स्वरा गावी गेली,घरात चिमणी आली.

   परवा म्हणजे दि ०८ फेब्रु २२ रोजी सौ अन्नपूर्णा आणि स्वरा गावी म्हणजे फुलवळला गेल्या. दिदी आणि मी घरीच राहिलो. घरी शहाणं माणूस नाही म्हणून धर्मापुरीहून परतताना रोजच्या पेक्षा अधिक लवकर घरी आलो. तोपर्यंत दिदी शाळेतून घरी  आली होती.तीच्या आईला बोलण्यासाठी मी दिदीला फोन लावून दिला.
      संध्याकाळी नेहमी प्रमाणे महात्मा बसवेश्वर चौकातील आशा हाँटेलमध्ये गेलो. त्या दिवशीचे पाहुणे असणारे, आमचे मित्र, दै लोकमतचे तालुका प्रतिनिधी सलीम सय्यद आणि आमचे मार्गदर्शक एन डी राठोड सर आणि मी स्वतः तो महागडा चहा घेतला.या भेटीत सय्यद सरनी एन डी सरांना दिपोत्सव २०२१  हा दै लोकमतचा दिवाळी अंक दिला. थोडा वेळ बातचीत करून पाउणे सातच्या ठोक्याला मी घरी निघालो. दररोजच्या प्रमाणे साडेसात किंवा आठ वाजेपर्यंत मी तिथे बसलो नाही.कारण घरी दिदी एकटी होती.
  घरी गेलो, जेवण केलो .दिदीने उद्याची पुर्वतयारी म्हणून भांडी घालून घेतली. मी झाडून काढून अंथरूण केलो. बालसुलभ स्वभावाने दिदी झोपी जात होती. तर मी ,"धोंडी धोंडी पाणी दे " या प्रा अशोककुमार दवणे सर संकलीत आणि संपादित प्रातिनिधीक कविता संग्रहासाठी कविता शोधावी, ती निवडावी आणि टाईप करावी म्हणत होतो.
    स्वरा घरी नव्हती म्हणजे गर्दा नव्हता. जवळपास शांतता होती. त्या रात्रीच्या शांततेत माझ्या कानावर एका पक्षाचा आवाज ऐकू आला. एवढ्या रात्री पक्षाचा आवाज कुठून आला दिदू ? रोज रात्री उशिरा तर तो येत नाही. असे मी दिदीला म्हणालो खरं. पण दिदीची यावर काहीच प्रतिक्रिया नव्हती. ती एक म्हणाली नाही की दोन म्हणाली नाही. म्हणजे ती निद्रादेवीच्या स्वाधीन झाली होती.
      श्रमपरिहार करून मी कविता निवडीसाठी बसलो. तर सज्जावर काही तरी चालण्यासारखा आवाज ऐकू येत होता.मला वाटलं घरात उंदीरं तर नाहीत. खिडकी उघडी असताना बाहेरून मोठी पाल घरात आली असावी. आणि ती भिंतीवर न चालता सज्जावरील साहित्यावरून जोरात चालत असावी. त्यामुळे तो आवाज ऐकू येत असावा. एवढे समजून मी गप्प बसलो.
    पुन्हा एकदा परत तो आवाज ऐकू येताच मी वर पाहिलं. तर  काळ्या रंगाची एक छोटी चिमणी इकडून तिकडे ,तिकडून इकडे करत होती. त्यावेळी रात्रीचे १० : ०० वाजले होते. झोपण्यासाठी आम्ही खिडकी आणि दारं बंद केले होते. पण चिमणी दिसताच पहिल्यांदा खिडकी उघडलो आणि क्षणभर थांबलो. लगेच मोबाईल घेऊन काँटवर चढलो तर ती जास्तंच वेगानं फिरायला लागली. तीची हालचाल अधिकच वाढली.तोवर मी व्हिडीओ करायला सुरू केला होता. तो बंद केला. वाटीत पाणी घेऊन मी ती वाटी खिडकीवर ठेवली.
    मला वाटलं एक स्वरा ( चिमणी )  गावी गेली तर दुसरी चिमणी ( पक्षी ) घरात आली. ' हवा जागा व्यापते ' हे एक वैज्ञानिक आणि पर्यावरणीय सत्य ओठावर आलं. ०८ - १० मिनिटांनी ही चिमणी बाहेर गेली. त्या वाट चुकलेल्या आणि थोडीशी सैरभैर झालेल्या चिमणीचा हा व्हिडीओ. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दिदी म्हणाली ,पप्पा , स्वरानं वाटी कुठं ठेवलीय ? खिडकीवरून वाटी काढली आणि म्हणाली. पाणी सांडलं असतं तर कसं झालं असतं ?  धन्यवाद. तुम्हा सर्वांना शुभसकाळ. आपला दिवस आनंदात जावो. 🌷🌷🙏🙏
                प्रा भगवान कि आमलापुरे.
                फुलवळ : ९६८९०३१३२८.
             द्वारे शं गु महाविद्यालय ,
             धर्मापुरी ता परळी वै.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *