ऑनलाईन शिक्षण हे मोबाईल ऐवजी दूरचित्रवाणी द्वारे द्या , फुलवळ येथील पालकाची मागणी….
फुलवळ बातमीदार ( धोंडीबा बोरगावे )
दोन वर्षांपासून कोविड च्या नावाखाली शाळा बंद ठेवून जी ऑनलाईन शिक्षण पध्दती चालू आहे ती मोबाईल ऐवजी दूरचित्रवाणी द्वारे मिळाली तर सर्वसामान्य माणसाचा मोबाईल खरेदी व रिचार्ज चा खर्च टळेल तसेच मोबाईल च्या अति वापरामुळे लहान मुलांच्या बाल मनावर व शारीरिक स्वास्थ्यावर होत असलेले दुष्परिणाम नक्कीच टाळता येतील तेंव्हा पालकांच्या भावना समजावून घेऊन ऑनलाईन शिक्षण हे मोबाईल ऐवजी दूरचित्रवाणी द्वारे मिळावे असे फुलवळ येथील सुज्ञ पालक व सामाजिक कार्यकर्ते आनंदा पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणीचे लेखी निवेदन करून ता. १४ जानेवारी रोजी कंधार चे तहसीलदार यांना ते सुपूर्द करून आमच्या भावना मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहचवाव्यात अशी विनंती केली आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या निवेदनात आनंदा अच्युतराव पवार यांनी असे म्हटले आहे की , गेली दोन वर्षांपासून कोरोना सारख्या विषाणू ने थैमान घातले असून वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारला सर्वत्र लॉकडाऊन करण्यापलीकडे दुसरा कसलाच पर्याय उरला नाही . परंतु दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहता सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धती चालू केली खरी परंतु यात सर्वसामान्य पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होत असून म्हणावी तशी विद्यार्थ्यांत शैक्षणिक प्रगती पण दिसून येत नाही.
विशेष बाब म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी अँड्रॉइड मोबाईल खरेदीची आणि त्या मोबाईल ला वारंवार रिचार्ज करण्याची मोठी आर्थिक झळ प्रत्येक पालकाला सोसावी लागत आहे. एकीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागत असताना मुलांच्या भवितव्याचा विचार करून नाविलाजने का होईना मोबाईल खरेदी करणे भागच पडत आहे. एकाच कुटुंबात एक पेक्षा जास्त मूल शिक्षण घेत असतील तर तेवढ्यांसाठी वेगवेगळा मोबाईल खरेदी करणे पालकांच्याने शक्य नसते.
एवढे करूनही कोविड काळात चालू असलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे वर्ग ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांत मोबाईल च्या अति वापरामुळे मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर त्याचे चांगलेच दुष्परिणाम होताना दिसून येत आहेत. वरून मोबाईल वर चालू असलेले शिक्षण मुलांच्या डोक्यावरून जात असल्याने म्हणावी तशी प्रगती विद्यार्थ्यांत दिसून येत नाही.
यापेक्षा मोबाईल ऐवजी दूरचित्रवाणी द्वारे जर का हे शिक्षण चालू केले तर पालकांच्या सानिध्यात मूल राहतील आणि समोरासमोर तेवढाच वेळ अभ्यासात मग्न राहून दिलेला गृहपाठ तरी करतील. कारण मोबाईल घेतला की मूल कुठेतरी कोपरा धरून बसतात आणि नक्की अभ्यास करतात का गेम खेळत बसतात हेच कळेनासे झाले असून मोबाईल मुळे मूल नक्कीच एकलकोंडी बनत चालली आहेत.
तेंव्हा वरील सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या व माझ्यासारख्या असंख्य पालकांच्या भावना विचारात घेऊन शासन दरबारी हा विषय घेऊन योग्य तो निर्णय घेतला तर नक्कीच गोरगरीब पालकांना दिलासा मिळेल व मोबाईलच्या अतिवापरामुळे होत असलेल्या मुलांवरील दुष्परिणामाला नक्कीच आळा असेल यात शंकाच नाही असे मत व्यक्त करत सदर निवेदनाच्या प्रति शिक्षण मंत्री महाराष्ट्र , आरोग्य मंत्री महाराष्ट्र , पालकमंत्री नांदेड , जिल्हाधिकारी नांदेड , जिल्हा शिक्षण अधिकारी नांदेड , गट विकास अधिकारी कंधार यांना पाठवल्या आहेत. निवेदन देतांना पालक परमेश्वर फुलवळे हे ही उपस्थित होते.