कंधार ; प्रतिनिधी
एकेकाळी कंधार आगार भरभराटीत होते. परंतू आता ती गोष्ट राहिली नाही. जुन्या आणि भंगार गाड्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. आता गाड्यांची अवस्था फारशी चांगली राहिली नाही. अशा गाड्या चालवताना चालकांची कसरत होते. अशा परिस्थितीतही चालकांना जबाबदारीची जाणीव आहे. कंधारमधील एसटी चालक मोठ्या खुबीने आपले कर्तव्य पार पाडत असून ही अभिमानाची बाब आहे, अशा शब्दात शिवसेनेचे नेते ॲड. मुक्तेश्वर धोंडगे यांनी कंधार आगारातील चालकांचे कौतुक केले.
बहाद्दरपुरा येथील पांचाली इन्शुरंस सेल्सच्यावतीने दि. ८ सप्टेंबर रोजी कंधार आगारातील सुरक्षित सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आगार प्रमुख ठाकूर अध्यक्षस्थानी होते. विभागीय नियंत्रक संजय वाळवे, पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे, नगरसेवक मन्नान चौधरी, शहाजी नळगे, गणेश कुंटेवार, अरुण बोधनकर स्वप्नील लुंगारे, विनोद पापीनवार, पांचाली इन्शुरंसचे बसवेश्वर पेटकर,कारतळ्याचे सरपंच संभाजी पाटील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना ॲड धोंडगे म्हणाले की,एस टी महामंडळाच्या चालकांना प्रोत्साहन मिळावा यासाठी पांचाली इन्शुरंसच्या बसवेश्वर पेटकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम हे कौतुकास्पद बाब आहे. काम करणाऱ्याच्या पाठिवर शाबासकीची थाप कोणीतरी मारली पाहिजे तरच काम करणाऱ्याला हुरूप येतो. आणि ते काम पांचाली इन्शुरन्सच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात २५ वर्ष सुरक्षित सेवा देणारे भगवान पेटकर, २० वर्ष सेवा देणारे नामदेव मुंडे, हणमंत ताटे, बालाजी केंद्रे, दीनानाथ वरकड, १५ वर्ष सेवा देणारे सटवाजी शामगिरे, निवृत्ती केंद्रे, हणमंत राठोड, संभाजी गुट्टे, प्रल्हाद बोर्डे तसेच १० आणि पाच वर्षे सुरक्षित देणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात आला. भास्कर गिते यांनी प्रास्ताविक केले. एन. डी. ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश अडलवाड यांनी आभार मानले.