मराठीत ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी म्हण आहे.यावर्षी झेंडूच्या फुलांच्या बाबतीत असंच घडलंय.ज्याला बाजारपेठेचं ज्ञान नाही,त्याचं गणित नेहमीच चुकतं,असं म्हटलं जातं. आता हेच बघा ना! हिंगोली जिल्हा हा अलीकडे फुलशेतीसाठी प्रसिद्ध झालेला आहे.सेनगाव पट्ट्यात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती करण्यात येते.झेंडूच्या फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात या भागात काढले जाते. दसरा आणि दिवाळी हे सण डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात येते. जवळच्या नांदेड,परभणी बाजारपेठेत ही फुले जातात. फार तर हैदराबाद पर्यंत.परंतु भावाच्या बाबतीत बे-भरवशाचा मामला.त्यामुळे चार पैसे मिळतील या आशेनं धावपळ करणारा कास्तकार फसतो.अडचणीत येतो.यासंदर्भात हिंगोलीचे अन्ना जगताप यांनी ‘झेंडुची फुले अभियान’ उभे केले. ग्राहकांनी घासाघीस न करता शेतकऱ्याला त्याच्या श्रमाचा मोबदला द्यावा.अशी उदात्त कल्पना पुढे ठेवली.या चळवळीने फुल उत्पादक शेतकऱ्यांना नवे भान जरूर दिले.शेतकऱ्यांचा उचित सन्मान करण्याची कल्पना स्तुत्य आहेच.यामुळे शेतकरी थेट ग्राहकांशी व्यवहार करू शकतात. ही मोठी दिलासादायक बाब म्हटली पाहिजे. यासाठी अन्ना जगताप यांचे अभिनंदन करायला हवे. असे असले तरी फुल उत्पादक शेतकऱ्यांचे सगळेच प्रश्न सुटले असे म्हणता येत नाही. आता यंदा म्हणजे दोनच दिवसांपूर्वीची परिस्थिती बघा ना.नांदेडच्या बाजारात २० रूपये किलो प्रमाणे फुलांची विक्री झाली. रिजन वर्कशॉप भागात तर सत्तर रूपयात दहा किलो पिवळ्या,भगव्या रंगाची झेंडूची फुले विकली. तर दुसरीकडे कोल्हापूरला हीच फुले २००रूपये किलोप्रमाणे विकल्याची बातमी आहे. कोल्हापूरला दहा पट वाढवून भाव मिळत असेल तर या शेतकऱ्यांनी २० रूपये किलोप्रमाणे फुले का विकली असा प्रश्न विचारणारे कमी नाहीत. त्याचे उत्तर मात्र सोपे नाही.ही फुले फार दिवस टिकत नाहीत.दोन तीन दिवसांचे आयुष्य त्यांचे.आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट फुले उत्पादक शेतकऱ्यांचा बाजारपेठेच्या सूक्ष्म नियोजनाचा अभाव.खरे तर कोल्हापूर पाच-सहाशे किमीवरचं शहर.रातोरात गाठता येण्यासारखं.सध्याच्या मोबाईलच्या जमान्यात कुठे काय चाललंय याचा सुगावा थोडाच झाकून राहतोय.परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीत असं क्वचितच घडतंय.कुठल्याच वाहिनीवर शेतमालाचे भाव आणि त्यासंदर्भातील चर्चेला अवसर नसतो.शासनालाही त्याच्याशी देणं घेणं नसतं.सत्ता माझी की तुझी,याची की त्याची यावरच घनघोर चर्चा घडत असतात. शेतकऱ्याची दिवाळी उजेडात झाली की अंधारात तो पाय खोरून मेला याच्याशी देणंघेणं नसतं.त्यामुळं आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय..अशी त्याची गत झालीय.