खुरगावच्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास सहकार्य करावे – भदंत डॉ. उपगुप्त महास्थविर


नांदेड – श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून एक सशक्त धम्मचळवळ उभी राहिली आहे. भदंत पंय्याबोधी थेरो आणि त्यांचा भिक्खू संघ हे श्रामणेर प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करुन धम्माचे तेजस्वी काम करीत आहेत. प्रशिक्षण केंद्राच्या विकासासाठी उपासकांनी मोठ्या प्रमाणावर आर्थिक दान दिले पाहिजे.

त्याबरोबरच सामाजिक सांस्कृतिक तथा राजकीय अशा विविध क्षेत्रातील उपासकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन तालुक्यातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांचे गुरू भदंत डॉ. उपगुप्त महास्थविर यांनी खुरगाव येथे केले.

यावेळी मंचावर भदंत महाविरो स्थविर, भदंत पंय्याबोधी थेरो, भंते चंद्रमणी, भंते धम्मकिर्ती, भंते संघरत्न, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद यांच्यासह नवदीक्षित श्रामणेर भिक्खू संघ, आंबेडकरी उद्योजक यशवंत उबारे, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस.एच. हिंगोले, धम्मसेवक गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे आदींची उपस्थिती होती. 


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भदंत चंद्रमणी महास्थवीर यांनी धम्मदीक्षा दिली. बाबासाहेबांनी याद्वारे थेरवाद ही परंपरा अंगिकारली. थेरवाद ही प्राचीन विचारधारा आहे. तिचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. भदंत पंय्याबोधी थेरो हे जोमाने काम करत आहेत. भिक्खू संघांनी बौद्ध धम्माच्या थेरवादी संस्कृतीचे जतन केले पाहिजे असेही ते म्हणाले. 

भदंत पंय्याबोधी थेरो यांनी गेल्या तीन वर्षांपासून खुरगाव येथे सुरू असलेल्या धम्मचळवळीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, फक्त दीड एकर जमीन खरेदी करून त्यात छोटेसे प्रशिक्षण केंद्र उभारले आहे. आत्तापर्यंत सुमारे साडेतीनशेहून अधिक उपासकांना श्रामणेर दीक्षा दिली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणही झालेले आहे.

धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे आयोजन करुन जिल्हा व जिल्ह्याच्या बाहेरील परिसरात भिक्खू संघ चारिका करीत आहेत. या प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीसाठी अनेक उपासक उपासिकांनी विविध स्वरूपाचे दान दिले आहे. आगामी काळात भव्य उपक्रम राबविण्यात येणार असल्याची ग्वाही पंय्याबोधी यांनी दिली. 


               ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा परिसरात आश्विन पौर्णिमेनिमित्त ग्रंथवाचन समारोप व दसदिवशीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण, परित्राणपाठ, त्रिरत्न वंदना आदी गाथांचे पठण झाले.

तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे दीप आणि पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले. उपासकांच्या याचनेवरुन भिक्खू संघाने त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर बोलताना डॉ. उपगुप्त महास्थवीर म्हणाले की, सत्ता, संपत्ती, पद – प्रतिष्ठा हे केवळ शून्य आहे. बुद्धाच्या हातात फक्त भिक्षा पात्र होते परंतु डोक्यात मानवी दुःखाचे उत्तर आणि जगण्याचे तत्वज्ञान होेते.

त्यामुळे बौद्ध धम्म अफगाणिस्तान ते श्रीलंका असा जगभर पसरला. बौद्ध शिल्प, लेण्या, शिलालेख, प्राचीन ग्रंथ हीच आपली संस्कृती आणि संपत्ती आहे. तिचेही जतन झाले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी काळेगाव ता. अहमदपूर येथील भदंत महाविरो स्थविर यांचीही धम्मदेसना संपन्न झाली. 


            सोहळ्याच्या तिसऱ्या सत्रात सुगाव येथील  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक सुभाष लोकडे, गायिका माया खिल्लारे, वंदना खिल्लारे यांच्या पंचशील गीत गायन संचाचा कार्यक्रम संपन्न झाला. उपासकांनी दान पारमिता केली. तथागत नगरच्या महिला मंडळाने उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना भोजनदान दिले.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले तर आभार धम्मसेवक गंगाधर ढवळे यांनी मानले.‌ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपासक सिद्धांत इंगोले, उमाजी नरवाडे, नागोराव नरवाडे, आप्पाराव नरवाडे, उमाजी नरवाडे, वामन नरवाडे, अनिता नरवाडे, सुरेखा नरवाडे, रवी नरवाडे, मधुकर नरवाडे, साहेबराव नरवाडे, कृष्णा नरवाडे, राजरत्न नरवाडे, अनिल नरवाडे, सूरज नरवाडे, संजय नरवाडे, संजय सोनकांबळे, संदिप सोनकांबळे, कपिल बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले.

या सोहळ्यासाठी विविध ठिकाणच्या महिला मंडळासह बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

अविद्या आणि तृष्णा हे दुःखाचे मूळ – भदंत महाविरो स्थविर
भदंत डॉ. उपगुप्त महास्थवीर यांच्यानंतर काळेगाव ता. अहमदपूर येथील भदंत महाविरो स्थविर यांचीही धम्मदेसना झाली. ते म्हणाले की केवळ तृष्णा हेच दुःखाचे मूळ नाही तर अविद्या हेही दुःखाचे मूळ आहे. धम्माचे यथोचित ज्ञान आपल्याला मिळाले पाहिजे. सद्धम्म समजला पाहिजे. अज्ञानाच्या अस्तित्वामुळे दुःख निर्मिती होते. माया, लोभ, मोह मद, मत्सर, द्वेष या षडरिपूंचा त्याग केला तर आपल्याला सदद्धम्माच्या वाटेवर चालता येते. हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.  उपासकांनी सर्वोतोपरी उपेक्षा करुन बुद्धाचा धम्म समजून घ्यावा. श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धम्मचळवळीचं काम सुरू आहे. त्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. पुढील काळात अनेक श्रामणेर शिबिरांचे आयोजन करुन धम्म समजून सांगण्याची आणि समजून घेण्याची प्रक्रिया सतत सुरू असली पाहिजे अशी अपेक्षा भदंत महाविरो यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *