स्वातंत्र्य आणि प्रश्न….
आज आपल्या स्वातंत्र्याचा ७३ वा वर्धापन दिन. स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या कालखंडात सर्वच भारतीयांच्या आयुष्यात हा ध्वज येत राहिला आणि दरवर्षी डौलानं फडकत राहिला. मात्र अण्णाभाऊंनी ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है! ही घोषणा का दिली याचे आजच्या काळातही असणारी चिंतनशील बाब आहे. आज भूकेचे सार्वत्रिक प्रश्न मिटले आहेत का? स्वातंत्र्याने इथल्या तमाम अन्नवंचितांना पोटभर अन्न दिले का? आज लोकांच्या गरजा काय आहेत? अण्णाभाऊंचा तो प्रश्न १३० कोटी पेक्षा अधिक असलेल्या भारतवासीयांना तुम्ही कोणत्या देशाचे रहिवासी आहात? हा प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न सरकार करीत नाही म्हणून प्रश्न तेच नाहीत पण कायम आहेत. प्रश्न सतत जन्म घेत राहतात. ते माणसांशी झुंजत राहतात. माणसंही आपल्या मूलभूत प्रश्नांशी झुंजत असतात. पण जिथे राष्ट्रहिताचा प्रश्न असतो तिथे लोक आपले प्रश्न काही काळ बाजूला ठेवत असतात. राष्ट्रध्वज आपले राष्ट्रीय प्रतिक आहे. त्याची आब राखलीच पाहिजे. केवळ चिन्हे आणि प्रतिकेच नव्हेत तर आपण आपले राष्ट्रीयत्व जपणारी सकल संपदा जपलीच पाहिजे. आपण अनेक नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांचा धीरोदात्तपणे सामना केला आहे. त्यात जिंकलोही आहोत. गेलेल्या सर्वकाळात आपण आपल्या राष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखली आहे.
आपले हक्क आणि कर्तव्य यात आपल्याला गल्लत करता येत नाही. एकामागून एक आपण आपल्या स्वातंत्र्याचे वाढदिवस साजरे करीत असताना राष्ट्रध्वजाचे कापड हे इथल्या दलित अबला महिलेची आबरु झाकू शकेल काय? हा प्रश्न आंबेडकरी चळवळीतील पँथर राजा ढाले यांनी विचारला होता. साहजिकच या विधानावर उत्तरादाखल प्रचंड गदारोळ उठला होता. महिलांबाबत अनेक कायदे करुनही ढालेंचा प्रश्न अजूनही उत्तर शोधत असेल तर आम्ही कोणते स्वातंत्र्य मिळविले? हा प्रश्न उपस्थित होतो. जातीय अस्मिता, धार्मिक तुष्टीकरण, माणसांची वर्गवारी, दंगलीचा दहशतवाद, दमन आणि सर्व प्रकारच्या शोषणाची काळी छाया हे जळते प्रश्न स्वातंत्र्यासमोर आहेत. इथल्या दीनदलित, पीडित, सर्वच हक्क आणि अधिकार वंचित लोकांसमोरच अनेक प्रश्न निर्माण होत असतात. हे प्रश्न सार्वजनिक नसतात. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या समाजाला तळभारतातील माणसांचे प्रश्न हे प्रश्न वाटत नाहीत. इतरांना हे देशावरचे संकट वाटत नाही. आंदोलनांनी काही प्रश्न उभे केले तरच ते लक्षात येतात. ज्यांना सामान्य जगण्याच्या अनेक समस्या असतात ते नव्याने निर्माण झालेल्या छळवादाशी झुंजतात. हे लोक एक प्रकारच्या मानसिक गुलामीतच जगतात.
आज अख्खे जगच कोरोनाच्या गुलामीत जगत आहे. जगभरातील देशांसमोर ज्यांचे त्यांचे प्रश्न उभे आहेत. ज्या देशावर कोरोना नावाच्या अदृश्य पण अस्तित्वविहीन नसलेल्या विषाणूंनी हुकुमत निर्माण केलेली आहे त्या देशांनाही कोरोनामुक्तीचे स्वातंत्र्य हवे आहेत. जगाला एका नव्या स्वातंत्र्याची गरज आहे. जगातून कोरोना समूळ निघून जाईल तो जागतिक कोरोनामुक्तीचा दिन असेल. तो पर्यंत काय काय होईल, काय उलथापालथ होईल हे सांगता येत नाही. कोरोनापासून जगाने काही शिकावं हे लोकच सांगत सुटले आहेत. पण ही काही इष्टापत्ती असण्याचे काही कारण नाही. माणसाने कसे जगावे, कसे राहावे हे एखादा रोग शिकवत असेल तर यात मानव्यतेचा पराभव आहे. या महामारीला आपण महायुद्धाच्या नजरेने पाहिले आहे. जिथे आरोग्याचे प्रश्न आधीच होते तिथे या रोगाशी झुंजता झुंजता कित्येक शहीद झाले. जे जिंकले ते योद्धा झाले. या नव्या गुलामीवर मात करण्यासाठी जगातील अनेक प्रयोगशाळा युद्धाची तयारी करीत आहेत. हे महायुद्ध लढले जाईल आणि स्वातंत्र्य मिळेल पण विरोधात एक विषाणू आहे. त्यांच्याविरुद्ध अख्खे जग आहे. हे महायुद्ध येत्या काळात कितीकाळ आणि कितीवेळा लढावे लागेल याची काही गणती नाही. काळजी, सुरक्षितता, युद्धपूर्व उपाययोजना ही आपली आयुधे आहेत. पण सर्वसामान्य माणसांची किमान जीवनमान जगण्याची जी आयुधे होती ती म्यानच झाली आहेत. तरीही आपण जिंकूच हा विश्वास कायम आहे. संघर्ष हे या लोकांच्या श्वासांचे भाष्य आहे.
ज्यांना आंदोलने करुनच आपले अधिकार पदरात पाडून घ्यायचे असतात ते आता काहीच करु शकत नाहीत. आपल्या देशाचे प्रश्न इतर देशांच्या तुलनेत वेगळेच आहेत. राष्ट्रध्वजाला सलामी देणे म्हणजे आम्हाला हवे ते स्वातंत्र्य मिळाले आहे हे घोषित करणे नव्हे. दररोजच्या गुलामीतून सुटका होण्यासाठीची धडपड कोरोनाने रोखली आहे. या गुलामीने हक्कसंघर्षातून मिळणारी भाकर हिरावून घेतली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाऊ शकतो, अशी परिस्थिती आज नाही. ती का नाही ते सर्वांनाच माहिती आहे. लोकांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरण्याचे आता कारण नाही. शासन प्रशासनाच्या विरोधात उभे राहणारे पेंडाॅल खूपच कमी झाले आहेत. निषेध आणि निदर्शनांना आता अवकाश नाही. आंदोलन झालेच कोणते तर त्याला आवाज नाही. तो आवाज तोंडाला लावलेल्या मास्कने दाबला गेला आहे. म्हणून जेव्हा प्रश्न जन्माला येतील तेव्हा ते दाबल्या जातील. ते पुन्हा पुन्हा उगवत राहतील पण ज्यांना ते सोडवायचे असतात त्यांनाच ते सोडवावे लागतील. तुमचे बोट पकडून कुणी अंधारातून उजेडाकडे घेऊन जाणार नाही. तुम्हाला लढायचे आहे तसे तुम्हालाच तुमच्या स्वातंत्र्याचा उजेड शोधायचा आहे.
गंगाधर ढवळे,नांदेड