कंधारला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्याची मागणी म्हणजे श्रेय लाटणे नव्हे
कंधार / प्रतिनिधी
कंधारला राष्ट्रीय महामार्गाशी जोडावे या मागणीबाबत राकाँचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी केलेले वक्तव्य चुकीचे व द्वेष भावनेतून होय. माजी आमदार ईश्वरराव भोसीकरांची मागणी पांगरा ते घोडज फाटा लिंक रोड करण्याची होती. हरिहररावांनी जी मागणी केलेली आहे ते कंधार ते पांगरा रस्ता दुरुस्त करण्याची आहे. या दोन्ही मागण्यात तफावत आहे. आणि मागणी करणे म्हणजे श्रेय लाटणे नव्हे. माजी आमदारांनी रस्ता मंजूर झाला असे म्हटले नाही. मीच कामाचा आहे, असा आव आणून हरिहर भोसीकर जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांनी केले आहेत .
कंधार शहर मुख्यमार्गाला जोडले जावे या उद्दात हेतूने माजी आमदार ईश्वरराव भोसीकरांनी पांगरा-कंधार ते घोडज फाटापर्यंत लिंक रोड करावा
अशी मागणी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती. यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांनी अकलेचे तारे तोडत काही लोकप्रतिनिधी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचा जावईशोध लावला. हरिहरराव चुकीचे विधान करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. माजी आ. ईश्वरराव भोसीकर कधीच श्रेय लटण्याचे काम करीत नाहीत असेही संजय यांनी सुनावले आहे. कंधारपासून घोडज फाटापर्यंत लिंक रोड करण्याची मागणी ईश्वररावांनी केल्यानंतर ना. चव्हाणांनी त्यासाठी संबंधित विभागाला बजेटमध्ये समाविष्ट करण्यासाठी सर्व्हे करावा असे आदेश दिल्याचे म्हटले होते.
कंधार लोहा तालुक्यावर या पूर्वीपासून लक्ष असून यापुढे देखील कंधार लोहा मतदारसंघातील विकासाचे सर्व प्रश्न सोडण्याबाबत कटिबद्ध आहेत असे आश्वासन यावेळी संजय भोसीकर यांनी दिले.