नांदेड (ज अनुज्ञप्ती चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 15 नुसार प्रत्यक्ष चाचणी घेण्यापूर्वी उमेदवाराची सिम्युलेटर चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानुसार नांदेड येथील प्रादेशिक कार्यालयात व्हर्टेक्स संशोधन कंपनीचे दोन सिम्युलेटर प्राप्त झाले याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सह.प्रादेशिक परिवहन अधिकारी संदिप निमसे, तसेच मोटार वाहन निरिक्षक, सहा.मोटार निरिक्षक, सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण सिम्युलेटरची माहिती घेऊन स्वत सिम्युलेटरवर प्रात्याक्षिक करून पाहिले. रस्ता सुरक्षा कक्ष, शिकाऊ अनुज्ञप्ती कक्ष व संपूर्ण कार्यालयाची पाहणी करून या उपक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
ड्राईव्हींग सिम्युलेंटरचा उपयोग चारचाकी वाहन शिकणे, पक्के लायन्स काढण्यासाठी तसेच उमेदवारांची चाचणी घेण्यासाठी होणार आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग नांदेड जिल्ह्यात उत्कृष्ट वाहन चालक तयार करण्यासाठी होणार आहे. सिम्युलेटरवर प्रशिक्षण घेऊन नांदेड जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.