युगसाक्षी या त्रैमासिक साहित्यपत्रिकेची सुरुवात कंधार येथे शिक्षणविस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या हस्ते दि. २७ मार्च २०१४ रोजी एका छोट्याशा कार्यक्रमात झाली होती. तिथून नवोदितांच्या एका नव्या चळवळीचा युगप्रारंभ झाला. ही एक छोटीशी साहित्य चळवळ म्हणून उदयाला आली.
राष्ट्रसंत तुकडोजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित ही साहित्य पत्रिका चालायची. मुख्य संपादक म्हणून दिगांबर वाघमारे हे काम करायचे. तसेच मी, शेख युसुफ, डॉ. माधव कुद्रे यांनी या साहित्यपत्रिकेच्या माध्यमातून अनेक नवोदित कवी आणि साहित्यिकांना जोडले. डाॅ. माधव कुद्रे यांच्या एका कवितेने फुलकळस ता. पूर्णा येथे एक कार्यक्रम घडवून आणला. त्या कार्यक्रमाने युगसाक्षीच्या संपादक मंडळाला आमंत्रित केले होते. चार पानांच्या या साहित्य पत्रिकेने साहित्य प्रकाशनाबरोबरच माणसं जोडण्याचं जीवंत अभियान चालवले होते. त्यानंतर हेच संपादक मंडळ अक्षरोदय साहित्य मंडळाशी जुळल्यानंतर अनेक कार्यक्रमांनी साहित्य वर्तुळाचा स्वतंत्र परीघ युगसाक्षीने निर्माण केला.
संपादक मंडळाच्या सततच्या मेहनतीने युगसाक्षीचे अस्तित्व उभे राहिले होते. यामागे अनेक जुन्या जाणत्या वरिष्ठांच्या प्रेरणा होत्याच. पहिल्या प्रकाशन समारंभावेळी व्यंकटेश चौधरी यांनी केलेले भाष्य खरे ठरले होते.
गेल्या वर्षभरात या युगसाक्षीने युगसाक्षी साहित्य सभेला जन्म दिला. त्या अंतर्गत बारा काव्यपौर्णिमा, पुस्तक प्रकाशनाचे, गौरव सोहळ्याचे, समाजशीलतेचे अनेक कार्यक्रम संपन्न झाले. साहित्य सभेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्याच शाळांत ‘एक वही – एक पेन’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. युगसाक्षीच्या या नव्या वाटचालीत माझ्या सोबत अनुरत्न वाघमारे, पांडूरंग कोकुलवार, नागोराव डोंगरे, कैलास धुतराज, शंकर गच्चे, मारोती कदम, प्रशांत गवळे सहप्रवासी होते. आज युगसाक्षी लाईव्ह वेब पोर्टलचे रुप घेऊन आॅनलाईन उभी आहे.
नवोदितांच्या साहित्य प्रतिभेचा आविष्कार मांडणारी साहित्यपत्रिका आता महाराष्ट्राच्या माणसांची अखंड चळवळ झाली आहे. रोजच्या अतिजलद न्युजसोबतच कथा, कविता व इतर साहित्य प्रकारांना, विशेष सदरांना युगसाक्षीने सामावून घेतले आहे. ही आता महाराष्ट्राची व्यापक चळवळ झाली आहे. येत्या काळातही युगधारक युगसाक्षी माणसं जोडण्याचीच चळवळ होऊन राहील यात काही शंका नाही. ही भूमिका सर्वप्रथम व्यंकटेश चौधरी यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी आताही आपल्या पवित्र सदिच्छा मानांकित केल्या आहेत. याच सदिच्छांचे बोट धरून आम्ही चाललो आहोत. आजच्या काळात अतिमहत्त्वाच्या आणि अनिवार्य ठरलेल्या ‘आॅनलाईन’ या संकल्पनेसोबत चालतांना लाईव्ह असण्याची अत्यंत आवश्यकता होती. ही काळाची आता गरज पूर्ण झाली आहे.
सतत युगसाक्षीसोबत राहून सदिच्छा व्यक्त करणाऱ्या व्यंकटेश चौधरी या युगसाक्षीच्या आरंभकास युगसाक्षी लाईव्हच्या आयुष्यातील पहिल्या वाढदिवसाबाबत मंगल कामना!
गंगाधर ढवळे,नांदेड