रक्तदान काळाची गरज – एन टी बरबडेकर

नायगाव ; प्रतिनिधी

रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे.एकाने रक्तदान केल्यास एखाद्या गरजू ला जीवनदान मिळते. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. समाजात रक्‍तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्‍तीत जास्‍त लोकांमध्‍ये जनजागृती करुन रक्‍तदान वाढवणे ही आजच्‍या काळाची गरज आहे. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी व नवीन तरुणाने पुढे येणे गरजेचे आहे असे मत एन टी सर तिप्पलवाड बरबडेकर यांनी यावेळी व्यक्त केले.


महाराष्ट्र राज्याचे लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दि 19 डिसेंबर 2021 रोजी बरबडा ता नायगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
“दानात दान, रक्तदान, हेच श्रेष्ठ दान” आहे. रक्‍तदान हे जीवनदान देण्‍यासाठी आवश्‍यक आहे. भारतीय संस्कृती मध्ये अनेक प्रकारचे दान सांगितले आहेत त्यामध्ये रक्तदान हे सुद्धा खूप मोठे दान आहे. भारतामध्ये महादानाची परंपरा आहे. कवचकुंडले देणारा दानशूर कर्ण असो किंवा आपल्या स्वत:चे मांस देऊन कबुतराचे जीवन वाचविणारा राजा शिबी असो. रक्तदान केल्याने मला काय पुण्य मिळेल. माझा काय फायदा हा स्वार्थी विचार लोकांच्या मनात डोकावतो आणि ते रक्तदान करण्यापासून वंचित राहतात.

आजघडीला रक्ताची आवश्यकता खूप आहे, पण रक्तदाते जास्त नसल्याने भारतात खूप मोठी समस्या आहे. रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. रक्तदान याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत आणि हे विशेषकरून ग्रामीण भागामध्ये आहे. स्त्रियांना तर याबाबत खूप गैरसमज आहेत. यामुळे रक्तदानामध्ये स्त्रियांचा सहभाग हा केवळ दहा टक्के इतकाच आहे. रक्तदान केल्याने कमजोरी येते. चक्कर येते. मळमळ होते. काम करता येत नाही हे आणि असे बरेच समज आणि गैरसमज लोकांमध्ये आहेत.

खरंतर यापैकी एकही लक्षण रक्तदान केल्यानंतर आढळत नाही आणि हे केवळ निव्वळ गैरसमज आहेत. रक्तदान करण्यासाठी पण काही निकष आहेत. रक्तदान करताना दाता हा वय र्वष १८ ते ६५ वयातील असला पाहिजे. त्याचे वजन साधारणत: ४८ किलो भरले पाहिजे. रक्तदान करणा-या व्यक्तीला कोणताही संसर्गजन्य आजार नसला पाहिजे. रक्तदान करताना शरीरास कोणतीही इजा होत नाही किंवा त्याचे काही दुष्परिणामही नाहीत.

साधारणत: प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ५ लिटर रक्त असते आणि रक्तदानात केवळ ३५० मिली एवढेच रक्त घेतले जाते. म्हणजेच एका भरलेल्या घागरीतून एक ग्लास पाणी काढले. एवढेच रक्त काढले जाते. यामुळे कमजोरी येत नाही. विशेष म्हणजे २४ ते ४८ तासांमध्ये आपल्या शरीरात जेवढे रक्त आपण दान दिले तेवढे रक्त पूर्ववत होते.

यामुळे कुणीही गैरसमज करून घेऊ नये की रक्तदानामुळे आपणास काही शारीरिक थकवा जाणवतो किंवा यामुळे काही तोटे होतात. प्रत्येक व्यक्तीने स्वत: पुढे येऊन रक्तदानासाठी प्रयत्न केला पाहिजे.  रक्तदानामुळे काहीही त्रास होत नाही.

सुदृढ, सशक्त माणूस रक्तदान करू शकतो. आज धकाधकीच्या बर्‍याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात ऑपरेशन किंवा प्रसूतीच्या वेळी रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे आणि तो आपण समाजातील एक सूज्ञ नागरिक म्हणून करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण कितीही प्रगत झालो असलो तरी कुणालाही कृत्रिम रक्त तयार करता आले नाही किंवा इतर कारखान्यांप्रमाणे रक्ताचा कारखाना काढणे अजून तरी शक्य झाले नाही.

विशेषत: अपघातातील रुग्ण, प्रसवकाळ, अतिदक्षता विभाग यांना जास्त प्रमाणात रक्त लागते. त्यांना वेळेवर रक्त मिळालं नाही तर मृत्यूही होऊ शकतो. यामुळे आता प्रत्येक व्यक्तीने सजग राहणे गरजेचे आहे. कोणावर कधी आणि कशी वेळ येईल, हे सांगता येत नाही. यासाठी आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची काळजी असेल तर वर्षातून किमान दोन वेळेस तरी रक्तदान करावे. कारण आपण रक्तदान केले तर चार व्यक्तींना जीवदान मिळते.

रक्तदान केल्यामुळे आपणास वर्षभरात पाहिजे तेव्हा रक्ताचा पुरवठा आपण केलेल्या रक्तदान कार्डाच्या साहाय्याने होऊ शकतो.
रक्तदानामुळे अनेक फायदे होतात. रक्तामध्ये आयर्नचे (लोह) प्रमाण व्यवस्थित राहते. यामुळे रक्तामध्ये आयर्नचे प्रमाण व्यवस्थित राहिल्यास आपला कॅन्सरपासून बचाव होतो. नियमित रक्तदान केल्याने शरीरास ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. तसेच ब्लड सक्र्युलेशन व्यवस्थित होते.

यामुळे आपला हृदयविकारांपासून बचाव होतो. रक्तदान केल्याने होणारी रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी तत्काळ शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात. तसेच रक्तदान नियमित केल्याने रक्तदाब साधारण राहतो आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटते. आपण नियमितपणे रक्तदान हे तीन महिन्यांत एकदा म्हणजेच वर्षातून ४ वेळा करता येते. यामुळे शरीरात नवीन रक्तनिर्मिती होते. कोणतेही त्वचा रोग व इतर रोगास प्रतिकार करण्यास आपले शरीर हे सज्ज राहते.

रक्तदानाविषयी सर्व बाबींचा विचार केला असता रक्तदान करणे ही काळाची गरज बनली आहे. रक्तदान हे जीवनदान आहे. सर्वानी रक्तदानाचे महत्त्व समजायला हवे. कारण तुम्ही दिलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो. कधी कधी तुमच्या कुटुंबातील व्यक्तीलाही याचा फायदा होतो. विशेष म्हणजे तरुणवर्गाने सामाजिक बांधिलकी जोपासत नियमित रक्तदान करणे गरजेचे आहे.

काही तरुण करतातही. पण सध्याचा रक्तपेढीचा पुरवठा पाहता आणि लोकसंख्या पाहता रक्तदानाचे प्रमाण नगण्य आहे. यामुळे खासगी दवाखान्यात रक्त जास्त किमतीमध्ये दिले जाते. गरीब लोकांसाठी तर ते परवडणारेही नसते. मग त्यांना प्राणास मुकावे लागते. शासकीय पातळीवर, रक्तदानाबद्दल कितीही जनजागृती केली तरी पण त्या प्रमाणात रक्तदाते समोर येत नाहीत.

जगात सर्वात जास्त युवक असणा-या देशात अशा गोष्टी घडत असतील, तर आपला देश कधीच विकसित होऊ शकत नाही. सर्वानी नियमित रक्तदान केले पाहिजे. या महादानासाठी स्त्रियांनी मनात कोणताही गैरसमज न ठेवता नि:संकोचपणे पुढे आले पाहिजे. स्वतः एन एम तिप्पलवाड (एन टी सर) यांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबातील अत्यन्त दुर्मिळ असणारा रक्तगट ओ (o-) निगेटिव्ह असून त्यानी आजपर्यंत 17 वेळा रक्तदान केले आहे त्यांचा मोठा मुलगा प्रतिककुमार नागोराव तिप्पलवाड यांनी 12 वेळा रक्तदान केले त्यांचा छोटा मुलगा पवन नागोराव तिप्पलवाड याने 8 वेळा रक्तदान केले तर त्यांची पत्नी अनिता नागोराव तिप्पलवाड यांनी तीन वेळा रकदान करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मनी असेल मानवसेवेचा भाव ! रक्तदानासारखा दुसरा नाही उपाय !!

         तिप्पलवाड एन एम
     राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक

जवाहरलाल नेहरू विद्यालय बरबडा
ता नायगाव जि नांदेड
मो नंबर 9552529114

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *