स्वातंत्र्या….!

कविता

स्वातंत्र्या….!

तू आल्याची अफवा पसरली 

त्याला आता कित्येक वर्षे उलटून गेलीत 

कित्ती उशीर होतोय तुला 
आमच्याशी हस्तांदोलन करायला 
उपभोगण्यासाठी काहीच राहिलं नाही शिल्लक 
तसं आधीही नव्हतं काही 

कधीचीच सताड उघडी आहेत 
आमची खिडक्या दारं
वस्त्या रस्ते आणि हृदये सुद्धा 

वसुधैव कुटुंबकम च्या सुभाषितात 
येवून राह्यलाय रहस्यमय अगतिक वास 

तू हरखून जाऊ नको त्यात 
तू हरवून जाऊ नको त्यात 
तू अडकून राहू नको त्यात 

दे आमच्या वाट्याचा 

उजेड आमचा आम्हा
ऐक खैरलांजी बेलछी
भगानाचा  आक्रोश
अडवून धर ते कारखान्याचं
विषारी पाणी 
आमच्या शेताभातात येण्याआधी
घे त्या झोपड्यांना कवेत 
मार मिठी त्या जर्जर देहांना 
जे आजही तुझीच वाट पाहत आहेत दूर डोंगरदऱ्यात
तू फुलव हास्य त्यांच्या निरागस चेहऱ्यावर 
तू जोजव स्वप्न त्यांच्या मनातली अनादी

कित्येकदा झालंय आयुष्याचं वर्ल्ड
 ट्रेड सेंटर
तू स्थितप्रज्ञासारखं पाहू नकोस युद्ध 

तू पुन्हा कधीच हसवू नकोस बुद्ध 
पोटातले आतडे आता अन्नही सहन
 करीत नाही 
१०० मेगा पिक्सेल कॅमेऱ्यातही 

बसत नाही आमच्या दारिद्र्याचं चित्र

स्वातंत्र्या 
तू राख लाज 
तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अशक्त देहांची 
तू निर्दयपणे उधळून दे ती काट्यांची शेज 
तू बेदरकारपणे फोडून काढ कुबेरांची मेज

तू पाडू नकोस पैस्यांचा पाऊस
तू हलवू नकोस पैश्याच झाड 
तू फक्त उभा रहा माझ्या
 माणसासोबत
अभिमान होऊन
संविधान होऊन

आम्ही नाही कृतघ्न 

आम्ही उचलणार नाही शस्त्र
आम्ही शिव्याही देणार नाही तुला 
आम्ही करणार नाही गद्दारी 
आम्ही पत्करणार नाही लाचारी 
रक्तच देत नाही परवानगी 
या विमनस्कतेला
या हाताशेला 
शरीराची लेखणी करून 
आम्ही जगतो चळवळीची जिन्दगानी तरी तू ये 
लेखणी मोडून पडायच्या आत ये 

स्वातंत्र्या 
एक कर 
तू येतांना एकटा येऊ नकोस
तू घेऊन ये तुझी भाऊबंदकी
तू घेऊन ये समता 
तू घेऊन ये बंधुत्व 
न्याय हि आण सोबत 
कारण तू एकटा 
असूनही नसल्यासारखा
मेंदूशिवाय शरीरासारखा 
फळाशिवाय झाडासारखा 
विचारांशिवाय शब्दासारखा 
येतांना डोक्यावर संविधान 
आणायला विसरू नकोस 
आम्हाला नव्याने पुन्हा पुन्हा 
वाचायचे आहे ते पुस्तक 
शोधायची आहेत आमची आयुष्ये 
पुन्हा पुन्हा त्या पुस्तकात 
कारण याच पुस्तकात ठेवलीये म्हणे 
आंबेडकरांनी आमची स्वप्ने सुरक्षित

स्वातंत्र्या… 

तू एवढं करच
तुला हे करावंच लागेल 
नाही तर
आमच्यातलाच कुणीतरी उद्याही विचारेल  
” स्वातंत्र्य कंच्या गाढवीचं नाव
 आहे ?” म्हणून..  

मा.प्रशांत वंजारे, 

आर्णी, यवतमाळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *