स्वागताध्यक्षपदी प्रबोधनकार मधुकर महाराज बारुळकर तर निमंत्रकपदी समीक्षक गंगाधर ढवळे यांची निवड
कंधार– सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र प्रणित नवयान बहुउद्देशिय सेवाभावी संस्था गोणारच्यावतीने कंधार तालुक्यातील गोणार येथे पहिल्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांची निवड करण्यात आली असून नांदेड लोकसभेचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ प्रबोधनकार मधुकर महाराज बारुळकर तर निमंत्रकपदी समिक्षक गंगाधर ढवळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेचे अध्यक्ष रणजीत गोणारकर यांनी दिली.
गावातील विठ्ठल- रुक्मीणी मंदिर परिसरातून ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होणार असून ग्रंथदिंडीचा समारोप संमेलनस्थळी होणार आहे. उद्घाटकीय सत्रात सप्तरंगी साहित्य मंडळाच्या राज्य कार्यकारीणीच्यावतीने सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी जे.डी. गोणारकर यांना मान्यवरांच्या हस्ते सप्तरंगी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार किशनराव राठोड, मुखेड- कंधारचे आ. डॉ. तुषार राठोड, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव लोहबंदे, श्रावण पाटील भिलवंडे, प्रविणभाऊ साले, मारोती वाडेकर, किरण वट्टमवार, जफ्रोद्दीन बहाउद्दीन सय्यद, दत्ता चंदनफुले, पं.स. सदस्य गिरधारी केंद्रे, गोविंद शिंदे, नारायण गायकवाड, व्ही.जी. कदम, ऍड. विजय गोणारकर, लक्ष्मण कोंडावार, निवृत्ती कांबळे आदींची उपस्थिती राहणार आहे.
याच सत्रात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना नवयान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
दुसर्या सत्रात मराठा आरक्षणाची दशा आणि दिशा या विषयावर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उद्धव पा. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यात डॉ. राजीव पाटील दुडूकनाळे व रमेश पवार हे सहभागी होणार आहेत. त्यानंतर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रा. डॉ. रामकृष्ण बदने, प्राचार्य विजय पवार, डॉ. हेमंत कार्ले हे सहभागी होतील. त्यानंतर होणार्या कथाकथन या सत्रात शिलवंत वाढवे, विलास सिंदगीकर, शंकर विभूते, स्वाती कानेगावकर, सहभागी होणार असून प्रसिद्ध कथाकार दिगंबर कदम हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
शेवटच्या सत्रात प्रसिद्ध कवी प्रा. डॉ. गजानन देवकर यांच्या अध्यक्षतेखाली सप्तरंगी साहित्य मंडळाची ५० वी काव्यपौर्णिमा संपन्न होईल. या कविसंमेलनात जिल्हाभरातून ५० कवी सहभागी होणार आहेत.