भिन्नभिन्न आहे. परंतु पुण्यात मात्र या दोन्ही पालख्या एकाच दिवशी येतात आणि पुणे शहरही विठूनामाच्या गजराने दुमदुमून निघते. ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरत तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडूंगा विठ्ठल मंदिरात असतो. त्या मुक्कामानंतर मात्र ज्ञानेश्वरांची पालखी सासवड मार्गे तर तुकारामांची पालखी मुंढवामार्गे आगेकूच करते.
पालखीबरोबर मानाचा अश्व, अब्दागि-या, ध्वज, दंड ही मानाची बिरुदे मिरविली जातात. गावोगावी येणा-या दिंडयांचे त्या त्या गावातील सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांकडून भव्य स्वागत होते. नारळ, हार, फेटा, पागोटे,शाल इत्यादी वस्तू त्यात्या दिंडीच्या वीणेक-यांना देऊन त्यांचा मान राखला जातो. दिंडयांचे प्रमुख वर्षभर आपापल्या दिंडीच्या सदस्याकडून काही वर्गणी गोळा करतात, या वारीसाठीही वर्गणी गोळा करतात आणि त्या निधीतून वारक-यांच्या जेवणाची, रहाण्याची अगदी साध्या स्वरूपाची सोय करतात. काही सेवाभावी संस्था, धार्मिक संस्था तसेच विशिष्ट ज्ञातींच्या संस्था आपापल्या कुवतीनुसार अन्नदान करतात. हे अन्नदान जे वारकरी कोणत्याही विशिष्ट दिंडीमध्ये समाविष्ट नाहीत अशांसाठी असते. त्यामुळे या मोफतच्या अन्नाच्या आशेने अत्यंत दरिद्री असलेले लोकही ‘भक्तगण’ म्हणून आपले कार्य साधून घेतात. अन्नदाना बरोबरच चपला, मोफत चप्पल दुरुस्ती, पावसापासून रक्षण करण्यासाठी प्लॅस्टिकचे मामुली रेनकोट, विशिष्ट औषधे, रात्रीपुरते निवा-याचे स्थान इत्यादी गोष्टीही वारक-यांना ‘दान’ करून गावोगावचे लोक पुण्य मिळवितात.
तुकाराम व ज्ञानेश्वर यांच्या देवस्थानांतर्फे ‘अभंग गाथा’ आणि ‘ज्ञानेश्वरी’ यांच्या प्रती अत्यल्प दरात विकल्या जातात. हजारो लोक हे धार्मिक ग्रंथ या वेळी विकत घेतात.
आषाढ हा महाराष्ट्रातील पावसाच्या आगमनाचा महिना. पावसाच्या सरी येत जात असतात. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्यास हा महिना फारच अनुकूल असतो. विशेषत: दूषित पाणी पिण्यामुळे हे रोग फार पटकन फैलावतात. हल्ली त्याविषयीची जागृकता ब-याच अंशी वाढलेली असल्यामुळे पालख्यांच्या बरोबर निर्जंतुक पाण्याचे टॅंकर सतत पाणी पुरवठा करीत असतात. महानगरपालिकांतर्फे स्वच्छ पाणी पिण्यासंबंधी वारंवार सूचना लाऊडस्पीकरवरून करीत असतात. सामाजिक ऋणाचे बंधन पाळणा-या डॉक्टरांचे फिरते पथक दिंडीबरोबर जीपमधून सतत औषधांचा पुरवठा करीत असते. मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. हे फिरते दवाखाने ही वारक-यांची मोठीच गरज असते. डॉक्टर्स चक्क रजा काढूनही वारक-यांच्या सेवेची ही संधी घेतात.
दिवसा लवकर उठून शूचिर्भूत होऊन अभंग म्हणत म्हणत चालू लागायचे, मध्यान्हीला पोटपूजा आटोपून रस्त्याच्या कडच्या वृक्षांखाली थोडी विश्रांती घ्यावयाची व पुन्हा चालणे सुरू करायचे. अंधार पडला की जवळपासच्या गावी किंवा वस्तीवर मुक्काम करायचा असे वारक-यांच्या प्रवासाचे स्वरूप असते. काही काळानंतर त्याला एकसुरीपणा येतो. तो एकसुरीपणा घालविण्यासाठी आणि मनोरंजनासाठी ‘रिंगण’ नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा पालखीबरोबर पार पाडला जातो. एखाद्या मोकळया मैदानाच्या जागी भक्तगण गोळा होतात. आणि उभे किंवा वर्तुळाकार रिंगण तयार केले जाते. म्हणजे पालखी, ध्वज हे मध्यभागी ठेवून भक्तगण त्याभोवती वर्तुळाकारात उभे रहातात किंवा दोन समांतर ओळीत उभे रहातात. रिंगणात रांगोळयांच्या पायघडया घातल्या जातात. मानाचे दोन अश्व हे प्रशिक्षित असतात.
एका अश्वावर कुणीच आरूढ होत नाहीत . त्याला ‘माऊलीचा’ अश्व म्हणतात. दुस-या अश्वावर एक कानडी घोडेस्वार आरूढ होतो. माऊलीचा अश्व सुमारे एक कि. मी. वरून पळत येऊन रथात असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना मान टेकवून नमस्कार करतो, रथाला प्रदक्षिणा घालतो आणि चोपदाराने आदेश दिला की पुन्हा पळत जातो. हा क्षण पहाण्यासाठी लाखो वारकरी डोळयात प्राण आणून वाट पहात असतात. ठराविक संकेतानंतर हे अश्व गोलगोल फे-या घालून रिंगण घालतात किंवा समांतर उभ्या राहिलेल्या वारक-यांमधून एका टोकाकडून दुस-या टोकाकडे धावतात. अश्वाला स्पर्श करण्यासाठी वारकरी आसुसलेले असतात. मानाच्या अश्वाची रिंगणे झाली की वारकरी त्या रिंगणात उतरून झिम्मा-फुगडी, विविध प्रकारच्या उडया, लेझिम, भारुडे असे सामुदायिक खेळ खेळतात. खेळात भाग न घेतलेले वारकरी बाहेरच्या गोलात उभे राहून हा मनोरंजनाचा कार्यक्रम पहातात. पालखीच्या मुक्कामात गावोगावी अशी रिंगणे होतात.
भगव्या रंगाचे झेंडे आषाढाच्या मेघाच्छादित ‘सावळया’ आकाशाच्या पार्श्वभूमीवर फार उठावदार दिसतात. भडक गुलाबी किंवा केशरी रंगाची पागोटी आणि हिरव्या, जांभळया किंवा लाल रंगाची लुगडी नेसलेल्या स्त्रिया पावसाळी हवेतील जराशा अंधारलेल्या वातावरणात रंगत आणतात. जमिनींवर पाणी पिऊन हिरवी लव उगवायला लागलेली असते. अबीर-बुक्क्याची उधळण चालू असते. टाळ,चिपळया, मृदुंग, हरिनामाचा घोष, सामुदायिक अभंगपठण या नादांची मेघांच्या गर्जनांशी स्पर्धा चालू असते. पावसाच्या सरी कधी सुखद अशा रिमझिमत्या पावसाच्या सरींनी वारक-यांना शूचिर्भूत करतात तर कधी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढतात. रंग-गंध-नाद आणि भाविकतेने प्रभारित झालेले वातावरण असा या पालख्यांचा सोहळा पाहून जर एखादा मराठी माणूस आतून हलला नाही तर खुशाल त्याच्या मराठीपणाविषयी शंका घ्यावी !
वारकरी रिंगण मजल दरमजल करीत साधारणत: १६ ते १७ दिवस चालत, रात्रीचा गावोगावी मुक्काम करीत, भजन-कीर्तनांत रममाण होत दोन्ही पालख्यांचे सर्व वारकरी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूरच्या अलिकडील ‘वाखरी’ या गावी एकत्र होतात आणि एकादशीच्या दिवशी सर्व भक्तजन पंढरपुरात झुंबड उडवतात.
एकादशीच्या दिवशी वारकरीच नव्हे तर बहुतेक सर्व मराठी लोक उपवास करतात. त्यासाठी उपवासाचे पदार्थ केले जातात. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या वारीचे सार्थक आणि पुण्य पदरात पडल्याचे समाधान मिळवायचे असते. पंढरपूरच्या मंदिरात आणि आसपासच्या परिसरात माणसांचा महापूर लोटतो. बहुधा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठोबा-रखुमाईची महापूजा होते. विठ्ठलाच्या आरतीने पूजेची सांगता होते. या आरतीत एकादशीच्या सोहळयाचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे. दिवसभर हा परिसर भजन – कीर्तनाने दुमदुमून निघतो. चंद्रभागेचे वाळवंट भक्तांनी फुलून येते.
‘आजि संसार सुफळ झाला गे माये
देखियले पाय विठ्ठोबाचे
सो मज व्हावा, तो मन व्हावा
वेळोवेळा व्हावा पांडुरंग’
असे म्हणत वारकरी कृतकृत्य होतात. पुढच्या वर्षीच्या आषाढी एकादशीची स्वप्ने पहात संसाराकडे वळतात.
(वारकरी संप्रदाय यांच्या घेतलेल्या मुलाखतीतुन केलेले लिखाण)
सौ.रूचिरा बेटकर नांदेड.
9970774211