शाळा बंद असल्यातरी
शिकणं मात्र चालू आहे
शाळेबाहेरच्या जगाकडून
बरचंकाही शिकणं मात्र चालू आहे
घरासाठी, उद्यासाठी
तजविजीच्या तडजोडी पहात आहे
दिवसभर मायबापाचं
राब राब राबणं मात्र शिकत आहे
पेटु घालणं चुलीला
चटके हाताला, धुर डोळ्यात आहे
हातावर अलगद घ्यायला
भाकरी करायला मात्र शिकत आहे
बापाच्या कोळप्यावरची पाळी
माईचं खुरपणं पहात आहे
त्याचं बघुन जमलं तेवढं
शेतातलं काम मात्र शिकत आहे
झाडझुड, पोत्रा, सरपण, प्राणी
घरात मागं पुढं बघत आहे
आधीचा घरभर पसारा करणं
आता आवरायला मात्र शिकत आहे
बाईचं बोलणं, शाळेतला कार्यक्रम
खुप खुप आठवण आहे
१५ऑगस्टचा झेंडा, गाणी, रांगोळी
आठवणी जपायला मात्र शिकत आहे
शाळेतल्या गंमती जमती, खेळ
दुपारची गरम खिचडी आठवत आहे
घरकामानं कंटाळले आता
शिक्षणाचं महत्त्व मात्र शिकत आहे.
अनिता दाणे जुंबाड