फुलवळकर जपताहेत हिंदू-मुस्लिम ऐक्याची शेकडो वर्षाची परंपरा ;एकाच छताखाली श्री गणेश आणि नालेहैदर ची प्राणप्रतिष्ठा करून दिला जातोय सामाजिक ऐक्याचा संदेश.
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील फुलवळ हे मानार प्रकल्पाच्या बॅक वॉटर च्या काठा शेजारी असलेले जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या असलेले जि.प. गटाचे गाव असून तसे नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांनी असो का राजकीय घडामोडीसाठी असो पण सदैव सर्वत्र सुपरिचित असणारे गाव आहे.
त्याच मूळ कारण म्हणजे या गावात अठरा पगड जाती , धर्माचे लोक वास्तव्यास असतानाही या गावात धार्मिक किंवा जातीय तेढ कधीच निर्माण न होऊदेता येथे सर्वच सण , उत्सव , जयंत्या साजरे करण्यासाठी प्रत्येकजण बंधुभाव जागृत ठेवून सर्वजण एकत्रित येऊन असे सण , उत्सव येथे साजरे केले जातात. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे आजघडीला एकाच छताखाली श्री गणेश मूर्तीची आणि मोहर्रम निमित्त नालेहैदर ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
सध्या हिंदूंसाठी श्री गणेशोत्सव चा उत्सव चालू असल्याकारणाने फुलवळ मध्ये जुनेगावठाण येथील सांस्कृतिक सभागृहात सार्वजनिक गणेश मंडळ कडून श्री गणेश मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
तर त्यातच मुस्लिम बांधवांचा पवित्र मानला जाणाऱ्या मोहर्रम महिन्याची सुरुवात झाली आणि प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोहर्रम निमित्त सवाऱ्या ( देव ) बसवण्याची तयारी झाली आणि त्याच सभागृहात एकाच छताखाली अगदी श्री गणेश मूर्ती च्या शेजारीच नालेहैदर ची स्थापना करण्यात आली.
त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक हिंदू-मुस्लिम भक्तांना या दोन्ही देवांचे दर्शन एकाच वेळी घेता येत आहेत आणि दोन्ही देवांना नैवेद्य ही एकाच वेळी ठेवता येताहेत. हा एक सामाजिक ऐक्याचा संदेशच फुलवळकरांकडून पहायला मिळतो आहे.
जसे गणेशोत्सव मध्ये श्री गणेश मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करून अकरा दिवस पूजा , अर्चा केली जाते. तसेच गेली शेकडो वर्षांपासून फुलवळ मध्ये मोहर्रम निमित्त येथे मौलाअली , काशीम दुल्हे , नालेहैदर , कवडीपीर , डोला आदी देवांची प्राणप्रतिष्ठा करून सलग पाच दिवस पूजा , अर्चा केली जाते आणि एकेकाने देव उठवले जातात त्यात बहुतांश देवकर हे हिंदूच आहेत हे विशेष.
आणि जसे अकरा दिवसाला गणेश विसर्जन केले जाते तसेच दहावी च्या दिवशी सवाऱ्या सुध्दा थंड केल्या जातात. या दोन्ही उत्सवात हिंदू आणि मुस्लिम समाजातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन हे दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात त्याला मोहर्रम ताजिया म्हणतात.
गेली दोन वर्षांपासून तर हमखास गणेशोत्सव आणि मोहर्रम एकाच वेळी येत असल्याकारणाने एकाच सभागृहात , एकाच छताखाली या दोन्ही देवांची स्थापन मोठ्या उत्साहात करून गावकरी दोन्ही उत्सवाचा आनंद मनमुरादपणे लुटतात परंतु यंदा कोरोना ने सर्वत्र कहर घातल्यामुळे शासन व पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत , शासन आदेशाला प्रतिसाद देत हे सण , उस्तव साजरे केले जात आहेत.