पुस्तक वाचनातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात – प्रा. डॉ. संजीव रेड्डी


मुखेड -आजच्या पिढीमध्ये वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो ते ए.पी.जे.अब्दुल कलाम सतत वाचन करीत असत. त्यांना मिसाईल मॅन म्हणून ही ओळखले जाते.अनेक तांत्रिक प्रकल्प त्यांनी मार्गी लावले व महत्त्वपूर्ण काम केले. खऱ्या अर्थाने प्रशासक कसा असावा हा गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. त्यांची इच्छाशक्ती दांडगी होती.

कामावर जिवापाड प्रेम करत असत. जागतिक स्तरावर हाच दिवस जागतिक स्टुडन्ट डे म्हणून साजरा केला जातो. ते नेहमी म्हणत की जे स्वप्न झोपू देत नाहीत ते स्वप्न बघा. जळाल्या शिवाय तुम्हाला सूर्यासारखा प्रकाश देता येणार नाही. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची चरित्रे वाचली पाहिजेत. वाचनाने आकलनशक्ती,कल्पनाशक्ती व तर्कशक्ती वाढते. मेमरी उत्तेजित होते.आपण दररोज अर्धा तास तरी किमान वाचन केले पाहिजे. वाचाल तरच वाचाल. पुस्तक वाचनातून ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात असे प्रतिपादन स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा ग्रामीण ( कला, वाणिज्य विज्ञान) महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात कार्यरत प्रा. डॉ.संजीव रेड्डी यांनी प्रस्तुत महाविद्यालयाचे ग्रंथालय विभागाने आयोजित केलेल्या वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन बोलताना केले.


कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड म्हणाले की आजच्या या दिवशी आपण हिंदूंचा दसरा सण साजरा केला.ज्यात वाईटाचे दहन व चांगल्याचा स्वीकार हा उद्देश होता. याच दिवशी धम्मचक्र अनुपरिवर्तन दिन साजरा केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पासष्ठ वर्षापुर्वी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता व आजच्या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो आहोत.

या तिन्ही बाबींचा उद्देश लक्षात घेऊन आपण आज वर्तन करतो का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. आजपर्यंत अनेक माणसे ही वाचनाने मोठी झाली आहेत.कलाम साहेबांनी आयुष्यात पैसा व संपत्तीला महत्त्व दिले नाही. त्यांना अनेक विद्यापीठांनी मानद पदव्या बहाल केल्या. आपण अविरतपणे वाचत राहिले पाहिजे.

वाचनातून ज्ञान मिळते. त्या ज्ञानात वृध्दी होते. झोप लागण्यासाठी वाचायचे की झोप उडवण्यासाठी वाचायचे हे ठरवले पाहिजे. वाचनाने भाषा व उच्चारात सुधारणा होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार संपन्न केला तदनंतर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. एस. बाबाराव यांचा वाढदिवस असल्यामुळे विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्रंथपाल प्रा. डॉ.सूग्रीव क्षीरसागर यांनी केले तर आभार ग्रंथालयातील सोमनाथ माने यांनी मानले.यावेळी चरित्रात्मक ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे त्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे, माजी प्राचार्य डॉ.रामकृष्ण बदने,प्रा. डॉ.देवीदास केंद्रे, स्टाफ सेक्रेटरी व्यंकट चव्हाण व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *