स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ माझा तिरंगा, माझा अभिमान ! १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट

अमृत महोत्सव विशेष

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमापासून 12 मार्च 2021 पासून 75 आठवड्यासाठी करण्यात आली आहे, तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जात आहे भारतीय स्वातंत्र्याच्या विधीवर रक्त सांडणाऱ्या देशभक्तांच्या शौर्य कथा आजही ताज्या आणि अम्लान अशा आहेत .देशभक्ती, देशप्रेम आणि देशासाठी सर्वस्वाचा त्याग या अमूल्य तत्त्वांचा रोमांचकारी प्रत्यय या शौर्य कथातून येतो, देशभक्तांच्या कार्याचे, शौर्याचे आणि त्यागाचे स्मरण नव्या उगवत्या पिढीला संस्कारक्षम बनवेल. शाळकरी मुलांमध्ये नवे विचार आणि वकृत्व फुलवण्यासाठी राष्ट्रीय सण महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
कोणत्याही देशाचा राष्ट्रध्वज हा त्या देशासाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा विषय असतो.
या वर्षी साजरा होणाऱ्या या स्वातंत्र्याला विशेष महत्त्व आहे.


कारण हा 75 वा स्वातंत्र्य सोहळा अमृत महोत्सवी सोहळा म्हणून तो धूमधडाक्यात व उल्हासात सर्वत्र साजरा करणार आहोत,
आपण आपल्या देशातील 20 कोटी हुन जास्त घरावर तिरंगा फडकवणार आहोत
हर घर,तिरंगा अभियान,
भारताची वाढवेल शान!
स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक, हुतात्मे, स्वातंत्र्य सैनिक, बालवीर देशभक्त,अज्ञात व्यक्ती यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात तेवत राहावी म्हणून 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान’ हर घर तिरंगा अभियान ‘राबविण्यात येत आहे. आजच्या तरुण पिढीला तरुण वर्गाला क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण व्हावी व प्रत्येकाच्या मनात व नसानसात चैतन्याची भावना निर्माण व्हावी यासाठी’ घरोघरी तिरंगा’ हे अभियान मोठ्या आनंदाने उत्साहात राबवले जात आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच


15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले, हे स्वातंत्र्य अनेक सैनिकांच्या बलिदानातून मिळाले आहे. त्यांचे बलिदान आपल्या सर्वांच्या स्मरणामध्ये राहण्यासाठी आज आपण सर्वांनी मिळून देशाच्या अमृत महोत्सव साजरा करत आहोत.
इंग्रजांनी दीडशे वर्ष भारतावर राज्य कारभार केला. पूर्वी भारत सुजलाम सुफलाम होता. येथील जनता सुखी होती, परंतु सन १६०० मध्ये भारतात ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि इंग्रज व्यापारी म्हणून येथे आले, आणि राज्यकर्ते बनले. संपूर्ण हिंदुस्तान त्याने पादाक्रांत केला. येथील लोकांच्या भोळ्याभाबडपणाचा फायदा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वतः चे वर्चस्व निर्माण केले, सुरत या ठिकाणी त्यांनी पहिली वखार स्थापन केली आणि तेथून व्यापाराची सुरूवात केली .व तेथूनच राज्यकारभाराची सूत्रे हलवायला सुरुवात करून संपूर्ण देश पोखरून खिळखिळा करून टाकला. येथील लोकांना आपले गुलाम बनविले. भारतीय लोकांना कारकूनी शिक्षण देऊन सर्व सत्ता त्यांनी आपल्या हातात घेतली, संपूर्ण हिंदुस्थानावर त्यांनी राज्यकारभार केला.येथील लोकांवर अनेक प्रकारचे कर लावले ,’फोडा आणि राज्य करा,’ या नीतिचा अवलंब करून अनेक युद्धे जिंकून घेतली, अनेक क्रांतिकारकांना फासावर लटकाविले, त्यामुळे आपल्या वीरांच्या गाथा आपणास विसरून चालणार नाहीत. अनेक साधुसंतांनी समाजप्रबोधनाचे काम केले.तसेच अनेक शाहिरांनी रोमहर्षक पोवाडे गाऊन देशाला स्वातंत्र्य मिळवण्या साठी सैनिकांचे व जनतेचे मनोधैर्य वाढवले, त्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला. अनेक वीरांगनांनी आपल्या देशासाठी बलिदान केले आहे, त्यामुळेच सर्व नागरिकांच्या
हृदयात देशभक्तीची भावना निर्माण करण्याबरोबरच राष्ट्र ध्वजा बाबत जनजागृती करण्याचे काम करावयाचे आहे.


22 जुलै 1947 या दिवशी घटना समितीच्या बैठकीमध्ये तिरंगी ध्वज हा भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. सर्वात वरचा रंग केशरी तो त्यागाचे व शौर्याचे प्रतीक आहे. मध्यभागी पांढरा रंग, तो शांततेचे व पवित्रतेचे प्रतीक आहे .
तर सर्वात खालचा हिरवा रंग आहे, तो समृद्धीचे व संपन्नतेचे प्रतीक आहे. मध्यभागी अशोक चक्रात 24 आरे आहेत, ते सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आले आहेत. राष्ट्रीय ध्वज हा आपल्या देशाच्या एकतेचे व आदराचे प्रतीक आहे. आपल्या देशाच्या तिरंग्याची रचना पिंगाली व्यंकय्या यांनी केली आहे. भारतीय संविधानाने नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुता,व न्याय दिले आहे .संविधानानुसार आपला देश चालतो. आज आपण अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना काही महत्त्वाच्या घटकावर चर्चा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये घरकुल निवास योजना ,पंचवार्षिक योजना, रस्ते, मोठमोठे उद्योगधंदे ,नदीजोड प्रकल्प, अनेक ऐतिहासिक वास्तूंचे, किल्ल्यांचे, महालांचे सुशोभीकरण केले आहे. धरणे, जलाशय कालवे बांधून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले, रेल्वेचे जाळे विस्तारलेले दिसत आहे.

अनेक
शास्त्रज्ञांनी नवनवीन शोध लावले, भारत हा नेहमी धर्मनिरपेक्ष असणारा देश आहे तो कोणत्याही गटात न जाता अलिप्ततावाद स्वीकारलेला देश आहे. भारतावर झालेली अनेक देशांचे आक्रमणे त्यांनी परतून लावली आहेत. आपला देश महासत्तेच्या रांगेत आहे भारतात अनेक विद्यापीठे स्थापन होऊन शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आहे. कृषी क्षेत्रांनी ही भरीव कामगिरी केली आहे. नवनवीन बियाणे विकसित केले आहे. आज अनेक कृषी विद्यापीठातून नवीन संशोधन बीज प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे हे आपणास विसरता येणार नाही. आरोग्य सेवा ही आपल्या देशातील समृद्ध झाली आहे.आज 70 टक्के लोक भारतातील साक्षर झालेले आहेत , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंनी मिळवलेले यश हे अतिशय उल्लेखनीय आहे भारताने यंदा 61 पदके पटकावली आहेत त्यात 22 सुवर्णपदक 16 रौप्य पदक आणि 23 कांस्यपदकाचा समावेश आहे. त्यामुळे भारत राष्ट्रकुल स्पर्धेच्या तालिकेत चौथ्या स्थानावर राहिलेला आहे हे बाब आपल्याला आनंददायी आहे हे सर्व 75 वर्षात आपण मिळवलेल्या यश आहे हे ही या ठिकाणी सांगणे आवश्यक आहे.


परंतु काही घटना विषयी जागरूक रहाणे हे सुध्दा गरजेचे आहे.
देशात बेरोजगारी सतत वाढत आहे, त्यामुळे वाईट घटना घडत आहेत, बेरोजगारी वाढल्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे, त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिकलेले व सुशिक्षित असलेले काही लोक सुद्धा बाबा, बुवा व भगत लोकांच्या नादी लागून अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेले आहेत.
अनेक तरुण-तरुणी मोबाईलच्या नादात आपला अमूल्य वेळ वाया घालवत आहेत. टीव्हीवरील मालिका, चित्रपट, वेगवेगळे नाटके पुन्हा पुन्हा तेच ते विषय दाखवून, रंगवून कल्पनेच्या बाहेरची माहिती लोकांना दाखवत आहेत. त्यामुळे समाजातील ऐक्य व सलोखा नाहीशा होतो की काय? अशी शंका मनात येत आहे. दहशतवाद वाढतच आहे. हिंसाचार बळावत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण सदैव तयार होत आहे.भ्रष्टाचार शिष्टाचार होत आहे .
देशात दररोज अपघात होत असल्याने हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत, पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.


जंगले तोडल्यामुळे ऑक्सिजन कमी मिळत आहे, त्याचा परिणाम आपल्याला कोरोना महामारीतून पहावयास मिळाला आहे .
दररोज लोकसंख्या वाढतच आहे. त्यामुळे लोकसंख्येचा भस्मासुर आता आवरणे आवश्यक आहे,अशी जर दररोज लोकसंख्या वाढत गेली तर या देशाचे काय होईल?अशी चिंता काही तज्ञ व्यक्तीनी व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षात कोविडने सर्वत्र धुमाकूळ घातला होता,लाखो लोक कोरोना महामारीने मरण पावले, त्यामुळे संपूर्ण देशात नैराश्याचे वातावरण तयार झाले. पुन्हा अशी महामारी येऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे .


या काळात शेतकरी ,शेतमजूर, कामगार, गरीब व्यक्ती ,विधवा महिला ,छोटे छोटे व्यापारी व कारागीर यांचे संसार उघड्यावर येऊन मोडून पडले आहेत. या महामारीमुळे मानवी जीवन अक्षरशः उध्वस्त झाले आहे या काळातील जर शिक्षण व्यवस्थेचा विचार केला तर शालेय विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, ते कधीही भरून निघणार नाही असे मला वाटते, महागाई गगनाला भिडली आहे.त्यामुळे सर्वसामान्याचे कंबरडेच मोडून पडलेले आहे.
या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वरील सर्व विषयावर साधक-बाधक चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे ,तेव्हाच आपला देश इतर देशाच्या रांगेमध्ये जाऊन बसेल, नाही तर वरील गोष्टी जर आपण नाही केल्या तर खरोखरच आपण फार खालच्या रांगेमध्ये जाण्याची दाट शक्यताआहे, लोकसंख्या वाढणे हे आपले भूषण नाही तर ते दूषण आहे .ऑलम्पिक सामन्यांमध्ये आपल्याला म्हणावे तसे पारितोषिक आजपर्यंत मिळाले नाहीत. ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे.तेव्हाच आपला अमृत महोत्सव सोहळा आनंदानी साजरा झाला.असेही म्हणण्यास काही हरकत नाही.हा अमृत महोत्सव साजरा करून भारताचा अभिमान आपण संपूर्ण जगासमोर ठेवत आहोत.
‘उत्सव हा अमृत महोत्सवाचा’
‘दिवस आहे स्वातंत्र्याच्या गौरवाचा’ ‘वसा बाळगू आपण देशभक्तीचा’
‘ जय हिंद !जय भारत।
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा

प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *