नांदेड दि. 28 :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन रविवार 1 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. या लोकअदातीलचे कामकाज प्रत्यक्ष ऑनलाईन माध्यमाद्वारे व्हीडीओ कॉलींग, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलीग, व्हिडीओ कॉलींग अॅपद्वारे करण्यात येणार आहे. नांदेड न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाकाळात न्यायालय पुर्ण क्षमतेने सुरु नसल्याने त्याचा परिणाम दाव्यांच्या सुनावणीवर झाला आहे. त्यामुळे पक्षकारांवरही आर्थिक, सामाजिक परिणाम होत आहे. प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ज्याना प्रत्यक्ष न्यायालयात येणे शक्य नाही अशा पक्षकारांना व्हॉट्सअॅप किंवा कोणत्याही ऑनलाईन पध्दतीने लोकअदालतीत सहभाग नोंदवता येणार आहे. पॅनेल प्रमुख व पॅनल सदस्य हे पक्षकारांना हच्र्युअली एकत्र आणणार आहेत.
या ऑनलाईन राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी, मो.अ.दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे, विद्युत कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम यांचे थकीत बाकी येणे बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची प्रकरणे, प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस. एस. खरात व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले आहे.