मातृ वत्सल व्यक्तिमत्व: कै.भाई श्रीरामजी गरुडकर
(आज दि.१४ ऑगस्ट २०२२ कै.भाई श्रीरामजी गरुडकर यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन.त्या निमित्त गुरूदेव शिक्षणसंस्थेद्वारे शैक्षणिक कार्य करणाऱ्या भाईंना शैक्षणिक व्याख्यानाच्या माध्यमातून शब्दांजली अर्पण केली जात आहे. हे अत्यंत स्तूत्य कार्य आहे. त्या निमित्त भाईंच्या जीवन चरित्रावर टाकलेला हा शब्दप्रकाश.)
जगात आईचे प्रेम देणारे कोण असेल तर ती आईच आहे असे आपण मानतो. परंतु त्यासाठी आईच असावे लागते असे नाही.आपल्याकडे अनेक पुरुषांनी देखील आईचे प्रेम दिले असल्यामुळे त्यांना आपण माऊलीचे स्थान म्हणजे आई पेक्षाही वरचे स्थान दिले आहे. त्यात संत ज्ञानेश्वर माऊलींचा आपण उल्लेख करतो.तसेच समाजामध्ये जन्माने पुरुष असले तरी मातृवत वात्सल्य दाखवून समाज उन्नतीसाठी प्रयत्न करणारी अनेक माणसे पहावयास मिळतात अशापैकीच मातृ वत्सल व्यक्तिमत्व म्हणजे भाई श्रीरामजी गरुडकर होत.
त्यांचा जन्म ०६ जानेवारी १९४४ रोजी पिता पिराजी व माता पार्वती यांच्या पोटी झाला.लहानपणीच मातृछत्र हरपले,पोरकेपण वाट्याला आले.दारिद्र्य तर पाचवीलाच पुजलेले. अशा स्थितीत वडील चुलत्याच्या आधाराने जीवनक्रम सुरू ठेवला. मोठी माणसे ही परिस्थितीला घाबरत नाहीत किंवा शरणही जात नाहीत.उलट त्यावर मात करून यशाचे शिखर गाठतात.तेच गुणधर्म त्यांच्यात लहानपणापासूनच होते. स्वतः गरिबीचे चटके सहन केल्यामुळे गरीबां बद्दलची कळवळ त्यांच्या मनात येत राहिली.त्या काळातील राजकारणातील उच्च मूल्य डोळ्यासमोर ठेवून देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे नेतृत्व पाहून आपणही राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करावी या उद्देशाने राजकारणाकडे ओढले गेले.अस्या देशप्रेमी व्यक्तिमत्वांमुळेच आज आपण देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अत्यंत आनंदाने साजरा करतो आहोत.त्यांचे मार्गदर्शक माजी खा.भाई केशवराव धोंडगे साहेब व माजी आमदार भाई गुरूनाथजी कुरूडे साहेबांच्या संपर्कात येऊन १९७४ ला नोकरीचा राजीनामा दिला.शेतकरी कामगार पक्षाचे मुखेड तालुक्याचे चिटणीस म्हणून राजकीय कार्यास प्रारंभ केला.यात पक्षाकडून मुखेड नगरपरिषदेत सुमारे दोन दशके कार्य केले.सलग पाच वेळा मुखेड नगर परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले.विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा हातखंडा होता.समविचारी व्यक्तींना मित्र बनविणे व ते मित्रत्व जन्मभर टिकविणे हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य राहिले होते.त्यांनी आपले सुपुत्र संजीव व राजीव या दोघांना नगर परिषद सदस्य बनविले.तसेच कै.गणेश गरूडकर यांना ही नगरसेवक बनवले.चंद्रकांत गरूडकर यांच्या सूविद्य पत्नी विद्यमान नगरसेविका सौ. मनीषा चंद्रकांत गरुडकर याही त्यांच्या परिवारातील असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या निवडून आल्या आहेत. नगर परिषदेच्या माध्यमातून त्यांनी माजी आमदार कर्मवीर किशनरावजी राठोड,कै.आ.गोविंदरावजी राठोड, किशनराव पाटील,माजी आमदार सुभाषरावजी साबणे, माजी नगराध्यक्ष गंगाधररावजी राठोड, विद्यमान आमदार डॉ.तुषारजी राठोड यांच्या साथीने मुखेड शहराचा चेहरामोहरा बदलण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.त्यांनी आपल्या आयुष्यात कधी सुडाचे राजकारण केले नाही. राजकारण कमी समाजकारण जास्त अशी त्यांची भूमिका राहिली होती. नगरपरिषदेत काम करत असताना ‘मुखेड भूषण’ देण्याचा एक नवा पायंडा त्यांनी कै.आ. दलितमित्र गोविंदरावजी राठोड साहेब व किशनराव पाटील यांच्या मदतीने सुरू केला. तेंव्हाच खऱ्या अर्थाने मला साहेबांच्या कार्याची जवळुन ओळख झाली. अलीकडच्या काळात राजकारणात पक्षीय एकनिष्ठता पहावयास मिळत नाही. परंतु भाई शेकापसी आयुष्यभर एकनिष्ठ राहिले.
मोठी माणसे सर्वांगाणे काम करतात म्हणुनच तर ती मोठी गणली जातात तसेच त्यांनी राजकारणा बरोबरच शैक्षणिक क्षेत्रात ही महत्त्वाचे काम केले होते. मराठवाड्यातील नामांकीत शिक्षण संस्था श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार जि.नांदेडचे ते संचालक होते.या संस्थेच्या जडणघडणीतही त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. माजी खा.भाई डॉ.केशवराव धोंडगे साहेब व माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे यांच्या सहकार्याने मुखेड येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी १९७९ ला उर्दू शाळेची स्थापना त्यांनी केली.आजपर्यंत या शाळेतून हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे व सध्या ही घेत आहेत.मुखेडच्या विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा लक्षात घेऊन गुरुदेव शिक्षण संस्थेची स्थापना केली. या शाळेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण म्हणजे भावात्मक, ज्ञानात्मक व क्रियात्मक विकासाला वाव दिला जातो.आज या शिक्षण संस्थेचे प्राथमिक ते कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत २५०० विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.या संस्थेचे सचिव म्हणून ही त्यांनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केले आहे.संस्थेसाठी शहराच्या मध्यभागी सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त अशा इमारती त्यांनी उभ्या केल्या आहेत. मुखेड शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक व रक्तदान यासारख्या अनेक उपक्रमांत त्यांचे विद्यार्थी व कर्मचारी हिरीरीने सहभाग नोंदवतात. कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक सुखदुःखात ते स्वतः जातीने हजर असल्याचे मी अनेक वेळेस अनुभवले आहे.
त्यांनी लघुउद्योगाला ही महत्त्व दिले होते.त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी कागद कारखाना ही अनेक वर्षे चालविला.शिस्त,वेळेचा काटेकोरपणा, प्रसिद्धी परांगमुखता, गुणीजनांचा सन्मान, संयम,संघटन कौशल्य,मितभाषित्व,नम्रभाव हे काही गुणवैशिष्ट्ये त्यांच्याकडे होती.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मला भावलेले आणखीन एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीचा स्वीकार.आपले वडील पिराजीराव, काका मोहनाजीराव,गंगारामजी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ४० व्यक्तींचे कुटुंब एकत्रीतपणेपणे, कुशलपणे त्यांनी शेवटपर्यंत चालवले.खरे तर आजची परिस्थिती ही ‘हम दो हमारे दो’ ची आहे, सर्वत्र विभक्त कुटुंब पद्धती आली आहे.माणसे स्वतःच्या भावावर तर सोडाच जन्मदात्या आई वडीलांना वृद्धाश्रमात किंवा जनावरांच्या गोठ्यात ठेवताना दिसतात.आईवडिलांची वाटणी करून महिनेवारी पद्धतीने पोसताना दिसतात.अशा काळात आपल्या पुतण्यांना,मुलांना एकत्र ठेवून सर्वांच्याच विकासासाठी सतत प्रामाणिक प्रयत्न करणे ही म्हणावी तेवढी सोपी गोष्ट नाही पण ते त्यांनी शेवटपर्यंत केले.
खरे तर संत तुकारामांच्या
‘बोले तैसा चालेl’या ओळी त्यांच्यासाठी सार्थ ठरतात.आदर्श पालकांची भूमिकाही त्यांनी पार पाडली.त्यांना सुनंदा,संगीता ह्या दोन मुली आहेत.त्यांनाही शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविले.तर बालाजी या पुत्रास वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण देऊन डॉक्टर बनविले आज ते उत्तम वैद्यकीय सेवा देत आहेत. संजीव व राजीव या दोन्ही मुलांना पदव्युत्तर शिक्षण देऊन शिक्षण क्षेत्रात रूजू केले आहे. त्यांचेच नम्रभाव व अन्य गुण त्यांच्या परिवारातही मी अनुभवतो आहे.भविष्यात ही आपल्या वडिलांचा एकत्र कुटुंब राखण्याचा,सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा, कर्मचाऱ्यांना मातृवत वासल्यपूर्ण प्रेम देण्याचा वसा आणि वारसा परिवाराने पुढे चालवणे हेच खऱ्या अर्थाने भाईंना स्मरणात ठेवण्यासारखे आहे.भाईंच्या या सर्व कार्यात त्यांच्या अर्धांगीनी पार्वतीबाई यांचे योगदान महत्वाचे राहिले आहे कारण घरात मुलांना घडविण्यात आईची भूमिका ही महत्त्वाची असते.पार्वतीबाईंनी आपल्या पतीच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्यासोबत खंबीरपणे साथ दिली.
समाजातील गुणवान, विद्वान व चारित्र्यवान माणसांना ते सतत नवीन वर्षाच्या दूरध्वनीवरून शुभेच्छा देत असायचे आणि चांगल्या माणसांची तोंडभरून स्तुती करत असायचे. त्यांना पदाचा, श्रीमंतीचा, अहंकार कधीच आला नाही. माझ्याशी ते नेहमी दूरध्वनीवरून बोलत असायचे आणी गौरवोद्गारही काढायचे.माझ्या प्रत्येक सुखदुःखात ते जातीने उपस्थित राहिले . त्यांना स्वतः उपस्थित राहता आले नाही तर परिवारातील व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहील याची नेहमी काळजी घेतली.आज त्यांच्या जाण्याने मुखेड शहरातील आपल्यावर मातृवत प्रेम करणारे एक व्यक्तिमत्व गेल्याची जाणीव सतत अंतकरणात येते आहे.
त्यांच्यातील नम्रभाव आजच्या समाजाने घेण्यासारखा आहे.मी काहीही केले नाही,तुमच्या सहकार्यामुळे झाले असे ते सतत म्हणत असायचे.त्यांनी मुखेड शहरात बाह्यस्वरुपात ही आणि आंतरीक स्वरुपात ही सर्वाधिक घरे बांधली.आपला परिवार व समाज यांच्यावर त्यांचे नितांत प्रेम होते. समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते जातीने अग्रेसर दिसायचे म्हणूनच त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन मुखेड तालुका निराळी समाजाने त्यांना ‘ निराळी भूषण’ हा सन्मान देऊनही त्यांचा यथोचित गौरव केला होता. त्यावेळी संस्थेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रती दाखवलेला कृतज्ञता भाव पाहून खरोखरच मनस्वी आनंद झाला. या कार्यक्रमाचे निवेदन करण्याचे भाग्य मला लाभले होते.
राठोड परिवाराचे व गरुडकर परिवाराचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.कर्मवीर किशनराव राठोड व कै.आ.गोविंदराव राठोड हे दोघेही बंधू गरुडकर साहेबांना सोडून कुठलाही कार्यक्रम करत नसत व गरूडकर साहेब ही त्यांना सोडून कार्यक्रम घेत नसत. दोन्ही परिवार एकमेकांचा सल्ला घेत असत. हीच परंपरा गरूडकर परिवाराची पुढची पिढी ही पाळते आहे हे आजच्या कार्यक्रमावरुन लक्षात येते. तसेच राठोड परिवाराची पुढची पिढी म्हणजेच माजी नगराध्यक्ष प्राचार्य गंगाधरराव राठोड व विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड हे ही गरूडकर परिवाराला बंधुवत प्रेम देताना दिसतात.ही आनंदाची बाब आहे.
कोरोना महामारी मुळे त्यांचे अंत्यदर्शन ही आपणास घेता आले नाही व मागील दोन वर्षापासून त्यांच्या कार्याचा जागर ही मोठ्या प्रमाणावर करता आला नाही.पण यावर्षी गरुडकर परिवार व गुरुदेव शिक्षण संस्थेतील कर्मचारी परिवाराच्या वतीने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत, शिक्षणतज्ञ प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार सरांचे ‘शिक्षण का ? व कशासाठी? या विषयावरील व्याख्यान आयोजित करून शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. ही अनुकरणीय बाब आहे. त्यांच्या आपल्यातून जाण्याची उणीव तर कशानेच भरून न निघणारी आहे.असे असले तरी ही अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा जागर आपण सतत करत राहूया व त्यांच्या विचार व कार्यावरती चालण्याचा संकल्प करूयात. हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
पुनश्च एकदा त्यांना माझ्या या शब्दांजलीच्या माध्यमातून विनम्र अभिवादन करून मी माझा शब्दप्रपंच थांबवतो.
प्रा. डॉ. रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर,
ता. मुखेड जि. नांदेड
भ्रमणध्वनी-९४२३४३७२१५