राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ अभियान; हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

हिंदु जनजागृती समिती नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर येथे प्रजासत्ताकदिनानिमित्त विविध उपक्रम राबवणार !

नांदेड ; प्रतिनिधी



राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रऱ्ध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात.

प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे होत आली तरी राष्ट्रध्वजाची अशाप्रकारची विटंबना पहावी लागते, हे अत्यंत दुर्दैवी आहे. हिंदु जनजागृती समितीने याविषयी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती,

याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणीही अनेक ठिकाणी होतांना दिसत नसल्याने हिंदु जनजागृती समिती ही प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवते.

या उपक्रमाद्वारे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत समितीच्या शिष्टमंडळाने नांदेड, परभणी, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांत प्रशासनाला निवेदन सादर केले.


परभणी येथे अपर जिल्हाधिकारी श्री. राजेश काटकर यांना निवेदन देतांना अधिवक्ता अमोल व्यास, अधिवक्ता लखन व्यास, अधिवक्ता सुमित पाचलिंग, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्रीनिवास दिवाण हे उपस्थित होते. तसेच नांदेड येथे शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षण अधिक्षक श्री. संतोष शेटकार यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी सोपान सोनटक्के, मधुकर भरडे, शांताराम आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश कोंडलवार हे उपस्थित होते.


शासनाला दिलेल्या या निवेदनामध्ये ‘शासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी’, ‘जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी’, तसेच शाळा-शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवावा’ आदी मागण्या करण्यात आल्या. हिंदु जनजागृती समिती गेल्या 19 वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवते.

या अंतर्गत प्रशासनाचे कोविड संदर्भात असलेले नियमांचे पालन करून ‘ऑनलाईन’ व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर जनजागृतीपर ध्वनीचित्रफित दाखवणे, रस्त्यांवर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, ‘सोशल मीडीया’द्वारे जनजागृती करणे आदी विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही या उपक्रमाला युवकांकडून उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे, असे हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *