नांदेड –
राजकीय संकट ओढावले असतानाही झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिंगोली जिल्ह्याला माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हळद संशोधन केंद्राची भेट दिली. अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेवर मंत्रिमंडळ निर्णयाची मोहोर उमटल्याने हे संशोधन केंद्र साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यासाठी ११ मार्च २०२२ रोजीच्या अर्थसंकल्पात वसमत येथे हिंदूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मागणी केली होती . त्यानंतर हळद संशोधन केंद्रास मंजुरी देण्यात आली होती. त्यासाठी राज्यशासनाने १०० कोटींची तरतूद करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून यासाठी लागणारी नियोजन, वित्त व कृषी विभागांची मंजुरी रखडल्याने या निर्णयाची अंमलबजावणी करणे शक्य नव्हते. आता मंत्रिमंडळाने राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचे निश्चित केले आहे . या केंद्रासाठी सप्टेंबर २०२० हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समिती खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. या समितीने अनेक बैठका, परिसंवाद घेऊन मसुदा करण्याचा निर्णय घेतला होता . या केंद्रात शेतीमध्ये उत्पादित झालेला माल किमान २ वर्षे टिकवता येईल, यासाठी विकिरण तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भाभा परमाणू अनुसंधान केंद्राच्या ऍग्रो बायोटेक विभागामार्फत २५ कोटींची प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे . तर हळदीचे नवीन संकरित बियाणे, खत आणि पाण्याचे योग्य नियोजन, हळदीसाठी लागणारी कृषी अवजारे, यांत्रिकीकरण, बॉयलर व पॉलिशर साहित्यासाठी सबसिडी, कुरकुमीन तपासणी केंद्र, हळद निर्यात केंद्र, हळद लागवड, काढणी पश्चात व्यवस्थापन व मूल्य साखळी बळकटीकरण, माती, पाणी तपासणी केंद्र आदी विषयांवर हे संशोधन केंद्र काम करणार आहे.
चौकट –
माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी स्वतः पाठपुरावा करून मागील तीन दिवसात यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करवून घेतल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा क्रांतिकारी निर्णय आहे. गेल्या चार दिवसात मी सुद्धा नियोजन, वित्त व कृषी विभागाशी समन्वय साधून पाठपुरावा केला. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
- खासदार हेमंत पाटील
चौकट –
या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना हळदीचे निरोगी बेणे मिळावे यासाठी संशोधन केले जाणार आहे . तर भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर बंगळूर यांच्यामार्फत टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारून त्यावर काम होणार आहे. तर हळद पिकाचे आयुष्यमान वाढविण्यासाठी रेडिएशन सेंटर कुल स्टोअरेजमुळे राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे .