व्यंकटेश चौधरी. एक नाव, अख्खं गाव.माणुसकीचं एक वर्तुळ. शिक्षण, साहित्य, निवेदनाचा त्रिकोण. माणूसपण असेल तिथे कुठेही चपखल बसणारी सकारात्मकतेचा चौकोन.समीक्षा, कविता, ललित, सूत्रसंचालन,
मुद्रितशोधक, पुस्तक- वर्तमानपत्र,
– विद्यार्थी- पालक एकत्रित जोडणारे इंद्रधनुष्य;कलासक्त, ज्ञानभक्त मनुष्य.
प्राथमिक शिक्षक ते ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी असा आत्तापर्यंतचा प्रवास त्यांनी समृद्ध केलेला आहे.
शिक्षक असताना अनेक उपक्रमांनी शाळा आणि विद्यार्थी यांच्यात सृजनाची हिरवळ पेरणारे हे व्यक्तिमत्व.
सतत ज्ञानाची ओंजळ भरून देत- घेत राहण्याच्या वृत्तीमुळे स्वतः संपन्न झाल्याने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून
कमी वयातच शिक्षण क्षेत्रात अधिकारी होण्याची संधी लाभली आणि चौधरी साहेबांनी आजवर या संधीचं सोनं केलं.
आपल्या प्रक्षेत्रातील उपक्रम, विद्यार्थी व शिक्षकांना एका वेगळ्या उंचीवर नेलं. हे सर्वांना ज्ञात आहेच! नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला लाभलेले ते एक सुंदर बेट आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरू नये!
शाळा व समाज यांची सांगड घालत जिल्हा परिषद शाळांची पत आणि पट वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे अधिकारी.
अशी त्यांची ठळक ओळख अधिकच गडद झालेली आम्ही शिक्षक पाहताना प्रेरणेने उजळून जातोत.
चौधरी साहेब सध्या वाजेगाव प्रक्षेत्रात कार्यरत असले तरीही शासनाच्या वतीने राबविले जाणारे जिल्ह्यातील शैक्षणिक उपक्रमांचे पेटंट त्यांच्यापासून सुरू होताना दिसतात.
उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर शिक्षक,
विद्यार्थी यांचे अगदी नगदी कौतुक करण्याचे सुबक कसब त्यांच्या निकोप, नितळ, मनाचे सौंदर्य जिल्हाभर शिंपित जाताना पहावयास मिळते.
त्यांच्या सकारात्मक पाठबळाने जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना हे आपलेच साहेब आहेत,
असा आदरभाव प्रत्येकाच्या मनात अधोरेखित झालेला आहे.
चांगल्या शिक्षकांचा शोध घेऊन त्यांना कायम माणुसकीच्या नात्याने जोडून ठेवण्याचे कौशल्य व्यंकटेश चौधरी साहेबांच्या आतील ‘माणूस’ दर्शन देणारे आहे
पद जरी साहेबी खाक्या लाभलेले ‘पॉवरफुल’ असले तरी त्यांचा अधिकारी याहीपेक्षा मार्गदर्शक, समुपदेशक मित्र असाच सर्वत्र ‘वावर’ पहावयास लाभतो.
शिक्षकांतील प्रतिभेला योग्य तो वाव देत त्यांना चार लोकांत उजागर करण्याचे मोठे मन त्यांच्याकडे आहे. म्हणूनच त्यांचे गावोगावी,
आपलेपणा जपणारे शिक्षक, पावलोपावली सावली पेरताना दिसतात. पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य असण्यापासून ते विद्यापीठाच्या अभासक्रमापर्यंत त्यांच्यात भिनलेल्या मन्याड नदीचे,
राज्यभरातील गावं हिरवी करत एकमेकांना जोडणारे पाणी सर्वचजण प्राशन करावे इतके सॅनिटायझात्मक शुद्ध असेच आहे
पंढरीच्या पांडुरंग भक्तीत तल्लीन होतात ते ‘वारकरी’;अगदी तसेच साहेबांच्या मार्ग’दर्शनाखाली वाढणारे आम्ही ‘शाळकरी..चौधरी साहेब म्हणजे आमची चालतीबोलती पंढरी…असं हे सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व व्यंकटेश चौधरी.
साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने निरामय शुभेच्छा देत
त्यांच्याकडून लाभलेल्या सावलीत वाढलेल्या माझ्यासारख्या अनेक रोपट्यांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करत हा छोटासा लेखनप्रपंच पूर्णविरामाकडे नेतो.
■ विलास कोळनूरकर,
, तळेगाव, ता.उमरी