सामाजिक वनीकरण चा अजब कारभार !फुलवळ ते मुंडेवाडी – वाखरड रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडांसह खड्डे ही झाले फरार..

लाखोंचा अपहार करणारे अधिकारी च देताहेत उडवाउडवीची उत्तरे..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ ते मुंडेवाडी – वाखरड रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सामाजिक वनीकरण च्या वतीने निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड करण्यात आली असल्याचे संबंधित विभागाच्या कागदोपत्री रेकॉर्ड प्रमाणे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी आज घडीला सदर रस्त्यावर नाही कुठे झाड दिसून येते नाही झाडांसाठी केलेले खड्डे . त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा ऐकायला मिळते ती म्हणजे सामाजिक वनीकरण चा अजब कारभार , झाडांसह खड्डे ही झाले फरार..

जून , जुलै महिन्यात फुलवळ ते मुंडेवाडी-वाखरड रस्त्यावर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली पण ती केवळ नावापुरतीच झाली असल्याच्या प्रतिक्रिया या भागातील कांही जाणकार व्यक्ती व शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाल्या. त्यावरुन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता या वृक्ष लागवडीचे गूढ उघडकीला आले. 




 सदर वृक्ष लागवड चे काम याच विभागातील वनरक्षक असलेल्या सुमन मुंडे-गित्ते यांनी च केले असल्याचे कळले . सरकार लाखों रुपये खर्च करत वृक्ष लागवड करण्यासाठी व त्यांचे संगोपन करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती करत असतानाच याच विभागातील कर्मचाऱ्यांना मात्र त्याचे काहीच देणेघेणे नसल्यागत लाखोंचा चुराडा करत शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत थातुरमातुर खड्डे करून कुठे कोणते रोपटे लागवड केले हे त्यांनाच माहिती पण आजघडीला प्रत्यक्षात मात्र कुठेही ना खड्डा दिसतोय ना कुठे जगलेले झाड. 

भ्रष्टाचारालाही कुठेतरी सीमा असावी , कारण खरच वृक्ष लागवड केलीच असेल तर मग ते खड्डे आणि ती झाडं नेमकी गेली कुठे ? आणि हो जर वृक्ष लागवड केली असेल तर मग त्याचे संगोपन करणेही तेवढेच महत्त्वाचे होते तर तसे संगोपन का केले नाही ? यावरून असेच सिद्ध होते की खरच ही वृक्ष लागवड कागदोपत्री च तर झाली असावी . यासंदर्भात याच रस्त्यावर असलेल्या मुंडेवाडी येथील सरपंच यांना यासंदर्भात काही माहिती आहे का म्हणून विचारणा केली असता ते म्हणाले की मी या विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकशी केली असता ते म्हणत आहेत की आमचा आणि ग्राम पंचायत चा काही संबंध नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला याबद्दल कशी काय माहिती द्यावी . असे म्हणून ते टाळाटाळ केली असल्याचे सरपंच ज्ञानेश्वर मुंडे यांनी सांगितले.





तेंव्हा संबंधित विभागाच्या वनरक्षक तथा ज्यांनी हे वृक्ष लागवड चे काम केले त्या सुमन मुंडे - गित्ते यांना भ्रमणध्वनी करून सदर वृक्ष लागवड संदर्भात सविस्तर माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत होय ते काम मीच केले असून खड्डे ही केले आहेत आणि झाडे ही लावले आहेत असे सांगून तुम्हाला जर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आमचे साहेबांना बोलून घ्या अशी प्रतिक्रिया दिली . त्यावरून या विभागाचे वरिष्ठ अधिकारी कंधारे यांना भ्रमणध्वनी वरून माहिती विचारली असता तेही असेच म्हणाले की वृक्ष लागवड झाली असून तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर आमच्या कार्यालयाला येऊन भेटा म्हणजे सविस्तर माहिती मिळेल. 

अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन चालढकल करत टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पर्दा फाश करण्यासाठी लवकरच पुढचे पाऊल उचलण्याची तयारी असल्याचे या भागातील वृक्ष प्रेमी मधून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *