Post Views: 197
नुकताच श्रावण महिना सुरू झाला होता. सगळीकडे रिमझिमत होतं. पावसाचा लपंडाव सुरू होता. हर्ष मानसी त्या श्रावण मासी अशा अत्यंत आल्हाददायक वातावरणात डोळ्यांत नवी स्वप्ने घेऊन आणि त्या स्वप्नांना नवेच पंख लावून सायकलवरून एक तरुण पठाणी पोऱ्या शिक्षणाच्या क्रांतीचा जयजयकार करीत हरसदच्या दिशेने धावत सुटला होता. एकोणाविसशे चौऱ्याऐंशीच्या वर्षातील आॅगस्ट महिन्याचा दुसरा पंधरवडा होता तो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत गुरुजी म्हणून रुजू होण्याचा पहिला दिवस. पंधरवाड्याचाही पहिलाच दिवस म्हणजे गुरुवार. या पवित्र पावन गुरुवारी अमिन पठाण नामक गुरुजी हरसद इथल्या गोरगरीब, मजूरदार तथा पिढ्यानपिढ्यांच्या हक्कवंचितांना शिक्षणरुपी ज्ञानामृत पाजविण्याच्या नेक इऱ्याद्यानं हा अल्लाह का बंदा काळ्या अंधाराच्या किल्विशाची त्रेधातिरपीट उडविण्यासाठी मोठ्या नैसर्गिक उर्जेने शाळेत हजर झाला. पाहतो तर काय? शाळेत पाचच विद्यार्थी. अनेकांनी शिक्षण सोडलेले. त्याची अनेक कारणं. मुलेच शाळेत येत नाहीत..ही कायम मानसिकता. या माणसांच्या वस्तीत फुले आंबेडकरांच्या क्रांतीचा उजेड अजून पोहोचलाच नव्हता. शिक्षणाविषयी प्रचंड अनास्था होती. ही अनास्था कायमची नाहीशी करण्यासाठी अंधाराला चिरणाऱ्या बापाचा लेक आता तळहातावर सूर्य घेऊन तिथं आला होता. काळपाषाणाला पाझर फोडून चिखलमातीला सोन्याचा आकार आणि मांगल्याचा विचार देऊन इथल्या व्यवस्थेविरुद्ध आरडाओरड किंवा आकांडतांडव न करता ही परिस्थिती कशी बदलेल आणि पाचाचे पंचावन्न कसे होतील, मला ते केलेच पाहिजे या ध्येयाने अमिनसाब वजिरसाब पठाण या तरुण गुरुजीला झोप येत नव्हती. तो दररोज अधिकाधिक अस्वस्थ होत होता.
दिवसांमागून दिवस जात होते. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत फारसे समाधान लाभत नव्हते. ग्रामपंचायत जिला पक्की इमारतच नाही तिथे ही शाळा भरायची. रानभर आणि गावभर फिरून वेगवेगळ्या वयाची मुलं शाळेत आणून नोंदवली गेली. आज जो वयानुरूप प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे ती पठाण सरांनी १९८४ साली राबवली. आता शाळेत वीस विद्यार्थी झाले आणि या वीस पोरांच्या जोरावर गुरुजींनी एल्गार पुकारला... शाळेसाठी स्वतंत्र इमारत पाहिजे! तत्कालीन ग्राम शिक्षण समिती समोर प्रस्ताव ठेवला आणि काही दिवसांतच एका खोलीची शाळा सुरू झाली. एक शिक्षकी शाळा म्हणून समस्या होत्याच परंतु समस्यांचे भांडवल न करता सतत आयुष्यात येणाऱ्या सर्वच अडी - अडचणींनाच शस्र बनवून रणमैदानात उतरले. पालकांचे प्रबोधन केले. मजूरदारांच्या पाल्यांना स्वत: शालेय साहित्य देऊन शिक्षणाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न केले. मजूरीवर जाणाऱ्या बालकांच्या पालकांना मी मजूरीइतके पैसे तुम्हाला देतो मात्र मुलांना शाळेत पाठवा, ही कणखर भूमिका घेऊन महात्मा फुल्यांनी घालून दिलेल्या शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा आदर्श प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रयत्नशील राहिले. हे केवळ हरसद इथेच घडले असे नव्हे तर वडेपुरी हायस्कूल, आलेगाव, दगडगाव अशा शाळांमधून ही किमया साधली आहे. कामातील प्रामाणिकपणा, शिक्षण व्यवस्थेवरील निष्ठा, कर्तव्यदक्षता, विद्यार्थी केंद्रीभूत मानून त्याभोवतीच आपली अध्यापन पद्धती फिरली पाहिजे हा अट्टाहास आणि शिक्षण प्रणालीतील सर्वच घटकांकडे सकारात्मक पद्धतीने पाहणे तद्वतच आमलात आणून कार्यतत्परतेने त्याची यशस्विता दाखवणे ही काही पठाण साहेबांची वैशिष्ट्ये आहेत.
लोहा तालुक्यातील वडेपुरी हायस्कूल येथे दहा वर्षांतील काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. शिक्षण ही एक पद्धती आहे आणि पडिक जमिनीला फुलवण्याचे कसब आपल्या हातात आहे तसेच त्या पद्धतीला प्रणाली बनवून ती तंतोतंत निभवण्याची जबाबदारीही आपल्यावरच आहे, याचे प्रशासकीय आणि सामाजिक भान याच काळात त्यांनी अंगिकारले. सेवेच्या वीस वर्षांपर्यंत ते शिकत राहिले. एसएससी डीएड होऊन ते शिक्षकाच्या नोकरीतच स्थिरावले नाहीत. काळाच्या मागणीप्रमाणे एचएससी, बीए, एमए, बीएड, एमएड, एमफिल पर्यंत ते मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षण घेत राहिले. आपण आपली गुणवत्ता वाढविली तर आपण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतो असा त्यांचा स्वतःशीच प्रामाणिक आग्रह होता. त्यामुळे असा सत्याग्रह ते इतरांसाठीही धरतात. कर्म हाच देव आणि कर्म हीच पूजा तोच आपला धर्म ह्या व्रतविधानाचे तोरण आयुष्याच्या कपाळावर बांधून आपणच निर्माण केलेल्या सूर्यकुलीन खात्यात संविधानिक सौंदर्यमूल्यांचे सामर्थ्य त्यांनी जमा केले. ज्याचा प्रेरणादर्श त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही घेतला जावा असाच आहे. याचे बीज त्यांना वेळोवेळी मिळालेल्या पदोन्नतीतही सापडते. नव्याने निर्माण झालेल्या लोहा पंचायत समितीचा पहिलाच तालुका गुरुगौरव (१९९७) त्यानंतरचा जिल्हा गुरुगौरव(२०००) आणि राज्य गुरु गौरव (२००४) हे तिन्ही पुरस्कार हे दगडगावच्या शाळेत असतांनाच प्राप्त झाले ही आणखी वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. तसेच त्यांना आत्तापर्यंत विविध सेवाभावी संस्थांचे एकूण वीस पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे मान, सन्मान, पैसा, पद आणि प्रतिष्ठा सर्व काही न मागताच मिळतं. निष्ठेने काम करीत राहिलं की ते सर्व काही आपोआप चालून येतं यावर त्यांचा गाढ विश्वास आहे. ही एक मोठी शक्ती आहे असंही ते मानतात. एवढेच नाही तर हे इतरांनीही केलं पाहिजे हे केवळ सांगून नव्हे तर आपल्या कृतीतून त्यांनी आदर्श वस्तूपाठच घालून दिलेला आहे असे म्हणावयास हरकत नाही.
केंद्रप्रमुख म्हणून कोसमेट ता. किनवट येथे नियुक्ती झाल्यानंतर त्याअंतर्गत अनेक शाळांतील आदिवासी परगण्यातील विद्यार्थ्यांच्या काही समस्या निदर्शनास आल्या. भाषेची एक मूळ समस्या होतीच परंतु आर्थिक मागासलेपणामुळे शिष्यवृत्ती आणि नवोदय परिक्षेकरीता फीस तथा पुस्तके मिळत नाही हे काही शाळांना भेटीदरम्यान आढळले. तेव्हा कसलाच विचार न करता केंद्रातील साधारणतः वीस ते पंचवीस गरजू पण हुशार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांची फीस भरली आणि वह्या पुस्तके स्वखर्चातून दिली. याचा फलद्रूप परिणाम म्हणून त्यातील बरेचसे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले तर काही नवोदयसाठी पात्र ठरले. जिथे अंतःकरणातून चांगल्या बियाणांची पेरणी केली तर त्याची उगवण तर कसदार होतेच पण त्याच झाडाला श्रमसाफल्याची रसदार फळेही लागतात. त्याचा आनंद कोण असतो! हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यामुळे इतर शिक्षकांसाठी हा आदर्श वस्तूपाठच ठरतो. हे त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात अनेकवेळा केलेले आहे. बारुळ ता. कंधारला आल्यानंतर बारुळसह मंगलसांगवी आणि कौठा या केंद्राचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. हीच पुनरावृत्ती लोहा तालुक्यात झाली. गांधीनगर साखर कारखाना या केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून काम करीत असताना गेली तीन वर्षे शेवडी बाजीराव आणि सोनखेड या केंद्राचा कार्यभार त्यांनी अत्यंत आनंदाने सांभाळला. या कालखंडात कधीही, कुठुनही साधी तक्रार आलेली नाही. यातच त्यांच्या कार्यशैलीची कसोटी आणि हातोटी दिसून येते. शिक्षक ते शिक्षणविस्तार अधिकारी हा प्रवास दिसतो तितका साधा नाही. जीवन हे संघर्षाचेच दुसरे नाव आहे. त्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी अथक परिश्रम घ्यावे लागले. विद्यार्थी कल्याण हेच एक ध्येय ठेवून आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिल्यानेच त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. त्याला निष्कलंक चारित्र्याचीही जोड होती, हे इथे लक्षात घेणे आवश्यक ठरते.
सोनखेड येथेच आपल्या मूळ गावी लहानाचे मोठे झाले आणि प्राथमिक ते माध्यमिकपर्यतचे शिक्षण ज्या गावात झाले त्याच सोनखेड विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी म्हणून ३८ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर नियत वयोमानानुसार ३१ जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. आज ते खूप समाधानी आहेत. या क्षेत्रातील समाधान हीच खरी संपत्ती मानली जाते. अनेक विद्यार्थी त्यांच्या हातातून घडले. मोठमोठ्या हुद्यावर ते आहेत. ते जेव्हा भेटतात तेव्हा 'आम्ही केवळ तुमच्यामुळे घडलो! अशी कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्ही केलेल्या त्यावेळच्या मदतीमुळे आणि प्रबोधनामुळे आमच्या सबंध आयुष्याचे भाग्यशाली बांधकाम झाले आहे सर... नाही तर तोंड नाही ह्या चिऱ्याला म्हणून बिनचेहऱ्याचे चिरे बनून आम्ही कुठेतरी वळचणीला पडलो असतो, अशी कबुलीही देतात. एका कर्तव्यपरायण शिक्षकाला अजून काय हवे असते. ज्या राज्यपुरस्काराला राज्यपालांच्या हस्ते स्विकारताना नागपूर मुक्कामी आपल्या आयुष्याचं चीज झालं अशी भावना व्यक्त होते त्याही पेक्षा आपला विद्यार्थी त्याच्या जगण्याच्या जडणघडणीचं श्रेय आपल्याला देतो हा एक पुरस्कारच असतो आणि तो मन समाधानानं भरुन फुलवत असतो. आजपर्यंत जे सन्मान, जे पुरस्कार मिळाले आहेत त्यातील मोठा वाटा विद्यार्थ्यांचाच आहे, त्यांचा आशीर्वादच आहे असे ते मानतात. परंतु एखाद्या भिमरावला परिस्थितीमुळे शिकता आलं नाही, तो शिकला असता तर वरिष्ठ श्रेणी अधिकारी झाला असता ही जशी खंत आहे त्याऊलट लोहा पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड हे विद्यार्थी आजही गुरु म्हणून जो सन्मान देतात, जी कृतज्ञता व्यक्त करतात ही भरुन पावल्याची पावतीच आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर हरसद आणि जवळा देशमुख येथील माजी विद्यार्थ्यांनी जो हृद्य कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता तो कदापिही विसरता येत नाही असे ते आवर्जुन सांगतात.
आजच्या कोरोना काळाने सर्व सामान्य कुटुंबातील मुला मुलींचे शिक्षण धोक्यात आले आहे. शाळा बंद असल्या तरीही आॅनलाईन पद्धतीने शिक्षण सुरुच होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून आलेला अनुभव असा की टाळेबंदीत गावपातळीवर आॅनलाईन पद्धतीने शिक्षण फारसे यशस्वी झालेले नाही. त्यात विद्यार्थी बालमजुर झाले आणि विद्यार्थीनीचे बालविवाह झाले. हे मोठ्या प्रमाणावर घडले. काळ कठीणच आला आहे. तरीही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी गृहभेटी, स्वाध्याय, शिक्षक मित्र, गृहपाठ पुस्तिका यांच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवता येते. याबाबतीत पठाण साहेबांनी हे सगळं काम करुन घेतलं. विद्यार्थी प्रमाण मानून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शिक्षकी पेशा फार चांगला आहे. इथे जिवितांशी थेट संबंध येतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष शाळा आणि वर्गाध्यापनच महत्वाचे ठरते. यातून विद्यार्थी हित साधते त्यामुळे कुटुंबाचेही कल्याण होते. यासंदर्भाने मी सबंध शैक्षणिक आयुष्यात काम केले. विद्यार्थ्यांप्रति निर्माण झालेली पुण्याई मला लाभली आणि मी स्वतः आणि कुटुंबासह चारवेळा हजयात्रा करुन आल्याची सद्भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आजही ग्रामीण भागात विविध समस्यांमुळे शिक्षणाचा आलेख चढता असल्याचे दिसून येत नाही. मुलींना शिक्षणाच्या अनेक समस्या आहेत. पालकांच्या सतत समुपदेशनाची गरज आहे. शेतकरी शेतमजूर असले तरी पालकांनी आपल्या मुलांना वेळ देणे गरजेचे वाटते. आजच्या आणि या क्षेत्रात येणाऱ्या नवशिक्षकांनी शैक्षणिक क्रांतीचे पहिले पाऊल व्हावे. शिक्षकांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढविली पाहिजे. तरच आपण विद्यार्थ्यांना काळाशी सुसंगत आणि अद्ययावत ठेवू शकतो. तुमच्या वर्गात तीस चाळीस निष्पाप जीव तुमच्या आयुष्य घडविणाऱ्या हातांकडे आशेने पाहत असतात. त्यांना घडवा. दररोज आज आपण आपल्या स्वतःच्या लेकरांसारखे वर्गातील मुलांसाठी काय केले याचा लेखाजोखा स्वतःच स्वतःकडून तयार करुन घ्या. तुम्हाला काही कमी पडणार नाही. आपल्याला मिळालेले समाधान हीच खरी संपत्ती आहे. अशी कायम मजबूत व सर्वकल्याणी भूमिका ठेवणाऱ्या आणि सर्व नकारांना होकारात बदलविणाऱ्या किमयागारास पुढील आयुष्य निरामय जावो ह्याबद्दल मंगल कामना व्यक्त करतो आणि थांबतो.
- गंगाधर ढवळे
मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
जवळा देशमुख ता. लोहा जि. नांदेड