नांदेड,दि.17 (प्रतिनिधी)-जेएनयुआरएम योजनेअंतर्गत नेदरलँडच्या धर्तीवर 2008 मध्ये नांदेडमधील रस्त्यांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु या रस्त्यांमुळे वाहतुकीला मोठा खोळंबा होत होता. ही बाब लक्षात घेवून पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राज्यशासनाकडून शहरातील रस्ते निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या रस्त्यांचा भूमीपूजन सोहळा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते उद्या दि. 18 एप्रिल रोजी होणार आहे.
नांदेड शहरातील 4 ठिकाणी भूमीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून या निमित्त मालेगाव रस्त्यावरील भक्तीलॉन्समध्ये सकाळी 11 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेस माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, काँग्रेसचे विधान परिषद गट नेते आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आ. बालाजीराव कल्याणकर, आ. मोहनअण्णा हंबर्डे, महापौर सौ.जयश्रीताई पावडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, अनंत बोंढारकर, उपमहापौर अब्दुल गफार, स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी, सभागृह नेते ॲड.महेश कनकदंडे, महिला व बालकल्याण सभापती अपर्णाताई नेरळकर, उपसभापती आयेशा बेगम खोकेवाले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तरी या भूमीपूजन सोहळ्यास व त्यानंतर होणाऱ्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.