हृदयाच्या श्रीमंतीने जिकंणारा राजा

आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम
महाराज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टावधानजाग्रत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितीधुरंधर
प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय…
सुमारे साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनताशिवाय जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिवरायांना जाणता राजा हा मानाचा खिताब बहाल केला.


महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशहाच्या, सुलतानाच्या मगरमिठीतून प्रजेला मुक्त केले. शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण-घडण केली.
सुसंस्कार, शिक्षण, युद्धशास्त्र, राजकारण न्यायशास्त्र, प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी, मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.


स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता. शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवराय राजकारण धुरंदर, दूरदृष्टीचे होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात होते. सागरात आरमार जय्यत तयारीत होते. अनेक शूर, लढवय्ये, पराक्रमी वीर स्वराज्याच्या शत्रूचा बीमोड केला.
शत्रूचा बीमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात, न्याय मिळत होता. अपराध्यांना शासन होत होते. शेतकऱ्यांची गा-हाणी दूर होत होती.


प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरू केल्या होत्या. स्वराज्याचा विस्तार झाला होता. अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खऱ्या अर्थाने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ याचा प्रत्यय आणून दिला होता.
त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख-समाधानाने नांदू लागली. अनेक मोहीमा काढून शिवरायांनी शत्रूला नामोहरम केले. प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण लगेच व्हावे, राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले.


प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले. ते खरे तर आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले.
प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या मते प्राचीन काळापासून जे जे श्रेष्ठ राजे भारतवर्षात होऊन गेले त्या सर्वांमध्ये श्री शिवाजी महाराज एक आगळे वेगळे होते. कारण त्या राजांच्या मृत्यूनंतर त्यांचे राज्य नष्ट झाले. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राज्याच्या रक्षणासाठी मराठे लढले. त्यांनी राज्याचे रक्षण केले.


प्रतिकूल राजकीय परिस्थितीत कोणीही नेता नसताना मराठी फौज लढत राहिली. कारण त्यांना ते ‘शिवाजी महाराजांचे राज्य’ असे कधीच वाटले नाही. त्यांनी ते राज्य स्वतःचे मानले. अशी घटनाच देशाच्या इतिहासात अनोखी व एकमेव होती.


जनतेच्या मनातील स्वातंत्र्याकांक्षेचे शिवाजीमहाराज प्रतिनिधी होते. ‘लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही.’एका सामान्य जहागिरदाराच्या मुलाने मोगल बादशाहीला आव्हान देणे म्हणजे सामान्य बाब नव्हे.
खरोखर ‘स्वत:च्या हिंमतीवर, समोर कोणी मार्गदर्शक नसताना मध्ययुगीन भारतात नवीन रस्ता बांधून दाखवणारे ते कल्पक पुरुष होते,’ स्वराज्य स्थापन करताना जीवाला जीव देणारे साथी-सोबती त्यांनी निर्माण केले. स्वराज्य स्थापन करताना त्यांच्यापुढे कठीण अडचणी आल्या. संकटांचे महापूर आले. परंतु ते हरहुन्नरी, निधड्या छातीचे, गंभीर, योजक, प्रसंगावधानी लोकनायक होते. त्यामुळे अफजलखानाची भेट असो, की शाहिस्तेखानावर छापा असो, किंवा आग्ऱ्याची नजरकैद असो, ते सर्व प्रसंगांतून सहीसलामत सुटले.
शिवाजीमहाराजांचे राज्य स्वत:चे राज्य नव्हते. प्रजेचे राज्य होते. ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. ‘श्रीमान योगी’ होते. आपले शौर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेल्या, मृतप्राय समाजाला शुद्धीवर आणायचे, वर मान करून आपल्या हीनदीनतेस कारणीभूत झालेल्या परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध दंड थोपटून राहण्याचे सामर्थ्य त्यांनी निर्माण केले.


शिवाजीमहाराज व्यवहारी होते. आपल्याला रक्षण करता येईल एवढेच राज्य त्यांनी वाढवले. राज्याभिषेकानंतर त्यांनी स्वराज्याच्या कारभाराची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. स्वराज्याला, समाजाला व राज्यसंस्थेला ‘शाप’ ठरलेली वतनदारी पद्धत त्यांनी बंद केली. साडेतीनशे वर्षांच्या गुलामगिरीत विस्कळीत झालेला समाज सूत्रबद्ध, शिस्तबद्ध, उच्च महत्त्वाकांक्षी, कर्तबगार. स्वाभिमानी व स्वराज्यनिष्ठ बनविण्यासाठी महाराज कष्ट घेत होते.
महाराजांनी स्वराज्यातील प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला, ठेकेदारी, सावकारी, दलाली हे तिन्ही व्यवसाय त्यांनी बंद केले. ते धर्मरक्षक होते व क्रांतिकारकही होते. त्यांचा धर्माभिमान औरंगजेबासारखा नव्हता. ते परधर्मसहिष्णु होते. उदारमतवादी होते.


सर्व धर्मांना, मतांना, आचारांना त्यांचे सादर व सप्रेम संरक्षण होते. आग्ऱ्याच्या नजरकैदेत असताना त्यांचा अंगरक्षक ‘मदारी मेहतर’ होता. तो महाराजांचा विश्वासू सेवक होता. प्रजेला अत्यंत शुद्ध समतोल, स्वस्त व जलद न्याय मिळण्याची सर्व व्य

वस्था महाराजांनी केली.
रोख आर्थिक व्यवहार अमलात आणून सरंजामशाही मोडून काढणारा हा पहिलाच राजा. लष्करी कारभाराची व्यवस्था त्यांनी तशीच डोळसपणे आखली.
स्वत:चे त्यांचे चारित्र्य निष्कलंक, स्वच्छ होते. शुद्ध मन, सद्भावना व सरळ स्वभाव हे त्यांचे विशेष. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात आदर होता. प्रजेच्या सुखाचा विचार करणारा व दुःखाचा नाश करणारा हा लोक-नायक होता. खऱ्या अर्थाने हा रयतेचा राजा होता. त्यांच्या सद्गुणांचा वारसा मराठी मनाला व मराठी लोकांना लाभला आहे.
अखंड परीश्रम, दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत होताच. तरीही त्याची तमा न बाळगता ते शेवटपर्यंत कार्यरत होते. अखेर इ. स. १६८० मध्ये शिवरायांनी स्वर्गारोहण केले.

“झाले बहु, होतील बहु, परंतु यासम कोणी नाही “.

रूचिरा बेटकर नांदेड
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *