‘
कंधार
मन्याड खोर्यात कोरोना संकटकाळी कोरोनाग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना भाऊच्या डब्बा हा उपक्रम सुरू करून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांचा भाऊच्या डब्याला तीनशे दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर श्री शिवाजी हायस्कुलमध्ये दि. २५ रोजी सत्कार करण्यात आला.
माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनी प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी स्वतः त्यांच्या संकल्पनेतून "भाऊचा डबा" हा सामाजिक उपक्रम सुरु केला.
या उपक्रमाला तीनशे दिवस पूर्ण झाल्याने प्रा. धोंडगे यांचा सत्कार करण्यात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे होते. डाॅ.भाई केशवराव धोंडगे, शालेय समितीच्या अध्यक्षा प्रा. लिलाताई आंबटवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड यांनी केले.
डाॅ.भाई केशवराव धोंडगे यांनी यावेळी भाऊच्या डब्याचे कौतुक करतांना सांगितले की, माझी मातोश्री मुक्ताईने वसतीगृहातील वाडीतांड्याच्या लेकरांना स्वतःच्या हाताने भाकरी करुन खाऊ घातले त्यावेळी तो माईचा डबा होता.
आज पुरुषोत्तमने उत्तमोत्तम कार्य करत भाऊचा डबा आरंभ करुन माझ्या माईच्या अन्नछत्राची प्रेरणा घेतली. सध्याच्या रशिया आणि युक्रेन याच्यांत छेडल्या गेलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर भाईंनी १०२ व्या वर्षी भाष्य करत आपली चिंता बोलून दाखवली. व्ही.जी. चव्हाण, शालेय समितीच्या अध्यक्षा प्रा.लिलाताई आंबटवाड यांनीही भाऊचा विचार मांडलेेेे. गुरुनाथ कुरुडे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी भाऊचा डबा निर्मितीचा इतिहास सांगुन
भाऊचा डबा कसा यशस्वी झाला हे आपल्या मनोगतातून सांगितले. हे श्रेय माझ्या एकट्याचे नसुन माझे सर्व सहकारी आकाश कदम, बालाजी परोडवाड, प्रदीप गरूडकर, सुभाष वाघमारे, अलीम शेख, रामा देशमुख, संगीताबाई राजूरकर,मीनाक्षी कुरुंदे, मनीषा बनसोडे यांना सत्काराचे मानकरी संबोधून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला.
असेच पुण्याचे कार्य माझ्या हातून सदैव घडावे व या कार्याचा मला अभिमान आहे,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. शतकोत्तर वाढदिवसा निमित्त प्रकाशित केलेल्या तीनशे वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. दत्तात्रय एमेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.