आठवणीतील विद्यार्थी :– माधव राघो जाधव

       
                              

     वाटेगाव हे छोटसं खेडं हदगावपासून चार पाच कि मी दुर असेल . या गावाहून बरीचशी मुलं जिप हायस्कूल हदगावला शिकायला येत . यात माधव जाधव , अरविंद जाधव ,विनोद जाधव ,चांदराव जाधव असे बरेच मुलं येत असत . मीही बऱ्याच वेळा वाटेगावला जात असे .

विशेष करून विनोद भगवानराव जाधव यांच्या घरी बऱ्याच वेळा मी गेलो होतो . तेथील सर्वच विद्यार्थी प्रेमळ व शिस्तीत वागणारे होते . प्रौढ साक्षरता अभियानातही वाटेगावला मी अधूनमधून भेटी देत असे . वर्गात शिकवितानाही मी सर्वच मुलामुलीना सांगायचो , ” वाटेन चला म्हणजे वाटेगावला पोहचू . “

              वाटेगावहून येणाऱ्या मुलात माधव राघो जाधव हा एक विद्यार्थी होता .गोल चेहरा , पातळ सरळ नाक, सुंदर पाणीदार डोळे असलेला हा मुलगा त्याच्या रहाणीमाणावरून सामन्य घरचा वाटायचा नव्हे सामान्य घरचा होता . साधे पण स्वच्छ कपडे परीधान करून तो शाळेत यायचा .वर्गात वागायला सरळ . स्वभाव अतिशय शांत . माझ्या समोर हा फारसा तोंड उघडत नसे . पण सर्व मुलांसोबत हाही माझ्या जवळ जवळ घुटमळत राहयचा . मोजकचं बोलणे हा त्याचा गुण होता

चेहऱ्यावर तेज आणि स्मीतहास्य  नेहमी झळकणाऱ्या माधव कडे वाटेगावहून येण्यासाठी एक सायकल होती . ती सायकल म्हणजे अवर्णणीय व अविस्मरणीय अशीच होती . त्याच्या चाकातील तारा वाकडया तिकडया झालेल्या .सीट पूर्ण जीर्ण झालेली . सायकलचा जन्म झाला तेव्हाच बिचारीला रंगवलं असेल . जागोजागी सायकलच्या वेगवेगळ्या भागावरचे रंग उडालेलं, गंज खालेलं मडगार्ड, तुटलेल कॅरीअर .तर समोरच्या मडगार्डचं ही नाक कापल्या सारखं वाटायचं .थोडक्यात ती सायकल ही शेवटची घटका मोजत होती .ती सायकल त्याच्या साठी हिरोहोन्डा होती . 

कोणत्याही महागड्या कारपेक्षा ती त्याला खुप प्यारी होती . ती सायकल मोडकी तोडकी होती तरीही त्या पठयानं पाठीमागच्या मडगार्डवर ” माधव राघो जाधव ” असं नाव लिहिलेलं होतं . ते बहुधा त्याने स्वतःच्या हस्ताक्षरात लिहीलेलं होतं . वारनीशने लिहीलेले अक्षर लहान मोठे व वेडेवाकडे  होते . अक्षर लिहीतानां वारनिशचे ओघळ बऱ्याच दिशानी पसरलेले होतं . अशी होती माधवची सायकल .

               माधव त्या सायकलवर नियमित शाळेत यायचा . हा बहुधा शाळेतून डूमा मारत नसे . अभ्यासही व्यवस्थित करायचा . माधव हा एक साधा सामान्य घरचा मुलगा एका टपरी सायकलवर येणारा आज एक मराठीचा नामवंत प्राध्यापक म्हणून नारायणराव वाघमारे वरिष्ट महाविद्यालय अखाडा बाळापूर जि. हिंगोली येथे कार्यरत आहे . तो सध्याला मराठी विभाग प्रमुख ही आहे

माधवने जिप हायस्कूल हदगाव मध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलंय व हदगाव येथूनच कला वाणिज्य महाविद्यालयातून बीएची पदवी ही घेतली .डॉ . बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठातून एम ए पूर्ण केलं . तो सामान्य मुलांसारखं तेवढयावरच समाधान मानलं नाही तर “राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा लोकतवीय अभ्यास . “हा विषय घेवून पीएचडी ही सर्वोच्च पदवीही प्राप्त केलेली आहे .

              आज माधव केवळ विद्यार्थांना शिकविण्यातच समाधान न मानता त्या पलीकडेही काही करता येते हे त्याने हेरलेले आहे . तो आज समाजकार्यकर्ता म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार गावोगावी पोहचायचे काम करित आहे . खेडयातील लोकांना त्यांच्या अनेक समस्या कशा सुटतील यासाठी तो जणजागृती करत आहे . तो जसा व्याख्यानातून जण जागृती करतो तसा विविध विषय , समस्यावर लेखन करुनही जणजागृती करत आहे .

 त्याचे अतापर्यंत वेगवेगळ्या विषयावर आठ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत . स्मरणिका ,वार्षिक अंकातही माधवने रगड लेखन केलेले आहे व करत आहे .विधिव नियतकालींकामधून कथा लेखन, काव्यलेखन व शोधनिबंधही प्रसिद्ध झालेले आहेत . हा माधव आजघडीला नांदेडच्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वेगवेगळ्या चळवळीत ,  कार्यक्रमात सहभाग घेत असतो .

विद्यापीठात तो मराठी अभ्यास मंडळचा सदस्य म्हणूनही भरीव कार्य केलेलं आहे . हा माझा एक गुणी विद्यार्थी मला जेथे भेटतो तेथे माझ्या समोर नतमस्तक होतो . त्याचा विनम्रपणा व शालीनता मनाला भावते . म्हणूनच मनात विचार येवून जातात  “विद्यार्थी हेच शिक्षकांची खरी धनसंपती आहे . “

M.R.RATHOD
M.R.RATHOD

राठोड .एम आर ( गुरुजी ),

“गोमती सावली ‘काळेश्वरनगर विष्णुपूरी

नांदेड . ९९२२६५२४०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *