जि.प.बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे प्रवाशी नागरिकांना सोसावी लागते झळ..
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ येथून जाणाऱ्या फुलवळ ते मुंडेवाडी वाखरड हा मुख्य रस्ता क्रमांक ३२ हा ४० फुट रुंदीचा बायपास असून या ग्रामीण मार्गाची दयनीय अवस्था झाली असून सदर रस्त्यावर झालेले अतिक्रमण व रस्त्याची अवस्था पाहता या रस्त्यास पांदन रस्त्याचे स्वरुप आल्याचे पहावयास मिळते. सदरच्या रस्त्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींनीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का ? अशा भावना फुलवळ ग्रामस्थांसह मुंडेवाडी , वाखरड येथील नागरिकांमधून बोलल्याचे ऐकावयास मिळत आहे.
फुलवळ ते मुंडेवाडी - वाखरड ग्रामीण बायपास मार्ग क्रमांक ३२ हा जिल्हा परिषद बांधकाम विभाग, नांदेड यांच्या निगराणीत असून या रस्त्याकडे संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी गेल्या १५ ते २० वर्षापासून दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यालगत झाडेझुडपे वाढली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे , नाल्या पडले आहेत. तसेच अनेकांनी केलेले छोटे मोठे अतिक्रमण पाहता आज घडीला ४० फुटाचा प्रत्यक्षात १० ते १५ फुटावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे साधे पायी चालणे ही अवघड होऊन बसले असून उर्वरित रस्त्यावरही भविष्यात असेच अतिक्रमण वाढून रस्ता पूर्णतः नामशेष होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यासाठी संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून तात्काळ रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करून वाहतुकीसाठी मोकळा करणे गरजेचे आहे.
सदरच्या रस्त्यावरून अवजड वाहन जाणे तर सोडाच पण दुचाकी चालवणे सुध्दा कसरतीचे झाले असून पायी चालण्यायोग्य सुद्धा हा रस्ता राहिला नाही हे वास्तव चित्र आहे. त्यामुळे थेट आपल्या दुचाकीसह अवजड वाहनेही सरस फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या अरुंद व वर्दळीच्या रस्त्याचा वापर करत आहेत. सारासार विचार करता गावांतर्गत इमारतीच्या बांधकामाची व वाढत्या लोकसंख्येची व्याप्ती पाहता रस्त्यावर लहान मुलांसह वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच मुंडेवाडी - वाखरड - सोमसवाडीकडे जाणारी अवजड वाहनेही याच गावांतर्गत रस्यावरून जात आहेत. त्यातून अपघात होण्याच्या भीतीने व्यक्त केली जात असल्याने ग्रामपंचायत रस्त्यालगतच्या नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.
तेंव्हा कोणताही अनर्थ घडण्यापूर्वी जि.प. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष घालून सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करणे गरजेचे असल्याच्या भावना नागरिकांतून ऐकायला मिळत आहेत.